गोष्ट छोटी डोंगराएवढी! (अरविंद जगताप)

अरविंद जगताप jarvindas30@gmail.com
रविवार, 13 जानेवारी 2019

शेतकरी आत्महत्या हा विषय कायम अस्वस्थ करत आला. या अस्वस्थतेला वाट मिळाली "गोष्ट छोटी डोंगराएवढी' या चित्रपटात. हा चित्रपट म्हणजे खरं तर आमच्या संतापाचा उद्रेक होता. पटकथा म्हणून त्या चित्रपटाकडं बघितलंच नव्हतं. ते एक गाऱ्हाणं होतं. तो अन्यायाविरोधातला आमचा आमच्या परीनं केलेला एक आवाज होता. आजही हा चित्रपट पाहून लोक म्हणतात ः "आजची परिस्थिती मांडलीय.' दहा वर्षं होत आलीत. लोक "गोष्ट छोटी' हे "आज'चं वास्तव आहे म्हणतात, तेव्हा ती दाद वाटत नाही. दुर्दैव वाटतं.

शेतकरी आत्महत्या हा विषय कायम अस्वस्थ करत आला. या अस्वस्थतेला वाट मिळाली "गोष्ट छोटी डोंगराएवढी' या चित्रपटात. हा चित्रपट म्हणजे खरं तर आमच्या संतापाचा उद्रेक होता. पटकथा म्हणून त्या चित्रपटाकडं बघितलंच नव्हतं. ते एक गाऱ्हाणं होतं. तो अन्यायाविरोधातला आमचा आमच्या परीनं केलेला एक आवाज होता. आजही हा चित्रपट पाहून लोक म्हणतात ः "आजची परिस्थिती मांडलीय.' दहा वर्षं होत आलीत. लोक "गोष्ट छोटी' हे "आज'चं वास्तव आहे म्हणतात, तेव्हा ती दाद वाटत नाही. दुर्दैव वाटतं.

"आपण लेखक कसे काय झालो,' या प्रश्नाचं उत्तर कुणाला सहजासहजी देता येत नाही. माझ्याबाबतीत तर लोक म्हणतात म्हणून आपण लेखक अशी परिस्थिती आहे. आपण लेखक आहोत असं आपण कसं समजायचं? केवळ कागद काळे करतो किंवा टायपिंग येतं म्हणून? डॉक्‍टर, इंजिनिअरला डिग्री मिळते आणि ठरतं, की ते आता डॉक्‍टर किंवा इंजिनिअर! लेखकांचं तसं नसतं. ते लोकांनी ठरवायचं असतं. फक्त लेखनाची सुरवात होते ती प्रक्रिया आपण थोडीफार समजू शकतो. म्हणजे बरेच लोक म्हणतात तसं "सर्जनाच्या कळा' वगैरे मला काही कळत नाही; पण प्रश्न पडायला सुरवात होते. खूप गोष्टींचं कोडं पडू लागतं.

शाळेत मुलं आपले वडील क्‍लार्क आहेत, अधिकारी आहेत, ड्रायव्हर आहेत, दुकानदार आहेत असं अभिमानाने सांगतात; पण वडील शेतकरी आहेत हे सांगताना मुलाच्या चेहऱ्यावर खूपदा आत्मविश्वास का नसतो? खरं तर शेतकरी पिकवणारा. चित्रकार पाच-सहा फूट चित्रात रंग भरतो आणि दाद मिळवतो. लाखो रुपये कमवतो. चार-पाच एकर शेती हिरवीगार करणारा शेतकरी त्यामानानं किती कमवतोय? रस्त्यावर थुंकण्याची शिक्षा आहे तशी रस्त्यावर असलेल्या खड्ड्यांची का नाही? सत्तर वर्षांत आपण साधे खड्डे नसलेले रस्ते का बनवू शकलो नाही? रोजगार देणं शक्‍य नसेल, तर त्या विषयांचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा वेळ का वाया घालवायचा? भरमसाट डीएड, बीएड कॉलेजेस कशाला काढून ठेवायची? त्यांना परवानगी का द्यायची?... प्रश्न कोट्यवधी आहेत; पण आपल्याभोवती खूप लोक काहीच प्रश्न नसल्यासारखे जगत असतात, किंवा ज्यांना प्रश्न विचारायचे त्यांना आपण कधीच प्रश्न विचारत नाही. पोलीस कमिशनरला सर्वसामान्य माणूस कधीच कुठला प्रश्न विचारत नाही. हवामान खात्यात जाऊन कधी कुणी "नेहमी घोळ का होतात,' असं विचारत नाही किंवा समजून घेत नाही. सगळ्यांनी जायची गरज नाही; पण मुळात ज्यांचं काम हवामानाशी संबंधित आहे, त्यांनी तरी जाब विचारायला हवा. आमदारांचे पगार वाढतात, पेन्शन मिळतं. यावर विनोद होतात; पण प्रश्न विचारले जात नाहीत. विमानाच्या तिकिटांचे रेट फिक्‍स का नसतात? आपले लाखो रुपये बॅंकेत विश्वासानं ठेवणाऱ्या ग्राहकांना बॅंक साधं पेनसुद्धा विश्वासानं का देत नाही? सुरक्षारक्षक म्हणून खूपदा जे वयोवृद्ध, थकलेले लोक बसलेले असतात त्यांच्या चाचण्या कोण घेतं? एसटी महामंडळ सगळ्यात महाग तिकीट ठेऊनही तोट्यात का असतं? शेतकऱ्याला कापसाचा अमुकच भाव मिळणार असं ठरवलं जातं. मग खासगी बसेसना अमुकच तिकीट ठेवा असं आपण का म्हणत नाही? एक लिटर दुधाला शेतकऱ्याला जो दर मिळतो तोच दर हायवेवर फूड मॉलमधल्या एक कप चहाला द्यावा लागतो. ही विसंगती का? फूड मॉलला मेंटेनन्स आहे- मग जनावरांच्या गोठ्याला नाही का? नेता आधी सायकलवर फिरायचा- आता चारचाकीत फिरतो, असं आपण कौतुकानं म्हणतो; पण आजपर्यंत आपण कधी कुठल्या नेत्यानं कसे पैसे कमवले याचा हिशेब विचारलाय का? राजकीय पक्षांनी कोट्यवधी रुपयांच्या देणग्या जमवलेल्या आहेत; पण या पैशांवर कर तसा नको का? आणि कोणता पक्ष किती कर भरतो हे आपण कधी बघतो का? आपण आनंदी देश तर नाहीच आहोत; पण विज्ञानाच्या बाबतीतसुद्धा आपण खूप मागं आहोत. आपल्याकडं एवढी विज्ञान महाविद्यालयं असूनही शास्त्रज्ञ एवढे कमी का? आणि भोंदूगिरीचं कुठलंही कॉलेज नसताना गल्लीबोळात एवढे बुवा का? डॉक्‍टर होण्यासाठी लाखो रुपये खर्च करण्यात लोकांना एवढा इंटरेस्ट का आहे? लोकांनी सरकारी नोकरीसाठी आटापिटा करण्याचं नेमकं कारण काय आहे? डॉक्‍टर व्हायला लाखो रुपये खर्च करून जनतेची सेवा करण्याची चढाओढ आहे का? पोलिसानं अधिकाऱ्याच्या घरची कामं करावीत का? राजकीय पक्षांना किंवा संघटनाना बंद पाळण्याचा अधिकार असावा का? गावोगावी कमानी उभारण्यावर लाखो रुपये खर्च व्हावेत का? कांद्याचे भाव वाढले, की जो आरडाओरडा होतो, तो कांद्याचे भाव पडले की का नसतो? सरकारची आयात-निर्यात नेहमी शेतकऱ्याच्या मुळावर उठणारी का असते? शेतकऱ्याला नाडणारे तलाठी, तहसीलदार, बॅंकवाले किंवा इतर अधिकारी कधीकाळी शेतकरीच होते ना ?

... प्रश्नांची मालिका सुरू होते. उत्तरं मिळत नाहीत. प्रश्नांमध्ये आपण गुरफटून जातो. कुठंतरी या चक्रव्यूहातून सुटका करून घेण्यासाठी आपण लिहू लागतो. नेमकं काय व्यक्त व्हावं हे कळत असलं, तरी नेमकं कुठं व्हावं हे कळत नसतं. गावातून शहरात आलेल्या प्रत्येकाला गाव स्वतःतून वेगळं करता येत नाही. कुणी गाव अभिमानानं मिरवतात. कुणी जखमेसारखं कुरवाळत बसतात. शहरातल्या माणसांना कळत नाही, की ही माणसं पावसावर एवढी का बोलतात? भेटलेल्या माणसाला "पाऊस झाला का,' असं का विचारतात? शहरात पाऊस तसा खोळंबा, पहिल्या एक-दोन पावसांत कवित्व संपून जातं. मग चिडचिड, पाणी साचणं, छत्र्या आणि रेनकोट एवढ्यापुरताच पाऊस. गावातल्या माणसाला मात्र पाऊस जास्त हळवं करतो. सगळ्यांना मैदानात उतरताना तेंडुलकर कसा आभाळाकडे बघतो याचं कौतुक असतं; पण शेतकरी घरातून निघाल्यापासून शंभरदा आभाळात बघत असतात गावी. शेतकऱ्याच्या मैदानात धावपट्टी नसते; पण धावा असतात. कधी औतावर, कधी पेरायला, नांगरायला, फवारणीला. त्याच्या धावा मोजल्या जात नाहीत. त्याची रेकॉर्डस लिहून ठेवली जात नाहीत. गोंधळ नेमका इथंच आहे. शेतकऱ्याची रेकॉर्डस मोजली जात नाहीत. लिहिली जात नाहीत. त्यानं विक्रमी उत्पादन केलं, तर देशात कोठारं पुरेशी नसल्यानं धान्य सडून जातं. शेतकऱ्याची रेकॉर्डस सडून जातात. त्याला "सामनावीर' पुरस्कार मिळत नाही. शेतकरी असा एकमेव आहे, ज्याला खूप उत्पादन झालं तरी धोका असतो आणि कमी उत्पादन झालं तरी धोका असतो. शहरात हप्ते खाणारे, लाचखोर माणसं डोकेदुखी असतात. शेतकऱ्याला अशी माणसं तर छळतातच; पण प्राण्यांचाही मनस्ताप असतो. शहरात हरीण, मोर तिकीट देऊन बघायला जातात; पण शेतकऱ्याचा हरणं, मोर, रानडुकरांमुळं जीव नकोसा होतो. ती नजरेलासुद्धा पडू नयेत असं वाटतं. या विसंगतीची यादी वाढतच जाईल. गावात सगळंच चांगलं असं काही नसतं. मुळात सगळीकडे बरं-वाईट असतंच; पण रस्ते, वीज, पाणी अशा साध्या गोष्टीसुद्धा नशिबात नसणारी गावं आहेत. वीजजोडणी झाली म्हणजे "लाईट आली' असं आपण समजतो; पण तो अज्ञानाचा अंधार आहे. स्वतः शेतकरी आपल्या मुलानं शेतकरी व्हावं या मताचा उरलेला नाही. आपली मुलगी शेतकरी मुलाला द्यावी या मताचे फार कमी शेतकरी उरलेत. परिस्थितीच तशी आहे. त्यात सेंद्रीय शेतीसारखे विषय कुठल्याही तयारीशिवाय आणले जातात. त्यातलं उत्पादन शेतकऱ्याला फायदेशीर ठरण्यासाठी आधी तेवढी बाजारपेठ तयार करावी लागेल. नाहीतर पुन्हा पहिले पाढे पंचावन्न!

शेतकरी आत्महत्या हा विषय कायम अस्वस्थ करत आला. गाव आणि शहरात असलेली दरी, शिक्षणातला फरक, खेळ आणि मनोरंजन यांच्या दर्जातला फरक. या अस्वस्थतेला वाट मिळाली "गोष्ट छोटी डोंगराएवढी' या चित्रपटात. मकरंद अनासपुरे आणि शाम पेठकर यांचं या विषयावर काम चालूच होतं. मी सहभागी झालो. "गोष्ट छोटी डोंगराएवढी' हा खरं तर आमच्या संतापाचा उद्रेक होता. पटकथा म्हणून त्या चित्रपटाकडं बघितलंच नव्हतं. ते एक गाऱ्हाणं होतं. तो अन्यायाविरोधातला आमचा आमच्या परीनं केलेला एक आवाज होता. आजही "गोष्ट छोटी डोंगराएवढी' पाहून लोक म्हणतात ः "आजची परिस्थिती मांडलीय.' दहा वर्षं होत आलीत. लोक "गोष्ट छोटी' हे "आज'चं वास्तव आहे म्हणतात, तेव्हा ती दाद वाटत नाही. दुर्दैव वाटतं. खरं तर शेतकरी प्रश्नावर केवळ करुण, कणव असलेलं लिखाण जास्त केलं जातं. तशीच भाषणं केली जातात. त्यात शेतकऱ्यापेक्षा लेखक आणि वक्तेच जास्त सहानुभूती मिळवतात; पण या विषयावर काही तरी आक्रमक भाष्य व्हावं असं वाटत होतं. शेतकरी काय केवळ आत्महत्याच करणार? कधी ना कधी तो आक्रमक होईल, हे मांडायचं होतं. तोसुद्धा सरकारला हादरा देऊ शकेल हे दाखवायचं होतं. तो फार काळ शांत बसणार नाही हा इशारा होता. सरकारं बदलली, तरी शेतकऱ्यांचे प्रश्‍न आजही तेच आहेत, हा प्रॉब्लेम आहे. "गोष्ट छोटी डोंगराएवढी'मध्ये आम्ही हेच मांडण्याचा प्रयत्न केलाय. लिहिल्यानं प्रश्न सुटत नसतील, हे मान्य आहे. आपल्या प्रश्नावर कुणी विचार करत नसेल तरी चालेल... पण आपण प्रश्नच विचारले नाहीत असं नको व्हायला!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: arvind jagtap write farmer suicide article in saptarang