
लोक तुमच्याकडे स्वतःहून चित्रपट आणि नाटक घेऊन येतात, तुमच्या कामाला पसंती देतात, तुमच्याकडे कामाचा ओघ वाढतो याच्यापेक्षा आणखी सुख काय असणार?
श्याम बेनेगल, गोविंद निहलानी, वनराज भाटिया अशा मोठमोठ्या कलाकारांबरोबर काम करायला मिळणे, ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट. त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळालं, जे सहसा कुणाला मिळत नाही. एखाद्याला ते सहज मिळतं, यासारखे सुख नाही. लोक तुमच्याकडे स्वतःहून चित्रपट आणि नाटक घेऊन येतात, तुमच्या कामाला पसंती देतात, तुमच्याकडे कामाचा ओघ वाढतो याच्यापेक्षा आणखी सुख काय असणार?
नाटक आणि सिनेमा क्षेत्रात मनाविरुद्ध तडजोडी कराव्या लागतात. काम झाले आणि पैसे मिळाले, असे कधी होत नाही. काही वेळेला पैशासाठी खूप वाट पाहावी लागते. कधी कधी विविध कारणे देऊन पैसे देणे लांबविले जाते. कित्येक वेळा चकरा मारून किंवा फोन करूनही ते मिळतसुद्धा नाहीत. प्रत्येकाला आपले काम चोख आणि वेळेवर हवे असते; परंतु पैशाच्या बाबतीत चालढकलपणा अधिक केला जातो. काही वेळेला मिळतही नाहीत. असो.
एके दिवशी मला हृदयनाथ मंगेशकर यांचा फोन आला आणि म्हणाले, की अरे, माझ्याकडे एक नाटक आले आहे. ‘मी मंत्री झालो तर..’ असे नाव आहे. माझ्याकडे आता वेळ नाहीये. मी अमेरिकेच्या दौऱ्यावर चाललो आहे. ते नाटक तू करावे, असे मला वाटते. त्याच्यामध्ये चार लावण्या आहेत आणि तू त्या छान करशील, असे मला वाटते. त्याचबरोबर तुझ्यासाठी आनंदाची बाब अशी की, त्या चारही लावण्या उषाताई गाणार आहेत. उषाताईंचे मानधन निर्माते देणार आहेत. स्टुडिओचे भाडे निर्मातेच देणार आहेत. तुझे मानधन मी त्यांना वाढवून द्या, असे सांगितले आहे. शिवाय थोडे बॅकग्राऊंड म्युझिकही आहे. तसेच ढोलकीवाला अण्णा जोशीला बरोबर ठेव. त्याचा अभ्यास दांडगा आहे. लोकगीतांवर आणि लावण्यांवर. तो तुला मार्गदर्शनही करील.’’
अण्णा जोशी माझ्याबरोबर तबला वाजवायला ‘केतकीच्या बनी’पासूनच होता. तो माझा मित्रच झाला होता. मग मी त्याला फोन केला आणि सांगितले, की असं असं नाटक मिळालं आहे. त्यामध्ये चार लावण्या आहेत. त्यामुळे तुझ्या मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. तू करशील ना... तो लगेच तयार झाला आणि मग त्याच्या घरी जाऊन तीन-चार दिवस बसलो. त्यानेही बैठकीची लावणी... ही खडी लावणी... वगैरे वगैरे सांगितले. त्यानंतर मी सूर लावीत गेलो आणि ते होत गेले. त्या चारही लावण्या सुंदर झाल्या आणि काम करतानाही मजा आली.
अण्णा जोशी यांचे नक्कीच आभार मानले पाहिजेत. त्याने मला खूप मदत केली. आज आपल्याबरोबर तो नाही. अण्णा जोशी म्हटलं की आणखीन एक गोष्ट मला सांगावीशी वाटते ती ही की, त्याचा आणि माझा वाढदिवस एकाच दिवशी असतो २५ ऑगस्ट रोजी. आम्ही आमचा वाढदिवस एकदा अमेरिकेत साजरा केला होता. एकेक क्षण आणि एकेक गोष्टी आता आठवल्या की ऊर भरून येतो.
नाटकाचे म्युझिक करायचे म्हटलं, की त्यामध्ये काही गाणी असतात. त्यातच प्रशांत दामले किंवा सुनील बर्वे असला, की दोन-तीन गाणी हमखास असणारच. नाही तर नुसते बॅकग्राऊंड म्युझिक असते. अशा दोन पद्धतीने नाटकासाठी काम करावे लागते. काही काही निर्माते स्टॉक म्युझिक वापरतात, म्हणजे जुन्या काळापासून आतापर्यंत कुणी कुणी काय काय केले आहे ते. कमी बजेटमध्ये करायचे असले, की त्याचा वापर अधिक केला जातो; परंतु या सगळ्यामध्ये काम उत्तम होणे तितकेच आवश्यक असते. त्यामध्ये लूडबूड कुणी करता कामा नये. आतापर्यंत मी पैशापेक्षा कामाला अधिक महत्त्व दिले. प्रत्येक काम नेटाने आणि चोख केले. प्रामाणिकपणे केले. त्यामुळे आजही लोक माझ्याकडे येतात.
संगणक आल्यामुळे आता कित्येक बाबी हलक्या झाल्या आहेत. एखादे नवीन काम करताना नवा उत्साह असतो.. नवीन विचार त्यामागे असतो आणि तो विचार संगीतकाराला मदत करतो. मध्यंतरी सुनील बर्वेने काळाच्या ओघात मागे पडलेली नाटके पुन्हा रंगभूमीवर आणली. आज जे रंगभूमीवर कलाकार काम करीत आहेत, त्या कलाकारांना घेऊन जुनी नाटके नवीन ढंगात सादर केली; पण ती पंचवीस प्रयोगापुरतीच मर्यादित होती. मालिका आणि चित्रपटांमुळे सगळ्याच नट-नट्या बिझी असतात; तरीही सर्वांनी आपलेपणाने सुनीलला साथ दिली. माझ्या बाबतीत बोलायचे, तर त्या नाटकांतील सात-आठ नाटके माझीच होती, म्हणजे मी पूर्वी संगीत दिलेली होती. त्यामुळे आता नवीन विचार करून काम करायचे होते. त्यातील काही पीस तेच ठेवायचे होते. कारण ते पीस अगोदरच लोकप्रिय ठरलेले होते. खरे तर हे सगळे काम करताना मजा आली. जेव्हा जेव्हा वेगवेगळ्या प्रकारची कामे करायला मिळतात, तेव्हा तेव्हा तो कलाकार म्हणा किंवा संगीतकार आनंदी असतात. कारण काहीतरी नवीन करायला मिळते व नवीन विचार मांडायला मिळतो, याचा आनंद वेगळाच असतो. अशा कामाची आपल्याला शाबासकी मिळते.
आतापर्यंत मी नाटक, चित्रपट, मालिका आणि जिंगल्स अशा सगळ्याच ठिकाणी काम केले आहे आणि प्रत्येक कामाचा आनंद घेतला आहे. प्रत्येक ठिकाणच्या कामाचे स्वरूप वेगळे आहे. श्याम बेनेगल, गोविंद निहलानी, वनराज भाटिया अशी ही मोठमोठी मंडळी आणि मोठमोठे कलाकार अशा सगळ्यांबरोबर काम करायला मिळणे, ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट होती. त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळालं. खरं तर हे शिकायला कधी कधी कुणाला सहसा मिळत नाही; पण एखाद्याला ते सहज मिळतं, यासारखे सुख नाही आणि म्हणतात ना सुख म्हणजे नक्की काय असते, तर हे सुख म्हणजे लोक तुमच्याकडे स्वतःहून चित्रपट आणि नाटक घेऊन येतात... तुमच्या कामाला पसंती देतात... तुमच्याकडे कामाचा ओघ वाढतो, यांच्यापेक्षा आणखी सुख काय असणार...?
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.