esakal | दुर्लक्षित मुलांसाठींचा मायेचा आधार...
sakal

बोलून बातमी शोधा

Kudal Hostel

दुर्लक्षित मुलांसाठींचा मायेचा आधार...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

‘सकाळ सोशल फाउंडेशन’च्या अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या सामाजिक उपक्रमांसाठी ‘ सोशल फॉर अॅक्शन’ हा ऑनलाइन वेबसाइट स्वरूपात नवा प्लॅटफॉर्म सुरू करण्यात आला आहे. या वेबसाइटला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. त्यातूनच स्वयंसेवी संस्था व देणगीदार यांना एकत्र आणण्यासाठी ‘ सोशल फॉर अॅक्शन’ क्राउड फंडिंगसाठी नवीन डिजिटल प्लॅटफॉर्म ही संकल्पना उदयास आली. या उपक्रमात दर आठवड्याला एका स्वयंसेवी संस्थेची माहिती दिली जाते. आजच्या भागात ‘एकलव्य बाल शिक्षण व आरोग्य न्यास'' या संस्थेविषयी...

रेणू गावस्कर या मुंबईच्या साने गुरुजी विद्यालयाच्या विद्यार्थिनी. ‘जगाला प्रेम अर्पावे’ या शिकवणीचा त्यांच्यावर परिणाम होता. पुढं महाविद्यालयात तत्त्वज्ञानचा या विषयाचा अभ्यास करताना महात्मा गांधींच्या विचारांशी त्यांचा परिचय झाला आणि राष्ट्रपित्याच्या अंत्योदयाची कल्पना समजावून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पुढं रेणूताईंच्या आई- वडिलांनी या जगाचा निरोप घेतला आणि ‘अनाथ’ या शब्दाशी त्यांचा खऱ्या अर्थानं परिचय झाला. त्याच सुमारास त्यांच्या घराजवळील डेव्हिड ससून इंडस्ट्रीयल स्कूल येथील मुलांची गजाआडून मारलेली ''हमारे यहाँ कोई नही आता, आप तो आ जावो'' ही हाक त्यांच्या हृदयापर्यंत पोहोचली आणि रेणूताईंनी तिथं प्रवेश घेतला.

डेव्हिड ससून इंडस्ट्रीयल स्कूल ही मुंबईतील चिल्ड्रेन्स एड् सोसायटी या प्रमुख संस्थेची एक शाखा. सामान्य भाषेत गुन्हेगार. अशा मुलांना १२ ते १८ या वयोगटात असताना बंदिस्त केलं जात असे. तिथं रेणूताईंनी काही समविचारी व्यक्तींना एकत्र घेऊन ''आम्ही युवा'' या संस्थेची स्थापना केली. डेव्हिड ससूनमध्ये ‘आम्ही युवा’ या संस्थेनं सातत्यानं तेथील मुलांच्या विकासासाठी परिणामकारक काम केलं. देशातल्या विविध भागांतून आलेल्या, भाषेचं वेगवेगळंपण असणार्‍या मुलांना दहावीपर्यंतचं शिक्षण देणं, नोकरी मिळवून देणं, निवार्‍याची सोय करणं, लग्न जुळवणं ही तर कामं केलीच; पण त्याचबरोबर दूरदर्शनवर त्यांचे कार्यक्रम घडवून आणणं, नाटक बसवून त्याचे मुंबईत प्रयोग करणं अशा सांस्कृतिक बाबीही विकसित केल्या आणि तेही समाजानं गुन्हेगार असा शिक्का मारून वाळीत टाकलेल्या मुलांच्या बाबतीत शक्य करून दाखवलं. याचा परिणाम म्हणून चिल्ड्रेन्स एड् सोसायटीच्या इतर शाखांशी रेणूताई व त्यांचे सहकारी जोडले गेले, त्यामुळं ते या मुलांसाठी अर्थपूर्ण शिक्षणाचं काम करू शकले.

काही कारणांमुळं रेणूताई मुंबईहून पुण्याला आल्या तेव्हा फारशा ओळखी नव्हत्या. पण मुंबईत केलेल्या कामाच्या आधारे, मिळालेल्या अनुभवातून वंचित बालकांच्या संदर्भात व त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मूलगामी काम करण्याची त्यांची इच्छा होती. मुंबईतील कामाचा, त्यातून मिळालेल्या अनुभवांचा त्यांना व सहकाऱ्यांना खूपच फायदा झाला. परंतु इतर स्वयंसेवी संस्थांमध्ये जाऊन कामं करताना येणाऱ्या मर्यादाही लक्षात आल्या व स्वतःची स्वयंसेवी संस्था असावी या विचारानं पुण्यात आल्यावर रेणूताईंनी ‘एकलव्य बाल शिक्षण व आरोग्य न्यास'' या संस्थेची २००३ मध्ये स्थापना केली.

एकलव्य न्यासाच्या ध्येयाची संकल्पना पहिल्यापासून स्पष्ट होती. सामाजिक स्तरावरचं शेवटचं मूल व या मुलासमवेत अपरिहार्यपणे येणारी एक स्त्री, यांच्याशी जोडून घ्यायचं व त्यांना विकासाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करायचा, हाच संस्थेचा मानस होता. सामाजिक वास्तवाचा अभ्यास करताना ठळकपणे काही बाबी न्यासाच्या लक्षात आल्या. प्राथमिक शिक्षणाची आबाळ, हा आपल्यापुढील कळीचा प्रश्न आहे. प्राथमिक शिक्षण व आरोग्य यावर आर्थिक नियोजनात होणारा अतिशय कमी खर्च, हे याचं एक प्रमुख कारण आहे. यातूनच एकलव्य न्यासानं आपलं लक्ष, ''Catch them young'' या न्यायानं प्राथमिक शिक्षण व आरोग्यावर केंद्रित करण्याचं ठरवलं.

दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे, गरीब व आर्थिकदृष्ट्या मागासवर्गातील मुलांच्या अपहरणाचा व त्यांना वाम मार्गाला लावण्याचा चिंतेचा विषय. या अभ्यासातून आपण गरजू बालकांना मदत करण्याचा खारीचा वाटा उचलला पाहिजे, याची तीव्र जाणीव रेणूताई व त्यांच्या सहकाऱ्यांना झाली. सुरुवातीच्या काळात शोभा भागवत व कल्पना संचेती यांच्या माध्यमातून रेणूताईंची भेट विजयाताई लवाटे यांच्याबरोबर झाली व त्यातून सर्वस्वी अपरिचित असलेल्या देवदासींच्या जगाचे दरवाजे त्यांच्यासमोर खुले झाले. त्याच सुमारास पुण्यातील एका नामवंत बांधकाम व्यावसायिकानं रेणूताईंना तात्पुरती का होईना, एक जागा उपलब्ध करून दिली व त्या जागेत देवदासींच्या मुलांचा प्रवेश झाला. प्रवेश झाला असं म्हणणं सोपं आहे; परंतु समाजानं वाळीत टाकलेल्या स्त्रियांच्या मुलांना शिक्षणाच्या आणि जीवनाच्या मूळ प्रवाहात आणणं हे तितकंसं सोपं काम नाही, याची जाणीव रेणूताईंना होती.

साधारण वीस वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे, रेणूताई व त्यांचे सहकारी पायी किंवा वाहनानं जाऊन झोपडपट्ट्या पूर्ण पिंजून काढत, लहान मुलांचा शोध घेत असत. तेथील स्त्रियांना समजावून मुलांना घेऊन येत असत. या मातांचा विश्वास संपादन करण्यात बराच काळ गेला, ही गोष्ट तर खरीच; पण त्यामुळं संस्थेत लहान मुलांच्या शिक्षणासाठी बालवाडीची स्थापना रेणूताई करू शकल्या. आज वीस वर्षांनंतर त्या काळातली एक मुलगी डॉक्टर झाली आहे. काहीजण वाणिज्य शाखेचे पदवीधर झाले आहेत, तर काही जणांनी अभियांत्रिकीचं शिक्षण घेतलं आहे. हे काम अजूनही सुरूच आहे. त्याच सुमारास पुणे महानगरपालिकेच्यावतीनं एक प्रस्ताव आला. रस्त्यावरच्या मुलांना रात्र निवारा देण्याविषयी एक प्रकल्प राबविण्यात येणार होता. त्यात ''एकलव्य बाल शिक्षण आणि आरोग्य न्यास''चा समावेश झाला. गेल्या बारा वर्षांपासून या मुलांच्या शिक्षणाची, विकासाची जबाबदारी पुणे महानगरपालिकेच्या साहाय्यानं रेणूताई आणि त्यांचे सहकारी संस्थेच्या माध्यमातून घेत आहेत. या व्यतिरिक्त मुलांच्या पालकांचं प्रबोधन करणं, वेळप्रसंगी त्यांना मदत करणं, ही कामंदेखील एकलव्य न्यासानं स्वीकारली आहेत. वंचितांच्या या जगाशी जोडून घेतानाच बालकांच्या शिक्षण हक्काकडं रेणूताई जागरूकपणे पहात होत्या. कथाकथन हे रेणूताईंचं बलस्थान. विविध भाषांतील कथा वाचून, त्यांचं वेगवेगळ्या गटांत कथन करून व त्या माध्यमातून मुलांचा भाषाविकास, बुद्धिसंर्वधन आणि संवेदनशीलता वाढवावी असा प्रयत्न रेणूताई तीस वर्षांहून अधिक काळ करत आहेत.

मुंबई, पुणे, अहमदनगर, नागपूर, नाशिक, सोलापूर अशा महाराष्ट्रातील अनेक शहरांना वारंवार भेटी देऊन रेणूताईंनी ही शैक्षणिक कामं केली आहेत. आर्थिकदृष्ट्या मागास, अनाथ व शाळाबाह्य मुलांच्या समस्यांचा आवाका लक्षात घेऊन व त्यांना आवश्यक असणाऱ्या मदतीची गरज समजावून घेऊन एका क्लबनं कुडाळ येथे साधारणपणे अडीच एकरांची जमीन त्यांच्या एका देणगीदारांच्या माध्यमातून ''एकलव्य बाल शिक्षण व आरोग्य न्यास'' संस्थेला घेऊन दिली आहे. या जागेवर मुलांचं व मुलींचं स्वतंत्र वसतिगृह, अनौपचारिक शाळा, कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र अशा अनेक वास्तू उभारायच्या आहेत. सध्या कुडाळ वसतिगृह व शाळेच्या बांधकाम प्रकल्पाचं काम निधीअभावी अपूर्ण स्थितीत आहे. रेणूताईंना इथं एकीकडं शिक्षण घ्यायला येणाऱ्या व दुसरीकडं संस्थेत राहणाऱ्या अशा मुलांचं एक सुंदर घर निर्माण करायचं आहे. यासाठी एकलव्य न्यासाला आर्थिक मदतीची नितांत गरज आहे. समाजाच्या क्रियाशील पाठिंब्याशिवाय वंचित मुलांच्या विकासाचं ध्येय गाठणं अवघड आहे. कुडाळचा प्रकल्प लवकरात लवकर कार्यान्वित व्हावा यासाठी रेणूताई व त्यांचे सहकारी यांचे प्रयत्न सुरू आहेत. ''एकलव्य बाल शिक्षण व आरोग्य न्यास'' ही संस्था दानशूर व्यक्तींच्या देणगीवर उभी आहे, त्यासाठी गरज आहे सामूहिक मदतीची !

‘एकलव्य न्यासा’ला हवी समाजाची साथ...

''एकलव्य बाल शिक्षण व आरोग्य न्यास'' या स्वयंसेवी संस्थेला कोणतंही शासकीय अनुदान नाही. समाजातील दानशूर व्यक्ती व काही संस्था यांच्या मदतीमुळं संस्था चालते. आर्थिक दुर्बल घटकांतील, अनाथ, शाळाबाह्य मुलांसाठी मुलांचं व मुलींचं स्वतंत्र वसतिगृह, अनौपचारिक शाळा, कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र अशा अनेक वास्तू उभारायच्या आहेत. तसंच, संस्थेला भौतिक साधनांची गरज आहे. यासाठी संस्थेला सामूहिक आर्थिक मदतीची खूप गरज आहे. ‘सकाळ’ माध्यम समूहाच्या ''सोशल फॉर अॅक्शन'' या डिजिटल क्राउड फंडिंगच्या प्लॅटफॉर्मवर ''एकलव्य बाल शिक्षण व आरोग्य न्यास''च्या उपक्रमांची माहिती मिळेल. समाजातील दानशूर व्यक्ती, माहिती-तंत्रज्ञान कंपन्या, सीएसआर कंपन्या व परदेशी-भारतीय नागरिक https://socialforaction.com/ या वेबसाइटला भेट देऊन ''एकलव्य बाल शिक्षण व आरोग्य न्यास'' या संस्थेअंतर्गत चालविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती घेऊन, डोनेट नाऊ या बटनवर क्लिक करून थेट वेबसाइटद्वारे देणगी देऊ शकतात. या क्राउड फंडिंगद्वारे देणगी देणाऱ्या प्रत्येक देणगीदारास देणगीची पावती व ८० जी हे प्राप्तिकरात ५० टक्के सवलतीचं प्रमाणपत्र मिळेल.

अधिक माहितीसाठी संपर्क : ८६०५०१७३६६