सोनेरी स्वप्नं : नसता ‘ताप’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sickness

शनिवारची पहाट. विस्तवासारखं अंग फणफणलं. थंडी वाजू लागली. अचानक अंगात अशक्तपणा आला. नीट उभंही राहता येईना. डोकं भणभणायला लागलं.

सोनेरी स्वप्नं : नसता ‘ताप’

शनिवारची पहाट. विस्तवासारखं अंग फणफणलं. थंडी वाजू लागली. अचानक अंगात अशक्तपणा आला. नीट उभंही राहता येईना. डोकं भणभणायला लागलं. हातपाय लटलट कापायला लागले. काय होतंय समजेना. शुक्रवारी पावसात भिजलो होतो. आता आपण जाम आजारी पडणार अशी भीती वाटू लागली. डॉक्टरांना फोन केला. डॉक्टर म्हणाले, ‘दहा वाजेपर्यंत या दवाखान्यात.’

भेदरत भेदरत दवाखान्यात पोहचलो. बीपी लो. तापाने शंभरी पार केलेली. चक्कर येत होती. डॉक्टर म्हणले, ‘सलाईन लावू.’ मी होकार दिला. दोन बाटल्या सलाईन भरलं. जरा बरं वाटलं. डॉक्टर म्हटले, ‘फरक पडतोय का बघू नाहीतर डेंग्यू, टायफाईड, मलेरियाची टेस्ट करू.’ मी होकार दिला.

रविवारी पहाटे पुन्हा थंडी, ताप, चक्कर, कणकण. धावत पळत दवाखान्यात गेलो आणि सलाईन लावलं. डेंग्यू, टायफाईड, मलेरियाची टेस्ट केली. आता आपण खूप आजारी पडणार. नियमित व्यायाम करायला पाहिजे होता. पथ्यपाणी पाळायला पाहिजे होतं. चहावर नियंत्रण ठेवायला पाहिजे होतं... असे काय काय विचार मनात यायला लागले. सलाईन संपेपर्यंत रिपोर्ट आले; पण काहीच झालेलं नव्हतं. व्हायरल फिव्हर होता. आता वाईट वाटून घ्यायचं, की आनंदी व्हायचं तेच समजेना. एवढं आजारी पडूनही आपल्याला फक्त ‘व्हायरल फिव्हर’ झालाय याच वाईट वाटू लागलं. दोन दिवसांत चार हजार रुपये घालवले होते. निदान डेंग्यू झाला असता तर पैसे गेल्याचं वाईट वाटलं नसतं.

त्यादिवशी मानवी स्वभावाचा नव्याने उलगडा झाला. आपण पैसे खर्च करायला तयार असतो; पण आजार मोठा पाहिजे. छोट्यामोठ्या आजारांवर पैसा खर्च करणं हमखास जीवावर येतं. माझंही तसंच झालं. घरी आल्या आल्या मस्त कडक चहा ठेवला आणि ठरवलं, की महिन्याभराने हिवाळा चालू झाला की नियमित व्यायाम चालू करायचा. आता मस्त वाटतंय.

टॅग्स :Hospitalarticlehealth