‘त्यांची’ मोहीम अपप्रचाराची...

अरुण आनंद saptrang@esakal.com
Sunday, 7 March 2021

परिघाबाहेरून 
रिसर्च इन्स्टिट्यूट फॉर युरोपीय अँण्ड अमेरिकन स्टडीज (आयआयइएएस) या अथेन्सस्थित ‘विचार गटा’च्या एका अहवालानुसार तुर्कस्तान तसेच जागतिक प्रसार माध्यांमावर प्रभाव टाकण्यासाठी पाकिस्तान व तुर्कस्तानमधील गुप्तचर यंत्रणा सक्रिय असून त्यांचे याबाबत लागेबांधे आहेत.

रिसर्च इन्स्टिट्यूट फॉर युरोपीय अँण्ड अमेरिकन स्टडीज (आयआयइएएस) या अथेन्सस्थित ‘विचार गटा’च्या एका अहवालानुसार तुर्कस्तान तसेच जागतिक प्रसार माध्यांमावर प्रभाव टाकण्यासाठी पाकिस्तान व तुर्कस्तानमधील गुप्तचर यंत्रणा सक्रिय असून त्यांचे याबाबत लागेबांधे आहेत. तुर्कस्तानमधील प्रमुख सरकारी वृत्तसंस्थांनी पाश्‍चिमात्य पत्रकारांची नियुक्ती करायचं थांबवून, पाकिस्तानी किंवा काश्मीरमधील पत्रकारांची मोठ्या प्रमाणावर नियुक्ती करण्याचं धोरण अवलंबलं आहे. ‘एमआयटी’ ही तुर्कस्तानची गुप्तचर संस्था पाकिस्तानच्या ‘आयएसआय’ या गुप्तचर संस्थेबरोबर काम करीत असून तुर्कस्तान रेडिओ ॲण्ड टेलिव्हिजन (टीआरटी) वर्ल्ड आणि ‘एनाडोलू एजन्सी’च्या माध्यमातून प्रचाराचे नवीन जाळे तयार केले जात आहे. एका खास प्रक्रियेद्वारे प्रचारासाठी फळी तयार केली जात आहे. २०१३-१४ मध्ये तुर्कस्तानचे अध्यक्ष रिसीप तय्यीप एर्दोगान यांनी स्वतःकडं मुस्लीम जगताचं नेतृत्व असल्याचा दावा करायला सुरुवात केली. त्यावेळेपासून हा प्रचाराचा प्रकार सुरू झाला. एर्दोगान राजवटीतील एक आघाडीची संघटना असलेल्या ‘तुर्कस्तान युथ फाउंडेशन’ला (टीयुजीव्हीए) एर्दोगान यांनी सूचना केल्या की, जागतिक पातळीवर त्यांची (एर्दोगान) प्रतिमा उजळविण्यासाठी प्रचार सुरू करा. त्यादृष्टीने जोरदार प्रयत्न झाले, मात्र एर्दोगान यांची प्रतिमा आंतरराष्ट्रीय पातळीवर सिद्ध करण्यास अपयश आले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

त्यानंतर एर्दोगान यांनी एक नवीन योजना आखली. यासाठी त्यांनी ‘ इंटर सर्व्हिस पब्लिक रिलेशन्स’ (आयएसपीआर) या पाकिस्तानी संस्थेची मदत घेण्याचे ठरविले. गुप्त कार्यक्रमाच्या माहितीची देवाण-घेवाण करण्यासाठी ‘टीआरटी वर्ल्ड’ ची ‘नोडल एजन्सी’ म्हणून नियुक्ती केली. ‘टीआरटी’ने २०१५ मध्ये जेव्हा पाकिस्तानातून नोकरभरतीस सुरुवात केली, तेव्हा पाकिस्तानी नागरिकांना मोठं आश्‍चर्य वाटलं. कारण असं यापूर्वी घडलं नव्हतं. आत्तापर्यंत चांगले ब्रिटिश आणि अमेरिकी इंग्रजी उच्चारण करू शकणाऱ्या लोकांचीच निवड करणाऱ्या ‘टीआरटी’कडून त्यांना थेट नोकरीची संधी उपलब्ध होत होती. 

तथापि, अगदी ताज्या बातमीनुसार ‘माहिती योद्धे’ म्हणून पाया तयार करण्यासाठी तुर्कस्तानने दोन मोठ्या सरकारी वृत्तसंस्थांमध्ये ‘आयएसआय प्रोक्सी’ना पत्रकार म्हणून नियुक्त करून पाकिस्तानबरोबर काम करण्यास सुरुवात केली आहे. अपप्रचारासाठी  एक प्रकारे सैन्य तयार करण्यासाठी हे पहिलं पाऊल असल्याचं पाश्चात्त्य माध्यमांना वाटते. एर्दोगान यांनी ‘तुर्कस्तान इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन सेंटर’ थेट ‘एमआयटी’च्या अखत्यारीत आणले आहे. आणखी एका माहितीनुसार, तुर्कस्तानमधील पाकिस्तानी राजदूतांनी ३० नोव्हेंबर २०२० रोजी एनाडोलू एजन्सीला भेट दिली. सूत्रांनुसार, काश्मीरबाबत सध्या सुरू असलेला युक्तिवाद व फ्रान्सवरील बहिष्कार आणखी तीव्र करण्यासाठी प्रचाराची मोहीम आखण्यासंबंधी यावेळी बैठक झाली. हा दावा अंशतः खरा असल्याचा दुजोरा ‘एनाडोलू एजन्सी’ने दिला. पाकिस्तानी राजदूतांना सविस्तर माहिती देण्यासाठी ‘एनाडोलू’चे आंतरराष्ट्रीय वृत्त संपादक फारुख तोकट व इंग्लिश न्यूज डेस्कचे संपादक सॅतुक बुग्रा कुटलुगन यावेळी उपस्थित होते. 

सप्तरंगमधील आणखी लेख वाचण्यासाठी क्लिक करा. 

‘टीआरटी वर्ल्ड’ने ३०० कर्मचाऱ्यांपैकी ५० पाकिस्तानींची नियुक्ती केली आहे. यामध्ये बातमीदार, निर्माते आणि इस्तंबूल येथील संपादकांचा समावेश आहे. याशिवाय काश्मीरमधील अनेकांना पत्रकार म्हणून नियुक्त केले आहे. ‘टीआरटी वर्ल्ड’ने प्रसिद्ध केलेल्या ऑनलाइन लेखातील मजकुरानुसार या पत्रकारांनी पाच प्रमुख विषय हाताळले  आहेत. त्यात ‘ऑटोमन सिंबॉल्स हाजिया सोफिया अँण्ड  केरिया म्युझियम’, सीरिया व येमेनमधील सौदी अरेबियाची भूमिका, नागोर्नो-काराबाख वाद, तुर्कस्तान, पाकिस्तान व मलेशियाचे बिगर अरब इस्लामिक गट, आणि जम्मू व काश्‍मीर यांचा समावेश आहे.

हाजिया सोफियाबाबत एर्दोगान यांनी घेतलेल्या निर्णयाची प्रशंसा करणारे कमीत कमी ३१ लेख ‘टीआरटी वर्ल्ड’ने प्रसिद्ध केले. तसेच येमेन संघर्षावर सौदी अरेबियाच्या विरोधी भूमिकेवर तब्बल ९७२ बातम्या तयार केल्या. ओटोमनच्या प्रतिष्ठेला सौदी अरेबिया व युएईकडून कसा धक्का लावला जात आहे, त्यावरही ‘टीआरटी’ने काही लेख प्रसिद्ध केले आहेत. नोगोर्नो-काराबाखवर ६५ बातम्या आणि तुर्कस्तान-पाकिस्तान-मलेशिया युतीसंबंधी सुमारे ३० छोटे लेख प्रसिद्ध केले आहेत. जम्मू व काश्‍मीरमधून ३७० व ३५ अ कलम रद्द करण्याच्या भारताच्या निर्णयावरही ‘टीआरटी वर्ल्ड’ने ३० मोठ्या बातम्या दिल्या, त्यातील १४ बातम्यांची शिफारस पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाने 
केली होती. 

भाषाशास्त्रज्ञांनी तर धोकादायक सत्य पुढे आणलं आहे. नावासह लिहिलेल्या लेखांव्यतिरिक्त, अनेक लेख एकाच गटाच्या पत्रकारांनी जे वेगवेगळ्या देशांविरुद्ध लिहिलेले असतात. मात्र त्यावर लेखकांची नावे नमूद केलेली नसतात. यामागे एक कारण म्हणजे त्याची जबाबदारी नाकारता येते, तसेच जगात कुठेही तो उपलब्ध होऊ शकतो. तुर्कस्तानच्या सूत्रांनुसार, एर्दोगान यांनी सुरु केलेल्या सुनियोजित प्रयत्नांचा भाग म्हणून बराचसा मजकूर हा ‘टीआरटी वर्ल्ड’ व ‘एनाडूल’ने लेखकांच्या नावाशिवाय प्रसिद्ध केला आहे. 

एर्दोगान यांचा जो ‘खिलाफत प्रकल्प’ आहे त्याला पाठबळ देण्यासाठी तुर्कस्तान व पाकिस्तान एकत्र आले आहेत. वास्तविक ते मित्र नाहीत. पण, ‘खिलाफती’च्या नावाखाली एकत्र आले आहेत. खिलाफत प्रकल्पाला मानणाऱ्या कोणालाही आश्रय देण्याचे एर्दोगान यांचे धोरण आहे आणि अशा लोकांना हुडकणे व त्यांची नियुक्ती करण्याचे काम ‘आयएसआय’ करत आहे. 

(लेखक दिल्लीतील विचार विनिमय केंद्राचे संशोधन संचालक आहेत) 
(अनुवाद : गणाधीश प्रभुदेसाई)

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Arun Anand Writes about turkestan and pakistan