अभिषेकी बुवा म्हणाले होते, छान वाजवली गाणी!

हार्मोनियम घेतल्यानंतर माझ्या उमेदीच्या काळात, सुमन कल्याणपूर यांच्याशी ओळख झाली. त्यांना कुणीतरी हार्मोनियम वाजविणारा हवा होता.
pandit jitendra abhisheki
pandit jitendra abhishekisakal
Summary

हार्मोनियम घेतल्यानंतर माझ्या उमेदीच्या काळात, सुमन कल्याणपूर यांच्याशी ओळख झाली. त्यांना कुणीतरी हार्मोनियम वाजविणारा हवा होता.

पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्याकडे पहिल्यांदा हार्मोनियमवर चार गाणी वाजवली. त्यावेळी त्यांनी केलेले कौतुक आयुष्यभर पुरून उरले...

हार्मोनियम घेतल्यानंतर माझ्या उमेदीच्या काळात, सुमन कल्याणपूर यांच्याशी ओळख झाली. त्यांना कुणीतरी हार्मोनियम वाजविणारा हवा होता. मी त्यांच्याकडे ऑडिशन्स दिली आणि त्यांच्या ग्रुपमध्ये सामील झालो. दिल्ली, मद्रास, कोलकाता, बंगळूरु वगैरे ठिकाणी कार्यक्रम करू लागलो. मला काही पैसे मिळू लागले. ही १९६४ मधील गोष्ट. याच वर्षी पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्याशी भेट झाली.

सुमनताईंकडे सितार वाजवायला अरविंद मयेकर होता. तो आमच्या ग्रुपमध्ये सितार वाजवायचा. एक दिवस मला त्याचा फोन आला. म्हणाला, ‘‘अशोक, तुला उद्या एचएमव्हीमध्ये जायचे आहे. पंडित जितेंद्र अभिषेकी ‘मत्स्यगंधा’ नाटक करीत आहेत. त्याची गाणी करायची आहेत.’’ मी म्हणालो, ‘‘माझी त्यांच्याशी ओळख नाही. गाणी कशी आहेत, ते मला माहीत नाही. रिहर्सल केलेली नाही...’’ त्यावर अरविंद म्हणाला, ‘‘ते काही मला माहीत नाही. त्यांना चांगली पेटी वाजविणारा हवा होता आणि मी तुझे नाव सांगितले आहे, त्यामुळे तू जा...’’

दुसऱ्या दिवशी फिरोजशहा मेहता रोडवरील एचएमव्हीमध्ये गेलो. तिथे रामदास कामत माईकसमोर गाणे गात होते. रिहर्सल सुरू होती. मी मनातल्या मनात घाबरलो होतो. उशिरा पोहोचल्याची खंतही वाटत होती. तेवढ्यात तिथे जितेंद्र अभिषेकी आले आणि माझ्याकडे पाहून म्हणाले, ‘‘तुम्ही अशोक पत्की का..?’’ मी ‘हो’ म्हणालो. पं. अभिषेकी हे लहान असो की मोठा, प्रत्येकाशी ते आदरार्थी बोलायचे. ते त्यांचे वैशिष्ट्य होते. पंडितजींना म्हणालो, ‘‘मला गाणी काय आहेत, हे माहिती नाही.’’ ते म्हणाले, ‘‘आत जाऊन बसा... तिथे गाण्यांची रिहर्सल सुरू आहे. मी आत गेलो आणि रिहर्सल पाहिली. माझ्या मनात एकेक गाणी तयार होऊ लागली. रामदास कामत यांच्या गाण्याबरोबरच आशालता वाबगावकर यांची दोन गाणी अशी चार गाणी आम्ही त्या दिवशी केली.

पहिले गाणे होते ‘देवाघरचे ज्ञात कुणाला...’ आणि दुसरे ‘गुंतता हृदय हे...’ ही दोन्ही गाणी रामदास कामत यांच्या आवाजात ध्वनिमुद्रित करण्यात आली. अन्य दोन गाणी आशालता वाबगावकर यांची. ती गाणी ऐकल्यानंतर पंडित अभिषेकीजी एकदम खुश झाले. तेथून निघता निघता माझ्या खांद्यावर कुणाचा तरी हात पडला. मागे वळून पाहतो तर ते पंडित जितेंद्र अभिषेकी होते. माझ्या खांद्यावर हात टाकून ते म्हणाले, ‘‘अशोकजी, काम खूप छान झाले. रिहर्सल नसतानाही तुम्ही गाणी छान वाजविली. तुम्ही माझ्याकडे सहायक म्हणून राहता का?’’ लगेच मी म्हणालो, ‘‘अहो, हे माझे भाग्य आहे, तुमच्याबरोबर काम करण्याची मला संधी मिळतेय.’’ मी एका दमात त्यांना होकार दिला. ते दादरला बालमोहन शाळेजवळ राहत होते आणि मी तेथेच जवळ राहत होतो. त्यामुळे त्यांच्याकडे सतत माझे येणे-जाणे सुरू झाले.

तिथून माझी त्यांच्याकडे सहायक म्हणून वाटचाल सुरू झाली. या वाटचालीत ‘मस्यगंधा’बरोबरच ‘लेकुरे उदंड जाहली’, ‘मीरा मधुरा’, ‘ययाति देवयानी’, ‘कट्यार काळजात घुसली’ अशी कित्येक नाटके मी त्यांच्याकडे सहायक म्हणून केली. जवळपास पंचवीस वर्षे मी त्यांचा सहायक होतो. त्यांच्याकडून मला खूप काही शिकता आले. वसंतराव यांना कसे ते शिकवतात, फैयाजजींना ते कसे शिकवतात, हे सगळे त्यांच्या बाजूला बसून मला पाहता आले आणि शिकताही आले. अभिषेकींकडे सहायक म्हणून काम केल्याचा मला खूप फायदा झाला. ‘तू तर चाफेकळी’ या नाटकापर्यंत मी पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्याकडे सहायक होतो. त्यांच्याकडे सहायक म्हणून केलेले ते शेवटचे नाटक...

(लेखक सुविख्यात संगीतकार आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com