esakal | विचार लादू नकात ! (अरुण नलावडे)
sakal

बोलून बातमी शोधा

Arun-Nalawade

मुलांना मग ती मुलगी किंवा मुलगा असो त्यांना जन्म देणारे ‘ पालक’ असतात आणि जन्म दिल्यानंतर मुलाची जबाबदारी स्वीकारणं,  उत्तम संस्कार देणं, चांगल्या आचार-विचारांनी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देणं म्हणजे ‘पालकत्व’ होय. हे समजून मुलांना वाढवलं तर एक उत्तम संस्कारी पिढी नक्कीच तयार होईल.

विचार लादू नकात ! (अरुण नलावडे)

sakal_logo
By
अरुण नलावडे saptrang.saptrang@gmail.com

मुलांना मग ती मुलगी किंवा मुलगा असो त्यांना जन्म देणारे ‘ पालक’ असतात आणि जन्म दिल्यानंतर मुलाची जबाबदारी स्वीकारणं,  उत्तम संस्कार देणं, चांगल्या आचार-विचारांनी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देणं म्हणजे ‘पालकत्व’ होय. हे समजून मुलांना वाढवलं तर एक उत्तम संस्कारी पिढी नक्कीच तयार होईल.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

माझे वडील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक होते, त्यामुळं लहानपणापासून त्यांनी मला शिस्त लावली. संघाच्या शाखेत जायचं याबाबत ते आग्रही होते. लहान असताना, शाखेत काय जायचं ? असं मला वाटायचं, पण जसं मी तिथं जावू लागलो तसा मला तिथल्या वातावरणाचा फायदा जाणवू लागला. कारण लहानपणी मी खूप दंगेखोर होतो, मी त्यावेळी शाखेत गेलो नसतो तर आज खूप वेगळा झालो असतो. पण शाखेत नियमित जाण्याची शिस्त मला वडिलांनी लावली. त्यांनी शिकवलेली दुसरी गोष्ट म्हणजे भाषणाची कला अर्थात वक्तृत्व !. मला ते वेगवेगळ्या स्पर्धांमधून भाग घ्यायला लावायचे, स्वतः भाषणं लिहून द्यायचे आणि पाठ करवून घ्यायचे, त्याच बरोबर कसं बोलायचं, उच्चार कसे असावे हे देखील सांगायचे. वडिलांनी मला भारतीय खेळांची आवड लावली.

कबड्डी, आट्यापाट्या, लंगडी, खो-खो, हे खेळ त्यांनी मला शिकवले. ते स्वतः आंतरराष्ट्रीय पातळीवरचे प्रशिक्षक होते आणि राष्ट्रीय पातळीवरही त्यांनी बरीच बक्षिसं, पदकं मिळवली होती. ते कडक शिस्तीचे होते आणि आम्ही मुलांनी त्यांच्या संपूर्ण आचरणाचं अनुकरण आणि एकूण जीवनपद्धतीच आम्ही आत्मसात करावी ही त्यांची अपेक्षा होती. त्यांनी अपेक्षा ठेवलेल्या बाबींपैकी मी सर्व गोष्टी शंभर टक्के केल्या नसतील पण सत्तर टक्के मात्र नक्की केल्या आणि त्याचा मला आजही खूप फायदा होत आहे. तुम्ही समूहामध्ये जाता तेव्हा कसे वागतात, कसे बोलतात, कसे बसता या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात, पण त्या खूप गृहीत धरल्या जातात असं मला आजही जाणवतं. त्यावेळी ज्या गोष्टी शिकण्याच्या राहून गेल्या तिथं मला अजूनही अडचण येते आणि त्या शिकल्या नसल्याचं वाईट वाटतं. ज्येष्ठांकडून अशी शिकवण प्रत्येकानं घेतली पाहिजे असं मला वाटतं. त्यांचे जे चांगले गुण आहेत ते आपण आत्मसात केले पाहिजेत. त्याचा भविष्यात नक्कीच फायदा होतो.

काळानुसार जीवनशैलीत बदल झाला आहे, त्यामुळं काही ठिकाणी मी स्वतःमध्ये बदल केले आहेत, पण माझ्यात जी शिस्त भिनलेली आहे ती मोडत नाही, हा त्यातला एक महत्त्वाचा भाग आहे. कारण काळ बदलला तरी काही मूलभूत तत्त्व असतात ती कायम महत्त्वाची असतात आणि ती स्वतःमध्ये रुजवता आली पाहिजेत. या गोष्टी शिकल्या आणि सोडून दिल्या तर काहीच फायदा नाही. वडिलांच्या एकूणच वागणुकीचा, विचारांचा आणि शिस्तीचा माझ्या आयुष्यावर खूप प्रभाव पडलाय. वडील खूप मोठे कार्यकर्ते होते, पण मुलाच्या यशासाठी, मानसिक जडणघडणीसाठी ते कायम वडील म्हणूनच वागले.

मला लहानपणाचा एक प्रसंग आठवतो, माझ्या आयुष्यातली ती पहिलीच वैयक्तिक अभिनय स्पर्धा होती. आचार्य अत्रेंच्या नावाने ती स्पर्धा होती आणि त्यात मी "तो मी नव्हेच" या नाटकातील एक प्रसंग बसवून घेतला होता. स्पर्धेच्या ठिकाणी गेल्यावर मला लक्षात आलं की आणखी एक मुलगा मी करणार असलेलाच प्रसंग सादर करणार आहे. महत्त्वाचं म्हणजे त्याच्याकडे त्या व्यक्तिरेखेप्रमाणं लागणारे सगळे कपडे (कॉस्च्युम) होते. तसे कपडे भाड्याने घेण्याइतकीही आमची परिस्थिती नव्हती, त्यामुळे मी केवळ अभिनयातून ती व्यक्तिरेखा सादर करायच्या पातळीवर तयार होतो. आपल्याकडे साजेसे कपडे नाहीत याचं मला खूप वाईट वाटत होतं आणि त्याचं आपल्यापेक्षा खूप चांगलं होणार याची मला अगदी खात्री होती. मी वडिलांना तसं सांगितलं. त्यावर ते म्हणाले, ‘‘ठीक आहे, बघू आपण." आयोजकांकडून त्या मुलाचं सादरीकरण केव्हा आहे हे ते बघून आले. ते माझ्या आधी होतं हे समजल्यावर त्या मुलाला वडील भेटले आणि त्याला म्हणाले," माझा मुलगा पण नाटकातील हाच भाग करत आहे, पण त्याचा नंबर तुझ्यानंतर आहे. तुझं काम झाल्यावर तू हा पेहेराव थोड्या वेळासाठी माझ्या मुलाला देशील का?" तो मुलगा द्यायला तयार झाला. ठरल्याप्रमाणे वडील त्याच्याजवळ पुन्हा गेले, तो सगळा पेहराव त्याच्याकडून घेतला, माझ्या अंगावर घातला, तो सगळा साधूचा पेहेराव होता. घातल्यावर मला म्हणाले,‘‘ जा आता आणि उत्तम सादर कर" तो वेष धारण केल्यावर मला इतकं स्फुरण आलं की आधीची माझी केविलवाणी स्थिती एकदम  बदलली, माझ्यात खूप आत्मविश्वास आला आणि मी ती स्पर्धा जिंकली. ते माझ्या आयुष्यातलं पहिलं पारितोषिक होतं.

माझ्या वडिलांनी आपल्या मुलासाठी याचना करणं, माझा आत्मविश्वास कमी होऊ न देणं यासाठी प्रयत्न करणं आणि मी त्यात बक्षिस मिळवणं ही खूप मोठी गोष्ट होती, ती बाब कायम माझ्या लक्षात राहिली. जगात, समाजात चांगलं काय आहे ते त्यांनी मला शोधायला शिकवलं. मी कोणत्या मुलांमध्ये खेळतो, काय करतो याकडं त्यांचं बारीक लक्ष असायचं. लहानपणी मी खूप मस्तीखोर आणि द्वाड होतो. वडील मला म्हणाले होते," इकडे तिकडे मस्ती करत तुझी ऊर्जा खर्च करण्यात तुला आता मजा येत आहे, पण यामुळे तुझ्या आयुष्याचं खूप नुकसान होईल. तुला धाडस करायला आवडतं, पण हे धाडस कुठल्या गोष्टीसाठी करायचं याचं भान ठेवलं पाहिजे. तुझा हा धाडसीपणा, ही ऊर्जा चांगल्या गोष्टींसाठी वापरून बघ म्हणजे ती गोष्ट अधिक सुंदर बनवता येईल." त्यांचा हा विचार मला खूप भावला आणि माझ्या जगण्याची दिशाच बदलून गेली. मी अजूनही संघाशी संबंधित आहे. माझे वडील किती मोठे होते ते आताशी मला कळू लागलं आहे. उत्तन येथे संघपरिवारातील संस्थेकडून उभारण्यात आलेल्या ‘केशवसृष्टी’ या मोठ्या प्रकल्पाचे ते संस्थापक सदस्य आहेत. त्यांनी यासाठी खूप काम केलं आहे.

माझ्यातला कलाकार आत्तापर्यंत जिवंत राहिला आहे याचं कारण म्हणजे वडिलांचा भरपूर पाठिंबा. ते मला सिनेमा, नाटक बघायला घेऊन जायचे, भाषणं तयार करून घ्यायचे. संघाच्या शिस्तीबरोबर त्यांनी मला खरं बोलण्याची शिस्त लावली. त्यांच्या सोबत खेळायला न्यायचे, कारण ते स्वतः कबड्डी, व्हॉलिबॉल चॕम्पियन होते. या सर्व गोष्टी त्यांनी माझ्यात उतरवल्या. मी त्यांच अनुकरण करत असतो असं म्हटलं तरी चालेल.

सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचा त्यांची क्षमता खूप मोठी होती, तेवढी माझ्यात क्षमता नाही, त्याबाबतीत माझी क्षमता त्यांच्या तुलनेत निम्मीच आहे. मला सामाजिक उपक्रम आवडतात, ती सवय वडिलांनीच लावली. समाजात सगळंच वाईट नाहीये, तू चांगलं शोध. त्यासाठी वेगळ्या दृष्टीने तुम्हांला बघता आलं पाहिजे,असं ते सांगायचे. आडलेल्या लोकांपर्यंत तू पोहोच, तुला त्यातून आर्थिक दृष्ट्या काय मिळणार आहे ते अजिबातच महत्त्वाचं नाही, पण तू केलेल्या चांगल्या कामाचं कोणीतरी अनुकरण करेल आणि चांगल्या लोकांची पुढे समाजात एक साखळी तयार होईल. या त्यांनी सांगितलेल्या गोष्टी मी आत्मसात करण्याचा प्रयत्न करतो.

काळ बदलला तसा प्रत्येक गोष्टीत बदल होत गेला. आमची आर्थिक परिस्थिती सुधारली. त्यामुळे माझ्या मुलीला तनयाला थोडं सुबत्तेत वाढवता आलं. माझ्या कामाच्या व्यस्ततेमुळे मी तिला जास्त वेळ देऊ शकलो नाही, पण ती सगळी बाजू माझ्या पत्नीनं म्हणजे अंजलीनं सांभाळली. त्यासाठी तनया अकरावीत असताना तिनं नोकरीही सोडली. मी कामात असलो तरी माझं घराकडं, मुलीकडं व्यवस्थित लक्ष असायचं आणि अजूनही असतं. मला जास्त व्यक्त होता येत नाही, पण मी बाहेर असलो म्हणजे मला घरची, तिची खूप काळजी वाटत असते. हल्लीची पिढी खूप स्वतंत्रपणे विचार करू लागली आहे असं एकंदर माझं निरीक्षण आहे. अंजली मला समजावते, की, ‘‘मुलांच्या प्रत्येक गोष्टीत जास्त लक्ष घालायचं नाही, त्यांना त्यांचं जगू द्या, त्यांना त्यांचं सुखं दुःख कळू द्या. त्यांना परदेशात जायचं तर जाऊ द्या, पण तिकडं एकट्यानं सर्व गोष्टी करायच्या आहेत हे त्यांना समजण्याइतपत खंबीर करा, भक्कम करा. बाकी साऱ्या बाबी मग मुलंच  व्यवस्थित करतात.’’ आम्ही तनयाच्या बाबतीत तेच केलं. ती आता परदेशात आहे आणि तिनं तिथं सगळं काही व्यवस्थित सांभाळलं आहे. दोन मुलांना सांभाळून ती कामही करते. यासाठी आम्ही तिला सक्षम बनवलं, तिच्या विचारांना, निर्णयाला अडवलं नाही. अगदीच कुठे काही चुकीचं वाटत असेल तर पालकांनी मुलांना सूचना जरूर कराव्यात, पण आपले विचार त्यांच्यावर लादू नयेत. मुलांच्या विचारांच्या कक्षा आता खूप रुंदावल्या आहेत आणि आधीच्या पिढीच्या तुलनेत त्यांना खूप जास्त गोष्टी उपलब्ध आहेत. 

जागतिकीकरणामुळे जग खूपच जवळ आलं आहे. त्याचा परिणाम येणाऱ्या पिढ्यांवर होतच असतो. पण असं असलं तरी आपण मुलांना आपली भाषा, संस्कृती शिकवली पाहिजे. याच्याशी संबंधित ज्या गोष्टी आहेत, चांगले शब्द, चांगलं व्याकरण, चांगलं साहित्य शिकवलं पाहिजे. आपली भाषा कायमच बोलली पाहिजे याचा आग्रह न धरता त्याची गोडी मुलांमध्ये निर्माण करावी. उच्च शिक्षण घेत असताना, परदेशात जाऊन, तिथल्या संस्कृतीत राहून केवळ तेच अधिक प्रमाणात आत्मसात करण्यापेक्षा, आपण आपली संस्कृतीसुध्दा त्याच बरोबरीने समजून घेतली पाहिजे आणि जोपासली पाहिजे. आपल्या भाषेचा गोडवा आणि त्यातील ज्ञान समजून घेतलं पाहिजे. कारण जीवनाचं सार आपल्या भाषेतच सगळ्यात उत्तम सांगितलंय असं मला वाटतं. ते नव्या पिढीनं आत्मसात करावं.

मुलीवर संस्कार शिकवण्यासाठी अंजलीनं खूपच मेहनत घेतली. तिला वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं आणून देणं, श्लोक शिकवणं, त्याचे अर्थ सांगणं, त्याच्याशी संबंधित स्पर्धांमधून भाग घ्यायला लावणं यासारख्या गोष्टी तिने केल्या. रोज रात्री ती तनयाला एक गोष्ट सांगायची. या सर्व संस्कारांमधून तनयाची जडणघडण झाली. त्यामुळे परदेशात असली तरी भारतीय पोषाखाबद्दलची तिची आवड आजही कायम आहे, ती तिथे भारतीय सण-समारंभ उत्साहाने साजरे करते. तिच्या दोन लहान मुलांनाही याची गोडी लागावी हा यामागचा तिचा उद्देश आहे. त्यासाठी ती वेळोवेळी आमची मदत घेते. मोबाईल, मेल या माध्यमातून आम्ही तिला चांगली पुस्तकं, लेख, व्याख्यानांचे व्हिडिओ पाठवत असतो.

तनया लहान होती तेव्हा मी तिच्या शालेय कार्यक्रमांना, विविध स्पर्धांना आवर्जून सोबत जायचो. तिला फिरायची खूप आवड आहे. म्हणून भारतातील वेगवेगळी ठिकाणं दाखवणं, तिथे घेऊन जाणं या गोष्टी मी वेळ काढून नक्कीच केल्या आहेत. मोबाईल टीव्ही यासारख्या गोष्टींमध्ये जास्त वेळ न घालवणं हे घरी शिकल्यामुळे आता तिच्या मुलांनाही तिने यासाठी वेळेची मर्यादा घालून दिली आहे. अशा वस्तू मुलांना अजिबात द्यायच्याच नाही असं नाही. अन्यथा मुलं त्यासाठी खूप त्रागा करतात. अत्याधुनिक गॕजेट ही काळाची गरज आहे, मात्र अवघड असलं तरी त्याचा अति वापर आपण नक्कीच टाळू शकतो. अगदी लहान मुलांच्या हातातही पालक मोबाइल फोन सहज देतात आणि मुलं तासन् तास त्यावर गेम खेळतात, हे मी पाहतो. पालकांनीच मुलांच्या या सवयीवर सुरुवातीपासून नियंत्रित ठेवलं पाहिजे. मुलांना मग ती मुलगी किंवा मुलगा असो त्यांना जन्म देणारे ‘पालक’ असतात आणि जन्म दिल्यानंतर मुलाची जबाबदारी स्वीकारणं, मुलाला उत्तम संस्कार देणं, चांगल्या आचार-विचारांनी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देणं हे ‘ पालकत्व’ होय. हे समजून मुलांना वाढवलं तर एक उत्तम संस्कारी पिढी नक्कीच तयार होईल.
(शब्दांकन - मोना भावसार)

Edited By - Prashant Patil