लसनिर्मितीचं भारतीय मॉडेल

अरुण तिवारी tiwariarun@gmail.com
Sunday, 10 January 2021

देशभान
कोरोना विषाणूवर जगभरात लशी विकसित होत असून आपल्या देशाचं भारताचं योगदानही अमूल्य आहे. आपल्या देशानं ‘कोविशिल्ड’ व ‘कोव्हॅक्सिन’ लशीतून जगासमोर वैज्ञानिक लढ्याचा आदर्श निर्माण केलाय.

जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना विषाणूनं भारतीय अर्थव्यवस्थेचीही प्रचंड कोंडी केली. आता, अर्थव्यवस्था विपरीत परिस्थितीतून सावरत आहे. नव्या वर्षाचं स्वागत कोरोनावरील लशीच्या आगमनाचे पडघम वाजवत करण्यात आलं. विशेष म्हणजे, यावेळी भूतकाळाप्रमाणे भारतीयांना नवीन औषधे किंवा लशीसाठी पाश्चिमात्य देशांकडं डोळे लावून बसावे लागले नाही. यावेळी भारतीय लसही उपलब्ध झाली. त्याचप्रमाणे, जगात इतरत्र विकसित करण्यात आलेल्या लशींचेही आपल्या देशात मोठ्या प्रमाणावर उत्पादन होणार आहे. लशीकरणाच्या मोहिमेसाठी सरकारनंही कंबर कसली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मात्र, कुठल्याही चांगल्या बाबींबरोबर अफवा किंवा शंकाकुशंकांचाही जन्म होतो. एखाद्या ‘व्हीआयपी’ व्यक्तीच्या ताफ्यापूर्वी मोटारसायकलस्वारांचं आगमन होण्यासारखाच हा प्रकार. या लशींबद्दल सर्वसामान्यांच्या मनाला पटकन पटेल अशी गोष्ट म्हणजे, या लशीत एका विशिष्ट धर्मात निषिद्ध असलेल्या प्राण्यांच्या घटकांचा वापर केला आहे. अर्थात, लशींभोवती इतरही अशा अनेक गोष्टींचे जाळे विणले गेले आहे. एक तरुण, परदेशात शिकलेल्या तसेच मोठ्या राजकीय पक्षाचे नेतृत्व करणाऱ्या नेत्याने लशीकरणास सुरवात होण्यापूर्वीच ती घेण्यास नकार दिला. प्रसिद्ध सूक्ष्मजंतूशास्त्रज्ञ डॉ. वॉल्डेमर मॉरडेकाई हाफकिन कॉलराच्या साथीचा सामना करण्यासाठी भारतात आले, तेव्हापासून म्हणजे १८९२ पासून भारताला लशीकरणाचा अनुभव आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

डॉ. हाफकिन यांनी केवळ भारतातच कॉलराच्या लशीची कार्यक्षमता सिद्ध केली असे नाही तर त्यांनी १८९७ च्या प्लेगच्या भीषण साथीतही या आजारावरील लस विकसित केली. मुंबईतील ग्रॅंट मेडिकल कॉलेजमधील एका छोट्या प्रयोगशाळेत बसून त्यांनी या लशीची निर्मिती केली. या प्रयोगशाळेचे नंतर १९०५ मध्ये ‘बॉम्बे बॅक्टेरियॉलॉजिकल लॅब’ असे नामकरण करण्यात आले. अखेरीस, १९२५ मध्ये तिला डॉ. हाफकिन यांचं नाव देण्यात आलं. ही प्रयोगशाळा ‘हाफकिन इन्स्टिट्यूट’ या नावानं ओळखली जाऊ लागली. 

रोगप्रतिकारक शक्ती वाढवून अनमोल मानवी जीवन वाचविणाऱ्या लशीचं उत्पादन घेण्याचा निर्णय डॉ.सायरस पूनावाला यांनी घेतला. तोपर्यंत त्या लशी भारतात आयात केल्या जात व त्यांचा वापरही खर्चिक होता. त्यांनी खरे तर भारताला धनुर्वातविरोधी लशीच्या बाबत स्वावलंबी बनविले. त्यानंतर घटसर्प, धनुर्वात, डांग्या खोकल्यावरील ‘डीटीपी’ गटातील लशीही विकसित झाल्या. सीरम इन्स्टिट्यूटची लसर्मितीची प्रक्रिया यापुढेही सुरूच राहिली. 

डीटीपी गटातील लशीनंतर गोवर, गालगुंड आणि रुबेला आजारावरील लशीही सीरमने बनविल्या. देशासाठी प्रतिष्ठेची बनलेली ‘सीरम’ १९९८ पर्यंत जगभरातील शंभरहून अधिक देशांना लस निर्यात करत होती. २००० पर्यंत जगातील दोन मुलांपैकी एका मुलाला सीरमची लस दिली जात होती.

कोरोनाच्या जागतिक साथीत तर पुणे आता अख्ख्या जगासाठी लशीचे नवीन केंद्र बनले आहे. जणू काही हे इ.स.३२४ वर्ष आहे आणि रोम साम्राज्याची राजधानी  कॉन्स्टॅटिनोपलला स्थलांतरित व्हावी, त्याप्रमाणे पुण्याने जागतिक नकाशावर महत्त्वाचे स्थान पटकावलेयं. देशात माहिती - तंत्रज्ञान क्षेत्रासह इतरही क्षेत्रात आघाडीवर असणाऱ्या महाराष्ट्राच्या या सांस्कृतिक राजधानीत केवळ लसनिर्मितीची सर्वांत मोठी क्षमता नाहीये तर पुण्यातील राष्ट्रीय विषाणु संस्थेच्या महत्तपूर्ण सहकार्याने (एनआयव्ही) कोरोनावरील अस्सल भारतीय बनावटीची लस विकसित झाली. 

भारतीय वैद्यक संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) मार्गदर्शनाखाली कार्यरत असणाऱ्या या संस्थेतच ‘सिव्हिअर ॲक्युट रेसपिरेटरी सिंड्रोम कोरोना व्हायरस २ (सार्स-कोव्ह-२)वर प्रकाशझोत टाकण्यात आला. ‘एनआयव्ही’च्या संचालिका म्हणून नोव्हेंबर २०१९ मध्ये सूत्रे स्वीकारणाऱ्या प्रा. प्रिया अब्राहम यांनी या तेव्हा फारशा माहित नसलेल्या कोरोना साथीविरुद्धच्या वैज्ञानिक लढ्याचे दूरदर्शीपणाने नेतृत्व केले.

‘आरटी -पीसीआर’सारख्या सूक्ष्म चाचणीतून कोरोनाचे रिअल टाईम निदान करणे, विषाणूला वेगळे करण्यासाठी संचांचे प्रमाणीकरण, कोरोना संसर्गानंतर मानवी शरीराने निर्माण केलेली प्रतिपिंडे (ॲटिबॉडीज) ओळखणे, भारतीय लस बनविण्यासाठी विषाणूचा स्ट्रेन भारत बायोटेक इंटरनॅशनल लि.(बीबीआयएल) ला हस्तांतरित करणे आदी अनेक आघाड्यांवर लढत ‘आयसीएमआर - एनआयव्ही’ने या साध्या डोळ्यांना न दिसणाऱ्या कोरोना विषाणूवरची पकड घट्ट केली. त्यामुळे इतिहासात आपला देश पहिल्यांदाच वैज्ञानिक प्रयत्नांच्या माध्यमातून उपायांच्या आघाडीवर भक्कमपणे उभा राहू शकला. केवळ समस्येचा भाग बनून स्वत:ला जगापासून अलग करणाऱ्या आपल्या महाकाय शेजाऱ्यासारखे आपले वर्तन नव्हते.  

लशी अनेक, ध्येय एकच
कोणत्याही लशींच्या द्वारे तुमच्या शरीरात एक प्रकारचे विषच टोचविले जाते. त्यामुळे, तुमचे शरीर विषाणूसारख्या नवीन शत्रूविरुद्ध लढण्यासाठी तुमच्या प्रतिकारशक्तीची ताकद वाढविते. प्रत्यक्षात शरीरावर विषाणूचा हल्ला होतो, तेव्हा शरीराला कसे लढायचे, याची कल्पना असते. त्यामुळे, ते हल्ल्याला बळीही पडत नाही. यापूर्वी लशीच्या माध्यमातून कमकुवत किंवा क्षीण विषाणू शरीरात सोडले जात. त्यानंतर, तंत्रज्ञानातील प्रगतीबरोबर संबंधित विषाणुचा ‘डीएनए’ किंवा ‘आरएनए’सारखा छोटा भागच लशीतून टोचविला जाऊ लागला, ज्याला विषाणूचा उपविभाग म्हटले जाते. संयुग्मित किंवा एकत्रित लशीमध्ये पॉलीसॅचराईड सारखा कमकुवत अंटिजेन (ॲटिबॉडीज निर्माण करण्यासाठी रक्ताला उत्तेजित करणारा पदार्थ) प्रथिनांच्या सशक्त ॲटिजेनशी जोडला जातो. त्याचप्रमाणे पेप्टाईड/प्रथिने आणि प्रथिने/प्रथिने संयुगेही वापरली जातात.

सध्या वैद्यकीय चाचण्या घेतल्या जाणाऱ्या ‘कोविड -१९’ लशींच्या चार श्रेणी आहेत. त्यापैकी मंजुरी दिलेल्या दोन लशी भारताच्या आहेत. पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ‘कोविशिल्ड’ ही लस बनवत आहे. ती ऑक्सफर्ड विद्यापीठ व ॲस्ट्राजेनेकाने विकसित केली आहे. सार्स-कोविड-२ चा जनुकीय भाग सोडण्यासाठी त्याच्याशी संबधित नसलेल्या निरुपद्रवी विषाणूचा वापर या लशीत केला जात आहे. भारत बायोटेक इंटरनॅशनल लि. (बीबीआयएल) ‘कोव्हॅक्सिन ’ ही लस बनवत आहे. 

‘आयसीएमआर -एनआयव्ही’ शरीरात प्रतिपिंडांचे प्रमाण वाढविण्यासाठी निष्क्रिय विषाणूचा वापर करून लस बनवत आहे. त्याचप्रमाणे, अमेरिकेने ‘फायझर’ ही लस जर्मनीच्या ‘बायोएनटेक’बरोबर विकसित केली आहे. या लशीच्या माध्यमातून शरीरपेशींना प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी प्रथिनांची निर्मिती कशी करायची, हे शिकविले जाते. रशियाच्या ‘स्पुतनिक व्ही’ या लशीत प्रथिनांचे प्रमाण वाढविण्यासाठी फ्लूच्या दोन कमकुवत विषाणूंचा वापर केला आहे. खरे तर एकाच ठिकाणापर्यंत पोचण्याचे हे वेगवेगळे मार्ग होय. मंजुरी दिलेल्या सर्वच लशींना चाचणीच्या कठोर प्रक्रियेतून जावे लागले. त्यांनी कोरोनाविरद्ध जीवरक्षक कवच प्रदान केले आहे. आता, जगभरातील अब्जावधी लोकांना या लशी देणे हे यापुढील काळातले कठीण आव्हान आहे.

आपण आपली मनस्थिती मजबूत ठेवूया. प्रख्यान नाटककार शेक्सपिअरचे शब्द आठवूयात -आपल्या शंका धोकेबाज असतात आणि त्यामुळे आपण प्रयत्न करायला घाबरतो. जे काही चांगले जिंकण्याची शक्यता असते, ते गमावतो. चला, आपण सर्वजण कोरोनाचा एकदाचा कायमचा पराभव करूयात.
(अनुवाद : मयूर जितकर)
(सदराचे लेखक वैज्ञानिक तसेच विविध घडामोडींचे अभ्यासक आहेत.)

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Arun Tiwari Writes about Indian model of vaccine production