आज जगातील एक तृतीयांश लोकांकडे इंटरनेट नाही. युनायटेड नेशन्सच्या म्हणण्यानुसार, शालेय मुलांपैकी अर्ध्यापेक्षा जास्त मुले इंटरनेटपासून वंचित आहेत. देशो-देशीचे नेते मोठ्या बैठकीत एकत्र येतात. ते ‘एआयचा नैतिक वापर’ किंवा ‘सर्वसमावेशक स्वरूप’ यावर घोषणा करतात. पण या घोषणांमध्ये केवळ शब्दांची गुळगुळीत जुळवाजुळव असते...
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या भविष्याबद्दल सध्या तुफान वेगाने वादविवाद वाढत आहेत. दर आठवड्याला काही मोठ्या, तर काही छोट्या परिषदांचे आयोजन केले जात आहे. सोशल मीडिया अमेरिकेत ओपन एआय कंपनी आणि चीनमध्ये डीपसीक कंपनी यांच्यातील स्पर्धेने भरून गेली आहे. विकासशील देश त्या अत्याधुनिक तंत्रज्ञानापर्यंत पोहोचण्यासाठी कंबर कसत आहेत.
मात्र, या सगळ्या वादात एआय क्षेत्राच्या शिखरावर आणि तळाशी असलेल्या समस्या दुर्लक्षिल्या जात आहेत. शिखरावर सर्वांत मोठी भीती अशी आहे की, एआय कदाचित मानवांपेक्षा अधिक शक्तिशाली होईल. हे २०३० किंवा २०३५ पर्यंत घडू शकते.
आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स (एजीआय) तयार झाला, तर तो आपल्याला गुलाम बनवू शकतो. त्याच्यापासून पृथ्वीवरील सर्व जीवन संकटात पडू शकते. त्याला अण्वस्त्र नियंत्रित करण्याची क्षमता मिळाल्यास तो कोणत्याही सरकारच्या परवानगीशिवाय महायुद्ध सुरू करू शकतो आणि आणि संपूर्ण जगाचा नाश करू शकतो.
तळाशीही आहे धोका...
तळाशीही एक गंभीर धोका उभा आहे. तो असा की, लाखो लोकांना प्राथमिक तंत्रज्ञान शिकता येणार नाही. दोन अब्जाहून अधिक लोक तांत्रिकदृष्ट्या मागासलेले आहेत. यामुळे एक जागतिक जातिव्यवस्था निर्माण होईल. यात संगणक, इंटरनेट आणि स्मार्टफोन नसलेले लोक संपूर्णपणे वगळले जातील.
आज जगातील एक तृतीयांश लोकांकडे इंटरनेट नाही. युनायटेड नेशन्सच्या म्हणण्यानुसार, शालेय मुलांपैकी अर्ध्यापेक्षा जास्त मुले इंटरनेटपासून वंचित आहेत. देशो-देशीचे नेते मोठ्या बैठकीत एकत्र येतात. ते ‘एआयचा नैतिक वापर’ किंवा ‘सर्वसमावेशक स्वरूप’ यावर घोषणा करतात. पण या घोषणांमध्ये केवळ शब्दांची गुळगुळीत जुळवाजुळव असते.
हे नेते मानवता संपूर्णपणे संकटात येऊ शकते असे अस्तित्ववादी धोके ओळखत नाहीत. त्यांना ज्यात संगणक आणि इंटरनेट न वापरणारे लोक तंत्रज्ञानापासून वंचित ठेवले जातील, अशा नव्या जातिव्यवस्थेचा धोका समजत नाहीत.
डेमिस हस्साबिस नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ आहेत. यांनी आपल्या शरीरातील प्रथिनांचे अचूक स्वरूप समजून त्यावर आधारित औषधांचा शोध घेण्यासाठी ‘एआय’चा विकास केला आहे. त्यांनी ‘एआय’च्या जागतिक प्रशासनासाठी प्रस्ताव तयार केला आहे. याचा उद्देश संपूर्ण ‘एआय’च्या प्रभावावर देखील नियंत्रण ठेवणे आहे.
गेल्या दोन वर्षांत मी अण्वस्त्रांमध्ये ‘एआय’च्या वापराचे नियमन करण्यासाठी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगामध्ये (आयएईए) एक विभाग तयार करू शकतो का, असे अनेक महासत्तांच्या तज्ज्ञांना विचारले. सर्वांचा ठाम उत्तर असे होते की, हे अशक्य आहे. मात्र, डिसेंबरमध्ये, मला मोहम्मद एल. बारदाई, नोबेल पारितोषिक विजेते आणि ‘आयएईए’चे माजी प्रमुख, यांच्याशी संवाद साधता आला.
त्यांनी सांगितलं की, हे पूर्णपणे शक्य आहे. मी दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रिया सरकारच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याला हेच विचारले. त्यांना अनेक दशके आयएईएशी व्यवहार करण्याचा अनुभव होता. ते म्हणाले की, ते शक्य आहे आणि इष्ट आहे. एक ठराविक विभाग बनवून, एआय आणि अण्वस्त्रे यांच्यातील इंटरफेसचे नियमन करून सुरुवात करू शकतो. त्याच वेळी आपण एआयच्या जागतिक नियंत्रणाविषयी डेमिस हसाबिसच्या प्रस्तावाबद्दल वाटाघाटी सुरू केल्या पाहिजेत.
प्रयोग नाशिकच्या सचिन जोशींचा
शिखरावर असे प्रयत्न करत असताना तळाशी असलेल्या मुद्द्यांबद्दल देखील आपण विचार केला पाहिजे. मागील आठवड्यात तळाशी असलेल्या समस्येसाठी एक प्रेरणादायक उपाय सापडला. सचिन जोशी हा नाशिक येथील एक तरुण शिक्षणतज्ज्ञ. त्याने एक अभिनव उपाय राबवला आहे. महाराष्ट्रातील इतर शहरांप्रमाणेच नाशिकमध्येही हजारो मुले संगणक आणि इंटरनेटच्या सुविधांपासून वंचित आहेत.
ही मुले महापालिका आणि जिल्हा परिषद शाळांमध्ये शिकतात. या शाळांमध्ये मूलभूत सुविधा नाहीत. पाचव्या इयत्तेतील मुलांकडे जी दुसरी इयत्तेत असायला हवीत अशी वाचन आणि गणित यातील कौशल्ये नसतात. अशा मुलांना एआय साधनांचे प्रशिक्षण देता येईल का? किंवा त्यांना जगातील अत्याधुनिक तंत्रज्ञानापासून कायमच दूर ठेवायचे का?
सचिन जोशीने एक अत्याधुनिक ‘AI on Wheels’ नावाची बस तयार केली आहे. या बसमध्ये संगणक, रोबोटिक्स प्रयोगशाळा, टॅब्लेट, लॅपटॉप, उच्च गतीचे इंटरनेट, सौर ऊर्जा आणि इतर अनेक सुविधा आहेत. ही बस नाशिकच्या झोपडपट्टीमध्ये जाते, जिथे ती मुलांना वाचन, लेखन आणि गणित शिकवते.
बसमधील शिक्षक मुलांना ‘एआय’च्या साधनांचा वापर करून त्यांना अनेक सर्जनशील क्रियाकलाप शिकवतात. हे लक्षात घेतल्यास, ही बस नाशिकमधील डिजिटल अंतर कमी करू शकते आणि येत्या एक-दोन वर्षांत नाशिकच्या गरीब मुलांमध्ये परिवर्तन घडवून आणेल, असा मला विश्वास आहे.
अशा संकल्पनेला लाखो मुलांचे जीवन बदलण्याची क्षमता असली, तरी एकटा सचिन जोशी त्यापेक्षा अधिक काही करू शकणार नाही. यासाठी आपल्याला भारतात अशा शेकडो मोबाईल शाळांची आवश्यकता आहे. गरीब लोकांनाही जगातील सर्वोत्तम तंत्रज्ञानाचा उपयोग करण्याचा हक्क आहे.
तसेच, शिखरावर घडणाऱ्या घटना आणि तळाशी उभ्या असलेल्या समस्यांमध्ये संतुलन राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. डेमिस हस्साबिस यांच्या प्रस्तावास योग्य मार्गाने लागू करण्याची वेळ आली आहे. डेमिस हसाबिस आणि सचिन जोशी एकाच साखळीची दोन टोके आहेत. आपल्याला ‘एआय’ने आपले भविष्य सकारात्मक रीतीने घडवायचे असल्यास आपल्याला दोन्ही बाजूंची काळजी घेणे आवश्यक आहे.
(लेखक स्ट्रॅटेजिक फोरसाइट ग्रुपचे अध्यक्ष आहेत आणि A World Without War या पुस्तकाचे लेखक आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.