संत तुकाराममहाराजांशी आत्मीय संवाद ! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

book dear tukoba

जगतगुरू संत तुकाराम अद्‍भूत रसायन आहे. शतके लोटली, संत तुकारामांच्या शब्दांची जादू कायम आहे.

संत तुकाराममहाराजांशी आत्मीय संवाद !

जगतगुरू संत तुकाराम अद्‍भूत रसायन आहे. शतके लोटली, संत तुकारामांच्या शब्दांची जादू कायम आहे. चिरंतन साहित्याचं उदाहरण म्हणून संत तुकारामांच्या गाथेकडं पाहाता येतं. चिरंतन साहित्यात मानवी भाव-भावनांची शाश्वत तत्व असतात. विचार करणाऱ्या सर्वांना सर्वकाळ ते साहित्य आकर्षित करत असतं. चिरंतन साहित्यामधील विचारांवर अखंड चिंतन चालत असतं. साहित्यनिर्मात्याशी अखंड संवाद सुरू असतो.

विनायक होगाडे या तरूण लेखकाचं ''डियर तुकोबा'' हे ताजं पुस्तक म्हणजे संत तुकारामांबद्दल असं चिंतन आहे. संत तुकारामांशी आत्मिय संवाद आहे. हा संवाद वर्तमानाच्या पार्श्वभूमीवर आहे. या चिंतनाला विद्यमान सामाजिक घुसळणीचं नेपत्थ्य आहे. विचारशील तरूण पिढीमधली अस्वस्थता या चिंतनात आणि संवादात आहे. ‘चलता है’, अशी हताश वृत्ती या संवादात नाही. संत तुकाराम ते वर्तमान या पाचशे वर्षांच्या पटलावर समाज म्हणून भौतिक बदल आमुलाग्र झाले; तथापि मानसिक बदलांच्या शिडीवर आपण कुठं आहोत, याची चाचपणी ''डियर तुकोबा''मध्ये आहे. वर्तमान, भूतकाळ आणि भविष्यकाळ या तिन्हींना सामावून घेणारी कल्पनाशक्ती ''डियर तुकोबा''मधल्या तुकोबा आणि नामवंतांच्या संवादात आहे. तुकोबा आणि या नामवंतांच्या भेटीचे संवाद समाजप्रबोधनाचे आहेत. समाजाबद्दलची कळकळ त्यात आहे. म्हणूनच आजचा ''डियर तुकोबा'' म्हणतो, ''नसावी समता फक्त पोथीनिष्ठ''.

समकालीन समाजावर माध्यमांचा कमालीचा प्रभाव आहे. हा प्रभाव समाजाला निर्णय घेण्यास मदत करणारा नाही; तर निर्णयक्षमतेवर परिणाम करणारा आहे. तुम्हाला पटो अथवा न पटो, तुमच्यावर माध्यमांतला आशय येऊन आदळणार आहे. तुम्हाला निर्णयाच्या विशिष्ट बाजूनं हा आशय ढकलणार आहे. अशा परिस्थितीत संत तुकारामांसारखा प्रतिभावंत प्रखर भूमिका घेऊन उभा राहिले, तर आजची माध्यमं त्यांची ''सुनावणी'' कशा पद्धतीनं करतील, याचा ढाचा ''डियर तुकोबा''च्या ''मीडिया ट्रायल'' प्रकरणात आहे. हे प्रकरण खरंतर नाट्यरुपांतराच्या दर्जाचं. विषय जरूर काल्पनिक आहे; तथापि सत्य सार्वकालिक असतं. संत तुकारामांनी विरोध केलेली भोंदूगिरी आजच्या काळातही भोंदूगिरीच आहे. त्यामुळं, ''मीडिया ट्रायल'' भीडणारी ठरते. आजचा तरूण लेखक पाचशे वर्षांपूर्वीच्या संत तुकारामांच्या विचारांना तावून सुलाखून पाहतो आहे आणि त्या विचारांचं चोख सोनं तितकंच लखाखतं आहे, हे ''डियर तुकोबा''चं सार. तुकोबारायांच्या अभंगात सांगायचं, तर अक्षरांचा श्रम केला । फळा आला तेणें नो ।।.

पुस्तकाचं नाव : डियर तुकोबा

लेखक: विनायक होगाडे, पुणे

प्रकाशक : मधुश्री पब्लिकेशन,

पुणे (संपर्क : ८०८७२८८८७२)

पृष्ठं : १६० मूल्य : २५० रुपये.

Web Title: Article Writes Book Dear Tukoba

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Bookarticlesaptarang
go to top