आनंद शेष गोष्टींचा !

वारणा समुहाचे संस्थापक तात्यासाहेब कोरे
वारणा समुहाचे संस्थापक तात्यासाहेब कोरे

अथांग समुद्रामधील शेषावर पहुडलेला सृष्टीचा पालक देवांचा देव विष्णूनारायण ही प्राचीन काळातील व्यक्तीची सर्वोत्तम कल्पना मानली जाते. या प्रतिमेने केवळ विज्ञानालाच आव्हान दिले नाही तर विज्ञानापलिकडेही असलेल्या ज्ञानाचे संकेत दिले आणि हे ज्ञान कितीतरी पटीने अफाट आहे. उर्वरित, म्हणजे शेष असलेल्या नागवरच देव का पहुडलेला असतो? प्राचीन काळातील ऋषिमुनींनी आपल्यासमोर हे फार मोठे गूढ उकलून ठेवले आहे. आपण जे काही करतो आहोत, ते उर्वरितच आहे आणि आपल्या कर्मातून जे काही उरते, त्यावरच आपले भविष्य ठरत असते, हे त्यातून प्रतीत केले आहे. हे खरोखरीच पुनर्निर्माण प्रक्रियेचे सार आहे. ज्यावर पुर्नप्रक्रिया होत नाही त्या गोष्टी समस्या ठरू शकतात. मग ते न पचलेले खाद्य असो की, पोषण नसणारी द्रव्ये, हवामानातील प्रदूषण, शिक्षित समाजातील बेरोजगारी किंवा अर्थव्यवस्थेला फायदेशीर नसणारी श्रीमंती असो. गरिबी म्हणजे काय ? तर ठरावीक लोकांकडे असणारी संपत्ती ? अशी व्याख्या करता येईल काय?

तंत्रज्ञानातील प्रचंड प्रगतीला ‘प्रचंड’ म्हणता येणार नाही, कारण यामुळं मागं पडलेल्यांचा एक मोठा जमाव निर्माण झाला आहे. आजच्या बहुतांश नद्या या औद्योगिक कचऱ्याच्या दबावाखाली वाहत आहेत. हिमालयाच्या कुशीतील बांधकामांनी स्थानिक नागरिकांचं आयुष्य धोक्यात आणलं आहे. सध्या कोणतेही वर्ष नैसर्गिक संकटाशिवाय जात नाही. जगाच्या कानाकोपऱ्यात होणारे भूकंप, पूर, दुष्काळ आणि वादळ आपल्याला विकासातील उर्वरितपणाची आठवण करून देतात.  

बहरलेल्या साखर उद्योगाचे यानिमित्ताने उदाहरण सांगता येईल. शतकापूर्वी जेव्हा पांढरी साखर वापरली जात नव्हती, तेव्हा नागरिक काढा घेत असत आणि मधुमेहाचा आजारही फारसा कोणाला ठावूक नव्हता. कालांतराने साखर कारखाने आले. साखर अधिक प्रमाणात खाल्ली जावू लागली. देशभरातील ग्रामीण भागात साखर कारखाने वाढले आणि खेड्यातील मूळ पर्यावरणावर परिणाम झाला. साखर कारखान्याचा परिसर हा मळीच्या वासाने व्यापलेला असतो आणि ते एकप्रकारे प्रदूषणाचे अवशेष पृथ्वीवर सोडण्यास हातभार लावतात. 

कोल्हापूर जिल्ह्यातील वारणा खोऱ्यातील श्री. वारणा सहकारी साखर कारखान्याचा अभिनव प्रयोग पाहता येईल. जागतिक स्तरावरांचे नामांकित अपारंपरिक ऊर्जा तज्ज्ञ डॉ. अकुला मोहन राव, ज्यांना अमेरिकेतील जनरल इलेक्ट्रिक (जीई) सोबत काम करण्याचा दोन दशकांचा अनुभव आहे, त्यांनी '' उर्वरित'' गोष्टींवर काम करण्यास सुरुवात केली. त्यांनी काळ्या, चिकट, घाणेरडा वास असणाऱ्या मळीचे बायोगॅस आणि सेंद्रीय खतात परिवर्तन केले. याबाबत कोणीही विचार केला नव्हता. परंतु ‘वारणा’चे तात्यासाहेब कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली या गोष्टी साध्य झाल्या. साधारणत: दशकभराच्या प्रयत्नानंतर दररोज शंभर टन उत्पादन करणारा प्रकल्प संपूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाला. या प्रकल्पाची कीर्ती  देशभरात आणि देशाबाहेरही पोचली. मळीपासून उत्पादित  होणाऱ्या बायोगॅसमध्ये एलपीजीच्या तुलनेएवढीच ऊर्जा तयार केली जाते. सध्या वारणा खोऱ्यात तयार होणारा बायोगॅस सिलिंडरमध्ये भरण्यात येतो आणि त्याचा पुरवठा कोल्हापूरमध्ये करण्यात येतो. 

पर्यावरण संतुलनासाठी सीएनजी उपयुक्त इंधन समजले जाते. बायोगॅसची निर्मिती देखील त्याच धर्तीवर करण्यात आली आणि त्याचे शुद्धीकरण करण्यात आले. शेतातील ट्रॅक्टर आणि ऊसवाहतूक करणाऱ्या मालट्रकमध्ये इंधनाप्रमाणेच शुद्ध बायोगॅसचा वापर केला गेला. हा केवळ स्थानिक ‘जुगाड’ नव्हता तर ती एक अभियांत्रिकी क्षेत्रातील योगदान होते. सध्या वयाच्या सत्तरीत असलेले डॉ. मोहन राव हे आता बायोगॅस तपासणीसाठी नियंत्रक मंडळाबरोबर काम करतात आणि तो राष्ट्रीय मानकाच्या दर्जाचा असेल, याकडे लक्ष देतात. 

या प्रयोगातील सर्वांत वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे बायोगॅसचाही उर्वरित भागाचा उपयोग केला गेला. प्रक्रियेत जिवाणूंनी अपायकारक घटक खाऊन टाकल्याने चिकटपणा आणि घाण वास निघून जाऊन राहिलेली मळी ही फक्त उत्कृष्ट खत म्हणून उपयोगी पडत नाही तर, वनस्पतींची प्रकाश संश्‍लेषणाची क्षमताही ३० टक्क्यांनी वाढते. या सेंद्रिय खतात कार्बोनियन ६-६-८ असल्याने पिके सूर्यापासून अधिक ऊर्जा शोषून घेतात. परिणामी पिके अधिक जोमाने वाढतात. आजच्या घडीला दोन लाख टन मळीवरील प्रक्रिया करून ६ हजार टन सीबीजीची निर्मिती केली जाते. या सीबीजीची कारखानदारांना विक्री केली जाते आणि त्यातून ३० कोटींचा महसूल मिळवला जातो. या उत्पन्नातून सीबीजी निर्मितीसाठी झालेल्या भांडवली खर्चाची वसुली होते. तसेच दररोज २५ टनाहून अधिक सेंद्रिय खत तयार केले जाते आणि त्याचा वापर मातीची गुणवत्ता सुधारण्यासाठी शेतकऱ्यांकडून वापर केला जातो. एवढेच नाही तर द्रव्यरुपातील खताचे ठिबक तंत्राद्वारे वापर करण्यास मंजुरी मिळाली असून लवकरच त्याची विक्रीही सुरू होईल. देशात सध्या ४०० साखर कारखाने आहेत. या '' उर्वरित'' गोष्टींमधून निर्माण झालेली संपत्ती पहा, ती शेतकऱ्यांमध्ये वाटून घेता येईल.

प्रामुख्याने पाश्‍चिमात्य देशातील विकसित शेती पाहून त्याचे अनुकरण करण्याचे दिवस आता गेले आहे. आता असे होत नाही. वारणा खोऱ्यातील यश हे सातासमुद्रापार गेले आहे. रिओ ग्रेनेड व्हॅली शुगर ग्रोअर्स, सांता रोसा, टेक्सास येथे वारणाचा कित्ता गिरवण्यात येणार आहे. इलेक्ट्रॉनिक गॅझेटच्या निर्मितीतून निर्माण होणाऱ्या उर्वरित घटकांचे काय करायचे हे आपल्याला अद्याप समजले नसले तरी, कोणताही कचरा निर्माण न करणारी शेती करून तिला  पूर्णपणे पुर्नप्रक्रिया करणारा उद्योग म्हणून स्थापित करण्याच्या जवळ आपण येऊन पोहोचलो आहोत. ज्याप्रमाणे प्रत्येक अन्नाला पचनाचे वरदान लाभले आहे, त्याप्रमाणे कचऱ्याला जिरण्याचेही.

(सदराचे लेखक वैज्ञानिक तसेच विविध घडामोडींचे अभ्यासक आहेत.) 
(अनुवाद : अरविंद रेणापूरकर) 

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com