परंपरा अफगाणिस्तानातल्या गुरुद्वारांची !

अफगाणिस्तानमधल्या पूर्वेकडील पाकतिया प्रांतातील निशाण साहिब हे शिखांचे पवित्र चिन्ह तालिबान्यांनी नुकतेच काढून टाकले.
Afghan Hindus and Sikhs
Afghan Hindus and SikhsSakal

अफगाणिस्तानमधल्या पूर्वेकडील पाकतिया प्रांतातील निशाण साहिब हे शिखांचे पवित्र चिन्ह तालिबान्यांनी नुकतेच काढून टाकले. भारत सरकारने त्याला आक्षेप घेतल्यानंतर ते परत लावण्यात आले. अफगाणिस्तानमधील अनेक शहरात व गावांमध्ये अनेक ऐतिहासिक गुरुद्वारा आहेत. युद्धामुळे अफगाणिस्तानातून अनेक हिंदू व शीख कुटुंबांना देश सोडावा लागला व त्यापैकी अनेक गुरुद्वारांचे नुकसान झाले. हा इतिहासाचा महत्त्वाचा भाग असून नेमका तोच नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. अनेक गुरुद्वारांना ऐतिहासिक महत्त्व असून अफगाणिस्तानमधील शीख आणि हिंदूंच्या वास्तव्याचा तो पुरावा आहे. ‘ श्री गुरू ग्रंथसाहिब’ व ‘ दशम ग्रंथ’ या शिखांच्या पवित्र ग्रंथाच्या हस्तलिखिताच्या प्रती काही गुरुद्वारांमध्ये आहेत.

अहमद शहा अब्दाली यांच्यावर संशोधन करण्यासाठी १९५२ मध्ये अफगाणिस्तानात गेलेले प्राध्यापक गंडासिंग यांनी लिहिलेल्या ‘अफगाणिस्तान दा सफर’ मध्ये अफगाणिस्तानीतील गुरुद्वारांसंबंधी खरी माहिती उपलब्ध आहे. नवी दिल्लीतील प्रकाश अँड कंपनीने ते १९५४ मध्ये प्रकाशित केले होते. अफगाणिस्तानातील शीख लेखक इंद्रजित सिंग यांनीही आपल्या ‘अफगाण हिंदूज अँड सिख : हिस्टरी ऑफ ए थाउजंड इअर्स (पहिल्यांदा २०१९ मध्ये प्रकाशन) यामध्ये अफगाणिस्तानातील शीख समाजावर प्रकाश टाकला आहे. प्रो. गंडासिंग यांनी अफगाणिस्तानातील वास्तव्यात अनेक शहरांना भेटी दिल्या. या भेटींवर आधारीत त्यांनी तेथील गुरुद्वांरांसबंधी पुस्तकात सविस्तर माहिती दिली आहे. काबूलमध्ये सात, कंदाहारमध्ये पाच आणि गझनी, जलालाबाद व सुलतानपूर येथे प्रत्येकी एक गुरुद्वारा आहे. याशिवाय लहान शहरे व गावांमध्येही गुरुद्वारा आहेत, असे गंडासिंग यांनी लिहिले आहे.

कंदाहारमधील पाच गुरुद्वारांना ‘धरमसाल’ म्हणून ओळखले जाते. गंडासिंग यांनी १९५२ मध्ये ५ सप्टेंबरला तिथं भेटी दिल्या व त्यासंबंधी लिखाण केले. धरमसाल श्री गुरू नानक साहिब काबुली बाजार येथे आहे. सुथरीन दी धरमसाल, वाडी धरमसाल आणि छोटी धरमसाल शिकारपुरी बाजार येथे आहेत. कंदाहारमधील पाचवा गुरुद्वारा धरमसाला ऑफ मसंद म्हणून ओळखला जातो, असे गंडासिंग यांनी नमूद केले आहे. वाडी धरमसाल ऑफ श्री चंद (गुरू नानक यांचा मुलगा, ज्यांनी अफगाणिस्तानला भेट दिली होती) म्हणून प्रसिद्ध आहे. वाडी या शब्दाचा अर्थ मोठा असा आहे. गुरू ग्रंथ साहिबचे जुने हस्तलिखितही आहे, जे १७२५ मध्ये नववे गुरू तेज बहादूर यांच्या काळात लिहिले होते, असे गंडासिंग यांचा संदर्भ देऊन इंग्रजीत सिंग यांनी लिहिले आहे. गझनीमध्ये, १९५२ मध्ये ७ सप्टेंबरला गंडासिंग यांनी जुन्या गुरुद्वाराला भेट दिली. या गुरुद्वारामध्ये गुरू ग्रंथ साहिबची सात आणि दशम ग्रंथचे एक हस्तलिखित आहे.

गझनीमधील दुसऱ्या गुरुद्वाराला गुरुद्वारा कोटलासाहिब म्हणून ओळखले जाते व तो गझनी शहराच्या बाहेर दोन किलोमीटरवर आहे. जलालाबाद येथे सुद्धा मोठे गुरुद्वारा आहे (गुरू नानक दरबार) जे खालसा दिवाण यांच्या व्यवस्थापनाखाली आहेत. गंडासिंग यांनी म्हटले आहे की, अफगाणिस्तानमधील शीख समुदायाला आपल्या धर्माबद्दल प्रचंड आदर आहे आणि ते गुरुद्वारामधील सकाळचा धार्मिक कार्यक्रम चुकवत नाहीत. दुर्दैवाने, जद मेवान येथील ‘गुरुद्वारा गुरुनानक’ हा अफगाणिस्तानातील जुना ऐतिहासिक गुरुद्वारा, १९५९ मध्ये रस्ता रुंदीकरणात पाडला गेला, असे इंद्रजित सिंग यांनी लिहिलं आहे. गुरुद्वारा गुरू नानक नंतर शोर बाजार येथील (काबूल) गुरुद्वारा खालसा (देरा भाई गुरुदास) हा सर्वांत जुना गुरुद्वारा आहे. गुरू हरगोविंद यांच्या काळात (१६०६-४४), भाई गुरुदास अफगाणिस्तानात आले व त्यांनी तो बांधला होता. शोअर बाजार येथील आणखी एका गुरुद्वाराला गुरुद्वारा बाबा सीरी चंद म्हणून ओळखले जाते. बाब अलमस्त यांनी त्याची स्थापना केली होती. येथे गुरू ग्रंथ साहिबची दोन हस्तलिखिते आहेत आणि त्यातील एक ख्रिस्त पूर्व १८६१ काळातील आहे. काबूलमधील आणखी एक गुरुद्वारा जो गुरुद्वारा बाबा गंज बक्ष म्हणून ओळखला जातो. गुरुदासपूर येथील बाबा गंज बक्ष यांचे नाव त्याला दिले आहे. या गुरुद्वारामध्ये ग्रंथ साहिबची तीन हस्तलिखितं आहेत आणि त्यातील एक ख्रिस्तपूर्व १७४९ काळातील आहे.

सारीया लोहोरिया येथील गुरुद्वारा भाई पिराना हा भाई पिराना यांच्या नावाने ओळखला जातो. ते गुरू अरजन आणि गुरू हरगोविंद यांच्या काळातील प्रसिद्ध शीख व उपदेशक होते, असे इंद्रजित सिंग यांनी लिहिले आहे. ते संत आणि सैनिकही होते. मोघलांविरुद्धच्या लढाईत त्यांनी गुरू हरगोविंद यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून लढा दिला होता.

गंडासिंग यांच्या म्हणण्यानुसार काबूल, कंदाहार, जलाबाद, गझनी आणि इतर शहरांत मिळून सुमारे सहा ते सात हजार शीख व हिंदू राहात होते, असे इंद्रजित सिंग यांनी म्हटले आहे. त्यातील काही जण गावांमध्येही राहात होते. गुरू ग्रंथ साहिबच्या हस्तलिखितावरील तारखा हा अफगाणिस्तानमधील शीखांच्या वास्तव्याचा ठळक पुरावा आहे. गंडासिंग यांनी कर्तारसिंग नावाच्या इसमाच्या घराला भेट दिली होती, जे काबूल येथील हिंदू गुज्जर राहात असलेल्या भागात राहात होते. त्यांच्याकडे गुरू ग्रंथ साहिबची प्रत होती ज्यावर गुरू गोविंद सिंग (१६७५-१७०८) यांची स्वाक्षरी होती.

(सदराचे लेखक दिल्लीतील ‘विचार विनिमय केंद्रा’चे संशोधन संचालक आहेत)

(अनुवाद : गणाधीश प्रभुदेसाई)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com