हॅलो मिस्टर बेल...

alexander-graham-bell
alexander-graham-bell

टेलिफोनशिवाय आजच्या जीवनाची कल्पनाच करता येणार नाही. १४५ वर्षापूर्वी आजच्याच दिवशी ( ७ मार्च) शास्त्रज्ञ अलेक्झांडर ग्रॅहम बेल यांना (१८७६ ) टेलिफोनच्या शोधाबद्दल अमेरिकेकडून पहिलं पेटंट मिळालं. इतिहासातलं हे सर्वांत मूल्यवान पेटंट समजलं जातं. टेलिफोनचा शोध लावला, तेव्हा ग्रॅहम बेल अवघ्या २९ वर्षाचे होते. बेल यांची आई कर्णबधिर होती. ही गोष्ट ग्रॅहम बेल यांना कर्णबधिरांसाठीचा शिक्षक होण्याची प्रेरणा देणारी होती. ग्रॅहम बेल यांच्या दोन भावांचं क्षयरोगाने निधन झालं. त्यानंतर बेल कुटुंबीय कॅनडाला स्थलांतरित झालं आणि बेल अमेरिकेला गेले. तिथं बोस्टन स्कूलमध्ये कर्णबधिर मुलांच्या शाळेत ते शिक्षक म्हणून रुजू झाले. तिथं ते एका विद्यार्थिनीच्या प्रेमात पडले. मेबल हर्बार्ड असे तिचे नाव. बेल हे तिच्यापेक्षा दहा वर्षांनी मोठे होते. काही दिवसांनी त्यांनी विवाह केला.

बेल हे त्यांच्या फावल्या वेळेत, एकाच तारेद्वारे एकाच वेळी अनेक ठिकाणी संदेश पाठवण्याचा प्रयोग करत होते. त्या काळात हे मोठेच संशोधन होते आणि टेलिफोनचा शोध हा योगायोगाने लागला, असेच म्हणावे लागेल. ज्यावेळी एकाच तारेतून दहापेक्षा अधिक टेलिग्राफ संदेश, ज्याला हार्मोनिक टेलिग्राफ म्हणतात, पाठविण्यात त्यांना यश आले, त्यावेळी केबलमधून मानवी आवाज प्रसारित करणे हा पुढचा नैसर्गिकरीत्या टप्पा होता. 

घरबसल्या होणाऱ्या मौखिक संदेशवहनानं शहराची जीवनशैली बदलली. हा शोध सरकारी आणि व्यवसायासाठी उपयुक्त ठरला. टेलिफोनचा शोध लागल्यानंतर सात वर्षाच्या आत मुंबई, मद्रास (आताचे चेन्नई) आणि कोलकता इथं दूरसंचार केंद्र स्थापन झाले. जुन्या काळच्या घड्याळांप्रमाणे या टेलिफोनलाही चावी देऊन कार्यरत ठेवले जायचे. १९०७ मध्ये कानपूरला टेलिफोनचं पहिले मध्यवर्ती केंद्र आणि त्यानंतर १९१३ मध्ये सिमला इथं  दूरसंचार केंद्र स्थापन करण्यात आले. 

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर दूरध्वनी यंत्रणेवर सरकारचे कडक नियंत्रण प्रस्थापित झाले. १९९१ मध्ये भारतातील दूरध्वनी संचांची संख्या  ५० लाखांच्या आसपास होती. परंतु देशाची अर्थव्यवस्था खुली झाल्यानंतर दूरध्वनी संच घराघरांत दिसू लागले. इंटरनेट आणि मोबाईलमुळे टेलिफोन सर्वसमावेशक बनला आहे. २०१३ मधील ‘सेल फोन नेशन’ या पुस्तकात रॉबिन जेफ्री आणि अस्सा डोरॉन यांनी, भारतात मोबाईल फोन हे केवळ उद्योगासाठीच नाही तर राजकीय आणि साध्या पद्धतीच्या जीवनशैलीवर प्रभाव टाकणारा क्रांतिकारी घटक ठरल्याचं स्पष्ट केलंय. २०१६ मध्ये रिलायन्स जिओने आपल्या ‘फोर जी’ प्लॅटफॉर्मवरुन मोफत कॉल आणि अतिशय कमी दरात डेटा पॅकची सुविधा उपलब्ध करून दिली. देशातील दळणवळण क्षेत्रात जिओच्या योजनेनं मोठा बदलच घडवला. यात जे सक्षम होते, तेच पुढे टिकले. दहा वर्षापूर्वी दूरसंचार क्षेत्रात १६ कंपन्या मैदानात होत्या. आजघडीला जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया या तीनच कंपन्या शिल्लक राहिल्या आहेत. तंत्रज्ञान सध्या इतक्या वेगानं बदलत आहे की, आजची तांत्रिक प्रगती ही पुढील तीन ते पाच वर्षात कालबाह्य ठरू शकते. एक वर्षापूर्वी ऑनलाइन शाळेची, घरी बसून कार्यालयीन कामकाज करण्याची कोणी कल्पना केली होती का ? आता ‘झूम’ हे काम करण्याचं आणि भेटण्याचं माध्यम झाले आहे. 

नव्या तंत्रशैलीनुसार टेलिफोन कंपन्या या ग्राहकांना नेटफ्लिक्स, ॲमेझॉन प्राइमसारखं ऑनलाइन मनोरंजनाचं व्यासपीठ उपलब्ध करून देत आहेत. एका अर्थाने तुमचा टीव्ही हा टेलिफोनमध्ये विलीन झालेला आहे. ओटीटी (ओव्हर द टॉप) यासारख्या दळणवळण क्षेत्रातील सेवा एका  आयपी नेटवर्कवर एका किंवा त्यापेक्षा अधिक सेवा ग्राहकांना प्रदान करतात. कोरोना संकटामुळं चित्रपटगृहं बंद ठेवण्यात आल्याने नवीन चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवरुनच प्रदर्शित झाले. विशेष म्हणजे ‘फोर जी’ नेटवर्कमध्येही ओटीटी सेवेनं चांगलं काम केलं. आता यापुढं काय ? फाईव्ह जी तंत्रज्ञान आपले दार ठोठावत आहे का ? लोकांच्या सर्वसाधारण माहितीसाठी सांगतो की, फाईव्ह जी तंत्रज्ञान हे आजच्या फोर जी तंत्रज्ञानापेक्षा २० पटीने वेगवान आहे.

फाईव्ह जी मुळे चित्रपट डाउनलोडिंग आणि स्ट्रिमिंग हे अधिक सुलभतेने होणार आहे. भविष्यात आपल्या फोनमध्ये येणारे फाईव्ह जी तंत्रज्ञान हे कृत्रिम बुद्धिमत्तेसह असेल. या कंपन्यांना तुम्ही आजच नाही तर उद्या काय करणार हे देखील ठाऊक असणार आहे. तुमच्या योजना, तुमची जोखीम म्हणजेच तुम्ही काही करण्याचा विचार करत असाल, म्हणजेच तुम्ही पुढे कोणते पाऊल उचलणार आहेत, याची खबरबात ठेवेल. तुमचा स्वभाव आणि जीवनशैलीच्या आधारावर तुमच्या फोनला सर्व काही कळलेले असेल. 

फाईव्ह जीमुळे परिस्थिती अधिक गुंतागुंतीची आणि अनिश्चित होणार आहे. कारण हे तंत्रज्ञान केवळ व्यक्ती व्यक्तीतील संवादाचा दर्जा वाढवणार नाही तर अत्याधुनिक कृत्रिम बुद्धिमत्तेवर चालणारे सेन्सर्स, रोबो आणि वाहने यामध्ये गुंतवून ठेवणार आहे. आपण विकत घेतलेला बूट हा प्रत्येक पायरीचे लोकेशन शेअर करतो आहे किंवा तुमचे घड्याळ हे तुमचे बोलणे ऐकत आहे आणि तुमचे ई-मेलही मशीनकडून वाचले जात आहेत, हे कदाचित तुम्हांला समजणारही नाही. या माहितीच्या आधारावरच यंत्रे तुमचे ‘भविष्य’ ठरवतील. ही बाब अडचणीत आणणारी असून आणि ती गोष्ट तुम्हाला कल्पनेपेक्षा कदाचित अधिक भीतीदायक ठरू शकते.  चीनमध्ये फाइव्ह जी तंत्रज्ञानाचा विकास हा लक्षणीय आहे. या क्षेत्रात ते खरोखरच पहिले आहेत आणि अमेरिकेच्या वर्चस्वाला आव्हान देत यात त्यांनी हुकुमत मिळवली आहे. चीनच्या फाईव्ह-जीने भारतीय दूरसंचार कंपन्यांत प्रवेश केला तर चीनला कायमस्वरुपी आपले सार्वभौमत्व गहाण राहील, यात तिळमात्र शंका नाही. 
म्हणूनच, मिस्टर बेल यांनी जगाला दिलेल्या अद्वितीय भेटीची आज आठवण काढत असतानाच, या तंत्रज्ञानाने फोनच्या माध्यमातून आपल्याला कोठे नेऊन ठेवले आहे, हे पाहूनही आश्‍चर्य वाटते. आपल्याला कालांतराने अशा वातावरणात रहावे लागेल की जेथे प्रत्येक जण सर्व ठिकाणी आभासी रुपात असेल मग त्यात मशीन, उपकरणे, वस्तूंचा समावेश असेल. मग हे आपल्याला आवडो अथवा न आवडो.

(सदराचे लेखक वैज्ञानिक तसेच विविध घडामोडींचे अभ्यासक आहेत.)
(अनुवाद : अरविंद रेणापूरकर)

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com