esakal | आश्रम फक्त साक्षीदारच! । Gandhi Jayanti
sakal

बोलून बातमी शोधा

आश्रम फक्त साक्षीदारच!

आश्रम फक्त साक्षीदारच!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

१९६९, १९८५ आणि २००२ साली झालेल्या जातीय दंगलींचे अहमदाबाद हे शहर साक्षीदार राहिले आहे, ही तितकीच वाईट गोष्ट आहेच, पण या शहरावर गांधी विचारांचा म्हणावा तितका प्रभाव आज राहिलेला नाही. चुकून कोठेतरी गांधी विचार चमकताना दिसतो आहे.

अहमदाबादेतील गांधी आश्रमाला नवे रूप देण्यासाठी केंद्र सरकारने १२०० कोटी रुपयांची योजना आखली आहे; परंतु सुमारे एक कोटी लोकसंख्या असलेले हे शहर सध्या या योजनेची अर्थात राजकीय खेळाची गोष्ट कानावर पडूनही जणू काही शांत पहुडलेले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप मिळून गेली अनेक वर्षे एक महत्त्वाची मागणी करीत आहेत. ती म्हणजे, अहमदाबाद शहराचे नाव बदलून कर्णावती असे करण्यात यावे. अशा या शहरातील आश्रम मार्गावरील पुतळ्याच्या रूपाने महात्मा गांधी यांचे अस्तित्व उरले आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

गोष्ट पुतळ्याची निघालीच आहे तर मग या शहरातील पुतळ्यांची संख्या लक्षात घ्यायला हवी. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्यांची संख्या अहमदाबादेत अगणित आहे. त्या तुलनेत महात्मा गांधी यांचा एकच पुतळा आहे. याचा अर्थ गांधी ही व्यक्ती फक्त इतिहासात होती. आता तिचा इथे काही संबंध उरलेला नाही. सरदार वल्लभभाई पटेलांच्या नावाने अनेक सोसायट्या आहेत. संस्था आहेत. विमानतळ आहे. क्रिकेटचे मैदान आहे; पण गांधींच्या नावाचा एखादा रस्ता शोधूनच सापडू शकेल.

१९१५ मध्ये गांधीजी आफ्रिकेतून भारतात परतले. त्यानंतर त्यांनी कोचरब येथे त्यांच्या आश्रमाची स्थापना केली आणि त्यानंतर आज गांधी आश्रम नावाने ओळखला जातो, त्या आश्रमाची स्थापना केली. १९१७ मध्ये त्यांनी कापड गिरणींमध्ये काम करणाऱ्या (खरेतर ते आधी मजूर होते) कामगारांसाठी पहिल्यांदा सत्याग्रह केला. मजदूर महाजन संघाची स्थापना यातूनच झाली. समांतर शिक्षण व्यवस्था उभारण्यासाठी १९२० मध्ये त्यांनी गुजरात विद्यापीठ हे विश्वविद्यालयही उभारले. गांधीजी पत्रकार होते. यासाठी त्यांनी १९२९ मध्ये सत्याग्रही विचारांचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी ‘नवजीवन’ नावाने प्रकाशन संस्थेची स्थापनासुद्धा केली. अशा चार संस्था ज्या शहरात गांधींनी स्थापन केल्या ते अहमदाबाद हे भारतातील एकमेव शहर आहे.

अहमदाबादचे हे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे आणि या वैशिष्ट्यांसह उभ्या असलेल्या या ऐतिहासिक शहरातले रहिवासी आज गांधींना पूर्णतः विसरून गेले आहेत. वर्षातून दोन वेळा, म्हणजे २ ऑक्टोबर आणि ३० जानेवारी रोजी गांधी आश्रमात १०० लोक कसेबसे जमा होतात. मजदूर महाजन संघातील हजारो सदस्यांची उपस्थिती ज्या वेळी होती, तिथंवर गांधीजींचा या शहरातील प्रभाव होता. मिलमधील कामगार आणि मालकांमध्ये होत असलेल्या संघर्षाच्या वेळी मजदूर महाजन संघ मध्यस्थी करीत होता. त्यांच्यातील वाद शांततापूर्ण मार्गाने मिटविण्याची कामगिरी संघ करीत होता. औद्योगिक क्षेत्रातील अनेक संघर्ष संघाच्या माध्यमातून थोपविण्यात आले. अहमदाबाद आणि गुजरातमधील अशा अनेक वादांना टाळून शांतिपूर्ण करार करण्यात संघाचा मोठा वाटा होता.

गांधींनी ‘खेड्याकडे चला’ अशी हाळी दिली. त्यांच्या या आवाहनात मोठी ताकत होती. खेडी हेच भारताचे सामर्थ्य असल्याचे सूचित केले. किंबहुना, त्याचे सातत्याने पारायणच भारतीयांसमोर केले. त्यामुळे ग्रामविकास हा पाया समजून त्यांनी तरुणांना त्या मार्गाने जाण्याचा सल्ला दिला आणि इतरांनाही त्या मार्गाकडे वळविण्यास सांगितले. गुजरात विद्यापीठानेही ग्राममविकासाला प्राधान्य दिले. या विद्यापीठाला विद्यापीठ अनुदान आयोगाने ‘अ’ दर्जा बहाल केला. शेवटच्या काही वर्षांत विद्यापीठाने ग्रामशिल्पी योजनेच्या माध्यमातून गावांच्या विकासास आरंभ केला. हे विद्यापीठ आजही गुजरातच्या शैक्षणिक वाटचालीत महत्त्वाचे योगदान देत आहे. काहींसाठी ही गोष्ट प्रेरणादायी ठरली आहे.

तसेच नवजीवन प्रकाशन संस्थेबाबत म्हणता येईल. या प्रकाशन संस्थेच्या माध्यमातून गांधी विचारांना वाहिलेल्या सुमारे ८०० पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले आहे. यात इंग्रजीसह देशातील अनेक भाषांत रूपांतर करण्यात आले आहे. नवजीवन प्रकाशन संस्थेचा गांधीविचारांच्या प्रसारातील वाटा मोठा आहे. पण अहमदाबादेतील ८० टक्के लोक असे निघतील की, ज्यांनी गांधींचे आत्मचरित्र वाचलेले नाही. तरीही देशातील अनेक कारागृहांत सध्या बंदी असलेल्यांमध्ये गांधी विचारांची ओढ उल्लेखनीय आहे. कारण बरेच कैदी हे गांधी विचारांच्या पुस्तकांना प्राधान्य देतात. त्यांच्यात वाचनाची आवड निर्माण व्हावी, ही मोठी कौतुकाची गोष्ट म्हणावी लागेल.

१९६९, १९८५ आणि २००२ साली झालेल्या जातीय दंगलींचे अहमदाबाद हे शहर साक्षीदार राहिले आहे, ही तितकीच वाईट गोष्ट आहेच, पण या शहरावर गांधी विचारांचा म्हणावा तितका प्रभाव आज राहिलेला नाही. चुकून कोठेतरी गांधी विचार चमकताना दिसतो आहे. अहमदाबादला स्मार्ट सिटी म्हणून नव्याने उभारण्याचा विचार केला जात आहे. या शहराला ‘युनो’कडून जागतिक वारसा बहाल करण्यात आला आहे. गांधींच्या विचारांनी कधीकाळी भारलेल्या या शहरात आताशा गांधी विचारांचे केवळ स्वप्नच पाहावे लागेल की काय, अशी स्थिती आहे. इतक्या सहजतेने इथले लोक गांधींना विसरत चालले आहेत.

(लेखक ज्येष्ठ पत्रकार असून, ते अर्थशास्त्राचे प्रोफेसर आणि अहमदाबादच्या एचके आर्टस् कॉलेजचे प्राचार्य राहिले आहेत.)

loading image
go to top