‘क्ष-किरण’ चीन-भारतावर

Book-introduction
Book-introduction

आशिया खंडातले चीन - भारत हे दोन महत्त्वाचे देश. मात्र यांच्यातले संबंध एखाद्या हिमनगासारखे आहेत. याचा अंदाज बाहेरच्यांना येत नाही, तसेच त्या देशातील नागरिकांनाही पटकन उमगत नाही. भारतीयांच्या मनात चीनबद्दल  पाकिस्तानसारखी कडवटपणाची भावना अगदी खोलवर रुजलेली नाही, अविश्‍वास आणि नाराजी आहे, पण पाकिस्तानइतका कडवा विरोध नाही. त्यामागं त्या देशाबद्दल असलेली अपुरी माहिती आणि उदासीनता ही महत्त्वाची कारणं आहेत. या साऱ्या पार्श्‍वभूमीवर दिल्लीतले ज्येष्ठ पत्रकार विजय नाईक यांचं ‘शी जिनपिंग यांचा विस्तारवादी चीन आणि भारत’ हे पुस्तक भारत आणि चीनबद्दल नेमकी माहिती देतं, आणि या दोन देशांमधले संबंध व त्यातल्या तणावाची कारणं काय असू शकतील याची पुरेशी कल्पनाही आपल्याला येते. 

मुळात चीन हा देश समजून घ्यायला अवघड. त्यानं एकतर आपल्याला जगापासून बंदिस्त ठेवलंय आणि त्याचवेळी हवं तिथं खुलंही केलंय ही कसरत त्याला जमलीय असं नाही तर त्यानं त्या बळावर आंतरराष्ट्रीय पातळीवर आपलं स्थान इतकं उंचावलयं की तो अमेरिकेला त्रास देतोय. अर्थात त्याला अमेरिकेला नुसता त्रास द्यायचा तर नाही तर महासत्ता व्हायचंय. त्या दिशेनं त्याची वाटचाल सुरू आहे. विजय नाईक यांनी या पुस्तकात २२ प्रकरणांमधून भारत आणि चीन यांच्यातला तणाव आणि नेमके संबंध कसे आहेत याचा आढावा तर घेतलाच आहे पण या दोन देशामधील संबंधाकडं कसं पाहायचं याबद्दलही मार्गदर्शन केलंय. केंद्र सरकारनं ज्यावेळी जम्मू आणि काश्‍मीरचं वेगळेपणा जपणारं ३७० कलम रद्द केलं आणि लडाखला केंद्रशासित प्रदेशचा दर्जा दिला, त्यावेळेपासून चीन आणखीनच अस्वस्थ झाला. अर्थात त्याआधी चीननं २०१७ मध्ये भारत - भूतान सीमेवरील डोकलम भागात घुसखोरी करून भारताला अडचणीत आणलं होतं. हा प्रश्‍न सुटायला तब्बल ७२ दिवस लागले. चीनचं गेल्या काही वर्षांत भारताबरोबरचं सामंजस्यांचं धोरण बदललेलं आहे त्याला आशियात आपल्याला विरोध करणारं कुणी नकोय, त्याचबरोबर भारतानं आपल्या वाढत्या ताकदीला मान देऊन या खंडातलं आपल प्रभुत्व मान्य करावं ही चीनची अपेक्षा आहे. चीनला अमेरिकेवर मात करायची आहे त्यासाठी आशियात त्याला कुणी प्रतिस्पर्धी नकोय, चीनचा भारतविरोध आहे तो त्यातूनच आणि भारताची वाढती ताकद त्याला त्यामुळंच खुपत आहे.

शी जिनपिंग यांची त्याच्या पक्षातली आणि चीनचे सर्वशक्तीमान नेते होण्यापर्यंतची वाटचाल नाईक यांनी इथं नेमकेपणानं दिली आहे. जिनपिंग यांनी काही महत्त्वाकांक्षा ठेवून आपले धोरण आखले आहे त्यात त्यांनी काही गोष्टी कशा साध्य केल्या त्याचीही कल्पना येते. ‘बीआर’ आणि ‘सीपेक’ या दोन महाकाय प्रकल्पाला भारतानं विरोध केल्यानं चीनचा भारतविरोधी पवित्रा अधिक कडक  झालाय. त्यात भारतानं जर पाकिस्तान व्याप्त काश्‍मीर ताब्यात घेतला तर ? या शंकेनं चीन अधिकच अस्वस्थ आणि आक्रमक झालाय. चीनला भारताबरोबर सध्यातरी थेट युद्ध नको असेलही पण त्या देशाला भारताबरोबरचा सीमावादही लगेच संपुष्टात आणायचा नाही. चीनला जपान आणि अन्य देशाबरोबर वाद घालण्याची खुमखुमी आहेच त्याचे तो दर्शनही घडवतो. भारत आणि चीनच्या ताकदीत किती फरक आहे तर त्याचे उत्तर एका वाक्यात मिळतं. भारताच्या अर्थव्यवस्थेच्या सध्याच्या आकारमानापेक्षा पाचपट मोठ्या आकारमानाची अर्थव्यवस्था चीनची आहे. त्यामुळं भारताला चीनबरोबर लढताना अनेक बाबींचं भान ठेवावं लागणार आहे.

नाईक यांनी या पुस्तकातल्या २२ प्रकरणांमधून केवळ भारत चीन यांच्यातल्या तणावाचा शोध घेतला असे नाही तर या दोन देशांमध्ये नेमका झगडा कसला आहे आणि भारतीय बाजूने काय सावधानता बाळगावी लागणार आहे त्याचीही कल्पना दिली आहे. चीन आणि भारत संबंधाचा आढावा घेताना त्यांनी उगीच कुणाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केलेलं नाही किंवा कुठल्या राजवटीची बाजू घेतलेली नाही. आज काय करता येईल, काय करायला हवं याचा मार्ग शोधायचा त्याचा प्रयत्न आहे, त्याचबरोबर हा प्रश्‍न नेमका आहे तरी काय त्याच्या नेमक्या बाजू किती आहेत याचा वस्तुनिष्ठ मागोवा त्यांनी घेतलाय. त्यामुळं कारण नसताना कुठल्या तरी बाबींचा अभिनिवेश, कुणाची तरी व्यक्तीपुजा आणि अस्मितेचा जागर आणि आलंकारिक शब्दांची लयलूट असला कादंबरीमय प्रकार इथं काही नाही. जे आहे ते सत्याच्या आणि तर्काच्या कसोटीवर पारखून घेऊन मांडलंय. त्यामुळं या पुस्तकाची माहिती आपल्याला समृद्ध तर करतेचं पण चीनच्या महाकाय ताकदीनं आणि त्या देशानं ती किती अल्पकाळात कशी मिळवली यामुळं चकीत करते.

आंतरराष्टीय संबंधात आणि त्यासंबंधीच्या चर्चांत नेहमीच मोजक्या शब्दात प्रत्येक देश आपल्या भावना व्यक्त करत असतात. प्रत्येक शब्द तोलून मापून वापरलेला असतो. हे पुस्तक त्याची साक्ष पटवतं, कारण इथं जी माहिती आपल्यासमोर येते ती अशीच तोलूनमापून आणि नेमकी पण प्रश्‍नांचं स्वरूप आपल्याला लक्षात आणून देईल अशी आहे. या दोन देशाच्या संबंधाचा हा एक प्रकारे क्ष- किरण अहवालच आहे.

पुस्तकाचं नाव - शी जिनपिंग यांचा विस्तारवादी चीन आणि भारत, चढती कमान... वाढते तणाव 
लेखक - विजय नाईक 
प्रकाशक - रोहन प्रकाशन, पुणे 
(०२०-२४४८०६८६, मुंबई ०२२-२३८९२३७८)
पृष्ठं - २२४ 
मूल्य - २९५ रुपये. 

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com