नावात काय आहे?... सर्वकाही

Aurangabad-Municipal
Aurangabad-Municipal

स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षं झाली तरी आपण अजूनही जुनी नावं आणि जुन्या गोष्टीच घेऊन बसलो आहेत. कधी कधी हे गरजेचं असतं की आपला आत्तापर्यंतचा प्रवास कसा झाला आहे. आपण कोठून आलो आहोत, आणि कोठे चाललो आहोत. आपली जी मूळ ओळख आहे तिचा जेव्हा आपण अंतर्मनानं स्वीकार करू तेव्हाच आपण चांगला माणूस बनू शकतो. आपण आपली पारंपरिक जीवनशैली हरवून बसलो आहे,आणि आपण ‘वैश्विक ग्राहक यंत्रा''चा भाग बनत चाललो आहे. जे ‘व्हॅक्युम क्लीनर’सारखं आपण आत्ता कमवलेलं आणि भविष्यात कमावणारं सगळं काही शोषून घेत आहे. कर्ज आणि हप्त्यांवर होणारी खरेदी तरुणांना आयुष्यभर एकप्रकारे बंदी बनवून ठेवत आहे. तर, या सगळ्यांचा शहरांची नावं बदलण्याशी काय संबंध आहे? ...आहे, बराच काही आहे... 

आता तुम्ही औरंगाबाद शहराचं नाव बदलण्याचाच मुद्दा पहा. मराठवाड्यातलं हे सर्वांत मोठं शहर, आणि तिथून जवळच असलेल्या वेरूळ इथल्या लेण्यांसाठी आणि जवळच्याच अजंठा इथल्या चित्रांसाठी हे शहर प्रसिद्ध आहे. औरंगाबाद नाव कसं पडलं असेल? तर, औरंगजेबावरून. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

तो बाबराच्या राजघराण्यातील वारस. वडिलांच्या बाजूने तैमूर, तर आईच्या बाजूनं चंगीज खान यांचा वंशज होता तो. बाबराला मध्य आशियामध्ये आपलं राज्य सांभाळता आलं नाही, त्यावेळी दिल्लीवर राज्य करणारा अफगाण राजा इब्राहिम लोधीचा त्यानं इथं येऊन पराभव केला आणि सुपीक अशा गंगेच्या खोऱ्यात आला. इतर आक्रमणकर्त्यांप्रमाणे परत न जाता इथेच स्थायिक होण्याचा निर्णय त्याने घेतला आणि राजवटीचा विस्तार केला. त्याच्या निधनानंतरही मुघल राजवट पुढं दीर्घकाळ चालली. हुमायून, अकबर, जहाँगीर, शहाजहान आणि त्याचा मुलगा औरंगजेब यांनी उत्तर भारतातल्या अनेक भागांवर राज्य केलं. औरंगजेब हा पहिला मुघल होता, ज्यानं दक्षिण भारतातल्या प्रदेशावर विजय मिळविला. त्यांनं पूर्ण भारतीय उपखंडात ४९ वर्षे राज्य केलं. एक क्रूर व सत्तेचा दुरुपयोग करणारा राजा, ज्यानं आपला मोठा भाऊ दारा शुकोह, छत्रपती संभाजी महाराज आणि शीख गुरू तेघबहादूर यांची हत्या केली आणि शिया मुस्लिमांना भरपूर त्रास दिला. 

अशा या क्रूर राजाचं  नाव त्या शहराला का ठेवलं गेलं असेल, हा प्रश्न नसून ते आत्तापर्यंत का बदललं नाही, हा खरा प्रश्न आहे. जेव्हा मुंबईचं बाँबे बदलून मुंबई केलं गेलं, १९९६ मध्ये मद्रासचं चेन्नई झालं, २००१ मध्ये कलकत्ताचं कोलकता झालं, आणि नुकतंच अलाहाबाद व फैझाबादला त्यांचं मूळ नाव मिळालं, तर औरंगाबादला संभाजीनगर का करू शकत नाही? आणि हे कुठल्याही राजकीय पक्षाचं काम का असावं ? ती लोकांची भावना असू शकत नाही का? 

१९२४ मध्ये लेनिनच्या मृत्यूनंतर रशियातील सेंट पिट् सबर्गचं या शहराचं नाव लेनिनग्राड केलं. पण सात दशकानंतर जेव्हा सोव्हिएत युनियन कोसळलं, तेव्हा सार्वमत घेऊन शहराचं नाव परत मूळ (सेंट पिट्सबर्ग) नावानुसार केलं गेलं. १७ व १८ व्या शतकात फ्रेंच मिशनरींनी दिलेलं ‘पेकिंग'' हे नाव नाकारून चीनने आपल्या राजधानी शहराला बीजिंग म्हणायला सुरुवात केली. अजून एक दक्षिण चीनमधील शहर ‘कॅन्टॉन'' आता ‘गुवांगझाऊ‘ झालं आहे. जेव्हा ओटोमॅन राजाला मुस्तफा केमाल पाशा यांनी पहिल्या महायुद्धात हरवलं, तेव्हा काँस्टंटिनोपलचं नाव बदलून इस्तंबूल करण्यात आलं. मुस्तफा केमाल यांनी स्वतःला ‘आतातुर्क'' ही पदवी दिली होती, ज्याचा अर्थ आहे ‘फादर ऑफ दी टर्कस''. 

१९९९ मध्ये थॉमस फ्रीडमन यांनी एक पुस्तक प्रकाशित केलं, ज्यांच नाव होतं ‘‘The Lexus and the Olive  Tree: Understanding Globalization‘‘. त्यांना दोन आकृतिबंध दिसून आले. खुशाली आणि विकासासाठी महत्त्वाकांक्षा असणं, जी लॅक्सस मोटारीचं प्रतीक आहे आणि स्वतःची ओळख, तसंच परंपरा सांभाळायची इच्छा, ज्याचं चिन्ह होतं ऑलिव्ह ट्री. तेव्हापासून मागील २० वर्षे बिग फोर अशा तंत्रज्ञान कंपन्या, अमेझॉन, अॅपल, गुगल व फेसबुक हे जगावर राज्य करतात. 

या ग्लोबल कॉमर्सच्या जमान्यात आपण तेव्हाच टिकून राहू शकतो, जेव्हा आपण आपल्या परंपरेमध्ये पाय रोवून उभे राहू आणि स्थानिक आस्थापनांना पाठबळ देऊ. म्हणून ऑलिव्ह ट्री हा खरोखरीच महत्त्वाचा आहे. पण हे आम्हाला तेव्हाच समजेल जेव्हा आपण आपल्या परिसराबरोबर नाळ जुळवून राहू. 

सर्व यशस्वी व्यक्तींमध्ये त्यांची स्वतःची अशी एक प्रतिमा असते. शहरांचं जुनं नाव जेव्हा ‘विजय’ ऐवजी ‘पराजय’ दाखवतं तेव्हा तिथे राहणाऱ्या मुलांवर त्यांचा विपरीत परिणाम दिसतो. जेव्हा एखाद्या मुलाला हा प्रश्न पडेल की, त्याच्या शहराचं नाव औरंगाबाद का, तेव्हा त्यांचं उत्तर सन्मानजनक नसेल. 

समृद्ध समाज बनण्यासाठी, लोकांनी स्वतःबद्दल जाणून घेणं, त्यांना काय पाहिजे, आणि त्यांची श्रद्धा कशात आहे, हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. बांगलादेशच्या परिवर्तनाचे कारण हेच आहे की, लोकांना त्यांची मूळ ओळख समजली. याला संस्कृतिक अंधभक्ती म्हणणं हे चुकीचं आहे, इथे प्रश्न आहे, तो म्हणजे अस्सल जीवन जगण्याचा. लोकांची नावं पण खूप महत्त्वाची आहेत. लोकांना स्वतःच्या नावाचा अर्थ कळला पाहिजे. पालकांनी मुलांना अर्थहीन व फॅन्सी नावे ठेवू नयेत. चांगलं नाव असल्याने आम्ही कसे वागावे हे समजणं सोपं होतं. यामुळे आम्हाला चांगलं निवडण्याचा आणि चुकीच्या गोष्टींना दूर ठेवण्याचा विश्वास मिळतो. 

(सदराचे लेखक वैज्ञानिक, तसेच विविध घडामोडींचे लेखक आहेत.) 
(अनुवाद : गणाधीश प्रभुदेसाई)

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com