अन् ‘ऑपेरा’ नाटकाचा जन्म झाला!

एका नाटकासाठी आम्ही अमेरिकेला गेलो होतो. वेळ असल्याने आम्ही ‘ऑपेरा’ पाहण्यासाठी गेलो. ‘ऑपेरा’ केवळ ऐकणेच नव्हे, तर पाहण्यासाठीही भारीच.
Sankarshan Karhade and Prashant Damale
Sankarshan Karhade and Prashant Damalesakal
Summary

एका नाटकासाठी आम्ही अमेरिकेला गेलो होतो. वेळ असल्याने आम्ही ‘ऑपेरा’ पाहण्यासाठी गेलो. ‘ऑपेरा’ केवळ ऐकणेच नव्हे, तर पाहण्यासाठीही भारीच.

एका नाटकासाठी आम्ही अमेरिकेला गेलो होतो. वेळ असल्याने आम्ही ‘ऑपेरा’ पाहण्यासाठी गेलो. ‘ऑपेरा’ केवळ ऐकणेच नव्हे, तर पाहण्यासाठीही भारीच. असा कार्यक्रम मराठीतही करावा, अशी इच्छा सहकाऱ्यांकडे व्यक्त केली आणि भारतात परतताच सुरू झाली एका आगळ्यावेगळ्या ‘ऑपेरा शो’ची तयारी. जवळपास १५ ते २० दिवस बैठका, तयारी, रियाज, डबिंग, रेकॉर्डिंग केल्यानंतर तयार झाले ‘जादू तेरी नजर’. ही कलाकृती इतकी सुंदर झाली, की त्याला २००५ मध्ये राज्य नाट्य पुरस्कार मिळाला.

‘वर्ल्ड रेकॉर्ड १२,५००’ शोच्या निमित्ताने मी, प्रशांत दामले आणि संकर्षण कऱ्हाडे भेटलो होतो. ‘स्मृतिगंध’च्या व्यासपीठावर एक मुलाखत झाली होती आमची आणि तेव्हा या १२,५०० च्या शोचे स्वरूप प्रशांतने स्पष्ट केले होते. ते बोलता बोलता सुधीर भटांची आठवण झाली आम्हाला. सुधीरच्या ‘जादू तेरी नजर’ या नाटकाची आठवण झाली. बाकी त्याच्यासोबत आम्ही ‘एका लग्नाची गोष्ट’, ‘प्रियतमा’, ‘मोरूची मावशी’ ही नाटके केली होती; पण त्यातही ‘जादू तेरी नजर’ या नाटकाची जन्मकथाच वेगळी आहे. एकदा न्यूयॉर्कला ब्रॉडवे येथे आम्ही २५ जण नाटकासाठी गेलो होतो, तिथे ४२ स्ट्रीटवर ‘ऑपेरा’ बघण्याचा बेत ठरला. आम्ही सर्व मंडळी होतो. त्यात सुधीर जोशी, मोहन जोशी, अमृता सुभाष, प्रशांत दामले, सुनील बर्वे, कविता लाड, मी आणि बॅकस्टेजची सगळी टीम मिळून आम्ही २५ जण ‘ऑपेरा’ पाहण्यासाठी गेलो. ‘ऑपेरा’ म्हणजे त्याचा सेट, संगीत, नेपथ्य, दिग्दर्शक, कलाकार हे सगळंच काही भारी असतं. त्या स्टेजखालीच त्यांचा ऑर्केस्ट्रा बसलेला असतो; परंतु त्यांना स्टेजवर सुरू असलेला कार्यक्रम वा कलाकार पाहता येत नाहीत. यात एक मध्यस्थी माणूस असतो, त्याला कंडक्टर म्हणतात. तो जसा इशारा देईल तसं गाणं तिथे वाजते. म्हणजे स्टेजवर नृत्य सुरू आहे किंवा गाणे सुरू आहे, हे त्यांना काहीच माहीत नसूनही फक्त त्या कंडक्ट करणाऱ्या माणसाच्या एका इशाऱ्यावर हा संपूर्ण कार्यक्रम अतिशय उत्तमरीत्या पार पडतो आणि हे सगळे प्रत्यक्षदर्शी पाहणे खूप सुंदर असते.

हे नाटक संपवून आम्ही न्यूयॉर्कच्या आमच्या हॉटेलवर परतलो. मग मी आमचा दिग्दर्शक मंगेश कदमला म्हटलं की, असं काही तरी आपण मराठीतही करायला हवं. काही तरी नवीन. आपण संगीत नाटक पाहतो, विनोदी नाटक पाहतो; पण हे असं ऑर्केस्ट्रासारखं मराठी नाटक आपण करू या. एखादा हलकाफुलका विषय, त्यात मध्येच गाणी, तर कधी नृत्य, असा काही तरी प्रयोग करू या आणि हे प्रेक्षकांनाही नक्कीच आवडेल. ज्यांना न्यूयॉर्कला जाणं जमत नाही, त्यांना हे नाटक बघून तरी कळेल नेमकं ‘ऑपेरा’ काय असते. त्यावर तो म्हणाला, ‘‘आपण सुधीरशी बोलून बघू या आणि यावर मतकरी साहेबांना त्यांच्याच लहेजाप्रमाणे विनोदी शैलीत काहीतरी लिहायला सांगू या.’’ मग सुधीर भट, रत्नाकर मतकरी, मी आणि मंगेश कदम अशी आमची एक बैठक झाली. त्यात आम्ही हा विषय सगळ्यांसमोर ठेवला आणि मग गाणी कोणत्या प्रकारची असावीत आणि त्यांचे लेखन कसे करावे, यावर चर्चा झाली. त्यानंतर मतकरींकडून स्क्रीप्ट आल्यावर मी, मंगेश आणि रंग्या गोडबोले मिळून बाकी सेटचेच काम पाहू लागलो आणि मग आमच्या बैठका सुरू झाल्या.

या नाटकाच्या तालमीसाठी सुधीरने सर्वांना ताकीद दिली होती की, आता पंधरा दिवस नाटक, सिनेमा, मालिका करायच्या नाहीत. तालमीसाठी आम्ही लोणावळ्याच्या बंगल्यावर गेलो. तिथे आमची तालीम चालायची. त्यातून या नाटकाला एक आकार येऊ लागले. त्यात गंमत म्हणजे कोरसची गाणी करत असताना एक वेगळीच मज्जा यायची. प्रत्येक जण आज मी हे गाणं लिहिले, आज या चारोळी लिहिल्या, असे म्हणत काही ना काही करत असायचे. ही गाणी ऐकता क्षणीच ती गाणी सुपरहिट होणार याची खात्री पटली होती. मग आम्ही शोध सुरू केला तो म्हणजे गायनाची जाण असलेल्या काही कलाकारांचा. मग मुंबईत आल्यावर आम्ही त्यासाठी ऑडिशन्स सुरू केल्या. त्यावेळी गोपाळ अलगिरी यांनी ऑडिशन घेतले आणि आम्हाला खूप सुंदर कलाकार या नाटकासाठी मिळाले. आम्ही या कलाकारांना प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली. त्यासाठी वडाळ्यात प्रशांत दामलेच्या एका मित्राचा फ्लॅट रिकामा होता. जवळपास आम्ही आठ ते दहा दिवस ऑफिसला गेल्याप्रमाणे वडाळ्याला जायचो. संध्याकाळी सुधीर भट, गोपाळ अलगिरी, मंगेश कदम, विजय केंकरे हे सगळे आले की दिवसभर आम्ही काय काम केले याचा आढावा घ्यायचो.

गाण्याचे ट्रॅक खूप सुंदर झाले होते. स्वप्नील बांदोडकर आणि अमेय दाते यांच्याकडून आम्ही डबिंग करून घेतले, मग या सगळ्या गाण्यांना ‘ऑपेरा’चे रूप देण्यासाठी आम्ही काही ख्रिश्चन मुलांना कोरससाठी बोलावले. कोरसमुळे सगळ्याच गाण्यांना एक मॉडर्न लूक आला आणि हे आम्हा सर्वांना खूप आवडले होते. काही गाणी तर आम्ही तीन-चार ट्रॅकवर केली. प्रत्येक गाण्याची रचना डॉल्बी सिस्टीमनुसार केली. त्यामुळे आम्ही तर खूश होतोच, पण बाकीच्या मंडळींनादेखील ही गाणी आवडली होती. या ‘जादू तेरी नजर’ नाटकाला २००५ सालचा राज्य नाट्य पुरस्कार मिळाला. उत्कृष्ट संगीत, उत्कृष्ट दिग्दर्शन, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट अभिनेता-अभिनेत्री अशी अनेक बक्षिसे मिळाली. या नाटकाच्या संगीतासाठी लाखाच्या घरात खर्च आला; पण हा खर्च करणं तेवढेच गरजेचं होतं. आता बजेटचा विषय काढल्यानंतर मला गोवा हिंदू असोसिएशनची आठवण झाली. गोवा हिंदूच्या ‘मत्स्यगंध’ नाटकाला मला एक नारळ आणि सव्वा रुपया असे मानधन मिळाले होते. मी गोवा हिंदूची जवळपास १८- २० नाटके केली. मुहूर्ताच्या वेळी एक नारळ आणि सव्वा रुपया मानधन देणे, हे त्यांचे ठरलेले असायचे. पुढे मग ‘नाट्यसंपदा’, ‘कलावैभव’, मोहन वाघांचे ‘चंद्रलेखा’ हे मला अधिक मानधन देऊ लागले. मग यात स्टुडिओच्या भाड्यापासून ते सगळ्या टीमच्या मानधनापर्यंत सगळेच काही असायचे; पण त्यावेळी मी पैशांचा जास्त विचार केला नाही. मला कामे मिळत आहेत. त्यातून शिकायला मिळत आहे, या गोष्टींकडे जास्त लक्ष दिले.

एकदा मोहन तोडवळकरांनी त्यांच्या ‘कलावैभव’च्या ‘माणसाला पंख फुटतात’ या नाटकासाठी पार्श्वसंगीत देण्यासाठी मला बोलावले. इतके मोठे नाटक मिळाल्यामुळे मी खूश होतो. पैसे किती मिळणार, कधी मिळणार याचा विचार न करता कामाला सुरुवात केली. नाटक रंगभूमीवर आले आणि हाऊसफुल गर्दीत सुरू झाले. त्यानंतर एक आठवड्यानंतर मी ‘कलावैभव’च्या ऑफिसमध्ये गेलो. तिथे गेल्यावर मोहन तोडवळकरांनी मला मानधन घेऊन जा, असे सांगितले. तिथे एका माणसाने माझ्या पुढ्यात तीनशे रुपये ठेवले. मी विचारले, ‘हे काय?’ तर तो म्हणाला, ‘तुमचे मानधन’. मी त्यांना लगेच म्हणालो, ‘फक्त तीनशे रुपये? यापेक्षा जास्त खर्च, तर माझा येण्या-जाण्यातच झाला आहे.’ ते गृहस्थ म्हणाले की, तुम्ही आत जा आणि मोहनरावांना विचारा. मी घाबरत घाबरत मोहनरावांकडे गेलो आणि त्यांना ही सगळी बाब सांगितली. त्यावर त्यांनी मला किती मानधनाची अपेक्षा आहे, असे विचारले. मग मी त्यांना म्हणालो की, मानधनाची अपेक्षा नाही; पण येण्या-जाण्याचा खर्च तरी मिळावा इतकीच अपेक्षा आहे. मग त्यांनी पाचशे रुपये मला दिले. असा तो त्या काळचा व्यवहार असायचा. मोहन वाघ, प्रभाकर पणशीकर, मोहन तोडवळकर अशा लोकांसोबत काम करण्याची संधी मिळणे ही भाग्याची गोष्ट होती.

(लेखक ज्येष्ठ संगीतकार आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com