अश्वमेध

अश्वमेध. महाकवी कुसुमाग्रज यांची ही अप्रतिम कविता. त्यांच्या काही ठळक मार्मिक कवितांपैकी एक. अभंगशैलीतली ही कविता नऊ कडव्यांची आहे. मराठी भाषेचं म्हणून जे एक कोरीव, ताशीव असं सौष्ठव आहे त्या सौष्ठवाची शब्दकळा असलेली ही कविता आहे.
Ashwamedha wonderful poem by Kusumagraj
Ashwamedha wonderful poem by Kusumagraj Sakal

चंद्रशेखर सानेकर

अश्वमेध. महाकवी कुसुमाग्रज यांची ही अप्रतिम कविता. त्यांच्या काही ठळक मार्मिक कवितांपैकी एक. अभंगशैलीतली ही कविता नऊ कडव्यांची आहे. मराठी भाषेचं म्हणून जे एक कोरीव, ताशीव असं सौष्ठव आहे त्या सौष्ठवाची शब्दकळा असलेली ही कविता आहे. हे शब्दसौष्ठव कुसुमाग्रजांच्या कवितेचं प्रमुख वैशिष्ट्य होय. सत्ता आपलं वर्चस्व कसं मिळवते, राखते, टिकवते याचं प्रभावी चित्रण, कथन त्यांनी या कवितेत केलं आहे.

शुभ्र घोडे किंवा घोडे असं प्रतीक असलेली ही कविता आहे. हे प्रतीक घेऊन कुसुमाग्रजांनी एक अप्रतिम पटकथा रचली आहे. एकाच वेळी गंभीर आणि तितक्याच तीव्र अशा उपरोधाचा दुहेरी गोफ त्यांनी या कवितेत विणला आहे किंवा या गोफातून ही कविता रचली आहे.

युद्धात प्रत्यक्ष रणमैदानात घोड्यावर बसून लढाई लढली जाते. म्हणजे घोडे हे लढाई लढण्याच्या आणि सत्ता मिळवण्याच्या साधनांपैकी एक प्रमुख साधन. राजकारणात सत्ता मिळवायला, राखायला, टिकवायला असेच घोडे राखले-पाळले-वापरले जातात.

हे घोडे म्हणजे चतुर, लढाऊ, बुद्धिमान पुरुष. सत्ता मिळवण्याच्या खेळात असे बुद्धिमान पुरुष आपल्या चातुर्यानं आपल्या नेत्याला, राजाला जे जे हवंय, जसं जसं हवंय ते ते घडवतात, मिळवतात.

कर्तबगार असलेले हे पुरुष तेजस्वी, देखणे, जणू नवरत्नांचे अलंकार असतात. आपल्या झंझावाती कामानं उलथापालथ करणारे, वादळी घडामोडी घडवणारे. अशा वादळी घडमोडी की जणू विराट आकाशालाच ते चिरून टाकतील की काय अशी धडकी भरावी. त्यांचं वर्णन कुसुमाग्रज पुढीलप्रमाणे करतात :

वाऱ्यावर उडे आयाळ। वदन झाले फेसाळ।

महाकल्पाचे जणू वादळ। अवकाश चिरितसे।।

असे हे वीर आपल्या झंझावाती युक्ती-बुद्धी-कामानं आपल्या राजाची, स्वामीची, नेत्याची सत्ता जिथं जिथं जितक्या दूरवर स्थापन करता येईल, वाढवता येईल तिथं तिथं स्थापन करतात. दिलेल्या हुकमाची अंमलबावणी करून आपल्या स्वामीच्या सेवेला परत हे पुरुष दरबारात हजर होतात. नव्या हुकमाच्या ताबेदारीसाठी. स्वामी त्यांच्या पराक्रमावर खूश होऊन त्यांची तारीफ करतात. शिरपेच, महावस्त्र, उपाधी अशी बक्षिसं देऊन त्यांची पाठ थोपटतात.

सत्तेला असे असंख्य बुद्धिमान, कर्तबगार पुरुष आपली सत्ता काबीज करायला, वाढवायला आणि टिकवायला सतत हवे असतात. तशी ती ते मिळवतेही; पण त्यांचा वापर करून झाला की त्यांना सत्तेच्या कक्षेतनं दूर सारलं जातं.

त्यांच्याकडून नंतर कुठलाही उपद्रव होणार नाही, कुठलीही अडचण त्यांच्याकडून निर्माण केली जाणार नाही अशी चोख व्यवस्था केली जाते. असे पुरुष सत्तेला अजिबात जाचक, डोईजड होणार नाहीत याचा - आणि मुख्य म्हणजे आपल्या सिंहासनाला कुठल्याही स्वरूपाचा जाब त्यांनी विचारू नये याचा - कडेकोट बंदोबस्त केला जातो.

लढाई लढलेल्या घोड्यांना जसा उत्तम खरारा केला जातो...उत्तम हरभरा खिलवून त्यांना धष्टपुष्ट ठेवलं जातं आणि नंतर स्वामीच्या मर्जीनुसार त्यांची वासलातही लावली जाते, तसंच सत्ता आपल्या चाकर पुरुषांचं करत असते. अशा आपल्या चाकर पुरुषांना त्यांच्या वकुबानुसार इनामं, बक्षिसं देऊन सत्ता त्यांचा निकाल लावते.

संतोषून स्वामी म्हणती।

आत्ता द्या यांची आहुती।

होईल तेणे तयां प्राप्ती।

स्वर्गलोकीची।।

आधी खरारा करा नेटका।

हरबरा खिलवा हवा तेतुका।

तदनंतरी होमात टाका। विधिपूर्वक।।

अशा पुरुषांना सत्ता तिच्या मर्जीनुसार पुढं अस्तित्वहीन करून टाकते. हे अस्तित्वहीन करणं म्हणजे एका अर्थानं होमात किवा यज्ञात आहुती देण्यासारखंच आहे. कधी देहानंच संपवून ही आहुती दिली जाते, तर कधी कधी अशी कामं देऊन, ज्या कामांत ते पुरुष पुरते जखडले जातील.

श्वास घेण्याव्यतिरिक्त कुठलंही स्वातंत्र्यच त्यांना राहणार नाही, अशा कामांत त्यांना बंदिस्त केलं जातं. बुद्धिमान चाकर पुरुषांचा वापर करून झाल्यावर सत्ता त्यांचा अशा विविध रूपांत बळी घेते; पण हे करताना सत्ता त्यांना फार गोंडस, उदात्त रूप देते; जेणेकरून, आपल्याला आहुती देऊन संपवलं जातंय हे, हवनसामग्री झालेल्या या पुरुषांना कळूही नये. त्यासाठी जे काही करायचं ते विधिपूर्वक! एखाद्या उदात्त, महान यज्ञकर्मासारखं. आणि, मग या स्वामी-इच्छेनुसार,

येणेपरी हवन घडे । मंत्रोक्त वन्ही धडधडे।

अश्वात्मे सर्व स्वर्गाकडे। चौखूर धावले।।

पण सत्तेचा हा खेळ इथंच संपत नाही, थांबत नाही. सत्ता आहे त्या लढाईसाठी किंवा नव्या लढाईसाठी नव्या घोड्यांचा शोध घेते आणि त्यांना आपल्या तैनातीत नेमते. सत्तेच्या खेळात नव्या दमाचे, नव्या युक्तीचे-बुद्धीचे, नव्या हिकमतीचे, नव्या चलाखीचे बुद्धिमान पुरुष हवे असतात. सत्ता ते हेरते आणि सेवेत नेमून घेते.

आणि, याहून मोठी गंमत म्हणजे, आपण सत्तेच्या, म्हणजेच राजाच्या जवळ जाणार या लोभानं हे पुरुषही चाकरीसाठी आसुसलेले असतात. स्वामीचाकरीची वाट बघत असतात. स्वामीला हे बरोब्बर माहीत असतं. अशा चाकरांची त्याला अचूक जाण असते. जिथं तिथं असे बुद्धिमान चाकर त्यानं दूरदृष्टीनं पाळून ठेवलेले असतात. जसे काही उमद्या, चपळ घोड्यांचे तबेलेच!

मग हव्या त्या वेळी स्वामीचा इशारा होतो आणि नवे चाकर उत्साहानं फुरफुरत स्वामींच्या सेवेला तत्परतेनं हजर होतात.

स्वामींचे खुणावती डोळे ।

उघडले तबेल्याचे गाळे।

उमद्या अश्वांची नवदळे ।

फुरफुरत ठाकिन्नली।।

एखाद्या कसलेल्या, प्रखर प्रतिभावान तत्त्वज्ञानं, विचारवंतानं आपलं कथन संपवून मौन व्हावं आणि वातावरणात एक दीर्घ, कभिन्न सन्नाट पसरावा तसा परिणाम या कवितेतला शेवटचा शब्द घडवतो.

‘ठाकिन्नली’ हा तो शब्द. याचा अर्थ समोर उपस्थित होणं, हजर होणं.

‘ठाकणे’ या क्रियापदाचं हे जुन्या मराठीतलं; विशेषतः जुन्या पद्यवाङ्मयात वापरलं जाणारं रूप.

कधीतरी एकचित्तानं, उत्कट मनानं ही कविता वाचून बघा. या शब्दाचा सन्नाट ध्वनी तुम्हाला ऐकू येईल. मी तो अनेकदा ऐकलाय!

कुसुमाग्रजांच्या या कवितेनं मला थोर हिंदी व्यंग्यकथा लेखक हरिशंकर परसाई यांच्या या कथनाची आठवण होत राहते : ‘या देशाचे बुद्धिमंत हे सिंह आहेत; पण ते लांडग्यांच्या वरातीत बँडबाजा वाजवतात.’

अश्वमेध

ऐसे हे शुभ्र घोडे आगळे । तबेला-लावण्याचे उमाळे।

वेगाच्या उद्दाम कल्लोळे। दशदिशा धावती।।

सतेज देखणे आकार । नवरत्नांचे अलंकार।

डौलाचे नाना प्रकार। किती येक ते।।

वाऱ्यावर उडे आयाळ। वदन झाले फेसाळ।

महाकल्पाचे जणू वादळ। अवकाश चिरितसे।।

जवळदूरच्या लोकी। स्थापून स्वामीची मालकी।

बजावून प्रेमे पायकी। परत येती।।

लाभे स्वामीची भलावणी। सांडे स्मिताचे गुलाबपाणी।

आहाहा काय ही इमानी। अश्वजातीची।।

संतोषून स्वामी म्हणती। आत्ता द्या यांची आहुती।

होईल तेणे तया प्राप्ती। स्वर्गलोकीची।।

आधी खरारा करा नेटका। हरबरा खिलवा हवा तेतुका।

तदनंतरी होमात टाका। विधिपूर्वक।।

येणेपरी हवन घडे। मंत्रोक्त वन्ही धडधडे।

अश्वात्मे सर्व स्वर्गाकडे। चौखूर धावले।।

स्वामींचे खुणावती डोळे। उघडले तबेल्याचे गाळे।

उमद्या अश्वांची नवदळे । फुरफुरत ठाकिन्नली।

- कुसुमाग्रज

(‘पॉप्युलर प्रकाशन’तर्फे प्रकाशित ‘प्रवासी पक्षी’ या काव्यसंग्रहातून साभार. काव्यसंग्रहाचे संपादक - शंकर वैद्य, नववी आवृत्ती, दुसरं पुनर्मुद्रण २०२२)

(लेखक हे ज्येष्ठ गझलकार, कवी आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com