
श्वसनसंस्थेच्या दुर्धर आजारांचा भारताच्या आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड भार आहे. भारतात सुमारे 93 दशलक्ष लोक श्वसनसंस्थेच्या दुर्धर आजारांचा सामना करीत आहेत. ज्यापैकी 37 दशलक्ष हे अस्थमाग्रस्त आहेत. अस्थमाचा जागतिक आरोग्य व्यवस्थेवरील भार लक्षात घेता भारताचा वाटा केवळ 11.1 टक्के इतका आहे. मात्र, जगभरात अस्थमामुळे होणाऱ्या एकूण मृत्यूंपैकी 42 टक्के मृत्यू केवळ भारतात होतात.
श्वसनसंस्थेला होणारा विषाणूंचा संसर्ग हे अस्थमाची तीव्रता वाढण्यामागचे प्राथमिक कारण आहे. अस्थमाचा धोका किंवा त्रास असलेल्या रुग्णांच्या श्वसनमार्गात संसर्ग झाल्यास अशा रुग्णांवर या संसर्गाचा गंभीर परिणाम होऊ शकतो किंवा त्यांचा आजार नियंत्रणाबाहेर जाऊ शकतो. अस्थमा असलेल्या व्यक्तींमध्ये विषाणू संसर्गाचे प्रमाण अधिक असल्याचा कोणताही पुरावा अद्याप उपलब्ध नाही, ही गोष्ट इथे लक्षात ठेवली पाहिजे. असे असले तरीही मध्यम किंवा तीव्र स्वरूपाचा अस्थमा असलेल्या रुग्णांना अधिक तीव्र स्वरूपाच्या आजाराचा धोका जास्त असतो, हे सांगणारे काही अंदाज आहेत. या दाव्याला पुष्टी देणारी कोणतीही आकडेवारी आजवर प्रसिद्ध झालेली नाही. श्वसनसंस्थेवर हल्ला करणाऱ्या विषाणूंचा अस्थमावर होणारा परिणाम लक्षात घेता सध्याच्या काळात अस्थमाग्रस्त व्यक्तींनी स्वत:ची सर्वतोपरी काळजी घेणे हे खूप महत्त्वाचे बनले आहे.
डॉक्टरांनी तशा सूचना दिल्याशिवाय अस्थमाच्या रुग्णांनी आपल्या कोर्टिकोस्टेरॉइड इन्हेलरचा वापर कधीही थांबवता कामा नये. स्टेरॉइड इन्हेलर थांबविल्यामुळे रुग्णाचे अस्थमावरील नियंत्रण डळमळीत होते. त्यामुळे जंतुसंसर्ग होण्याचा धोका व त्यातील गुंतागुंत वाढू शकते.
अस्थमा नियंत्रणात राहावा यासाठी स्टेरॉइड इन्हेलर्स वापरण्याचा सल्ला दिला असतो. स्टेरॉइड इन्हेलरचा वापर थांबविल्यास अस्थमा असलेल्या व्यक्तीचा अस्थमा बळावण्याचा धोका असतो.
आपले इन्हेलर इतरांना कधीही वापरायला देऊ नका. इन्हेलेशनची उपकरणे स्वच्छ व जंतूविरहित ठेवण्यासाठी ती नियमितपणे धुतली पाहिजेत.
अस्थमाग्रस्तांनी डॉक्टरांनी दिलेल्या अस्थमा ऍक्शन प्लानचे पालन केले पाहिजे. असा प्लान नसल्यास डॉक्टरांकडे त्यासंबंधी विचारणा करावी.
तीव्र लक्षणांना उतार पडावा यासाठी स्पेसर असलेल्या एमडीआरचा वापर करण्याचा सल्ला दिला जातो. नेब्युलायझर्सचा वापर टाळावा; कारण त्यातून एअरोसोल्स म्हणजे सूक्ष्म तुषार उडतात, जे विषाणूबाधित थेंबांना अनेक मीटर्स दूरपर्यंत वाहून नेऊ शकतात. नेब्युलायझर्समुळे विषाणू संक्रमित होण्याचा धोका खूप जास्त असतो. काही प्रसंगी नेब्युलायझर वापरणे अत्यावश्यक बनून जाते. अशा वेळी नेब्युलायझेशनच्या आणि संसर्ग नियंत्रणात ठेवण्यासाठीच्या सवयी कटाक्षाने पाळणे अत्यंत महत्त्वाचे ठरते.
अस्थमा नियंत्रणात असल्यास हॉस्पिटलच्या क्लिनिकमध्ये जाणे टाळावे. तब्येतीविषयी आपल्या डॉक्टरांशी टेलिफोनवर संवाद साधू शकता. डॉक्टरांची भेट घेणे अगदीच गरजेचे झाले तर कृपया आधीच अपॉइंटमेंट घेऊन त्यांची भेट घ्या. अस्थमाग्रस्तांनी वेळ न ठरवता हॉस्पिटलमध्ये जाणे टाळायला हवे.
अस्थमा असलेल्या व्यक्तींमध्ये कफ किंवा धाप लागण्यासारखी लक्षणे एरवीही दिसतात. मात्र, ताप येणे अस्वाभाविक आहे. अशा स्थितीत अस्थमाग्रस्त व्यक्तींनी तत्काळ आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा आणि डॉक्टरांनी दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करायला हवे.
तीव्र अस्थमा आणि सीओपीडीसह श्वसनसंस्थेचा एखादा गंभीर आजार असल्यामुळे विषाणूसंसर्गाचा धोका अधिक असलेल्या व्यक्तींसाठी काही मार्गदर्शक सूचना
मध्यम ते तीव्र स्वरूपाचा अस्थमा असलेल्या व्यक्तींना विषाणूसंसर्गामुळे आजारी पडण्याचा धोका कदाचित अधिक असू शकतो. या संसर्गामुळे त्यांच्या श्वसनमार्गावर (नाक, घसा, फुप्फुसे) परिणाम होऊ शकतो. जो दम्याचा झटका येण्यास कारणीभूत ठरू शकतो व त्यातून कदाचित न्यूमोनिया व तीव्र स्वरूपाचा श्वसनसंस्थेचा आजार होऊ शकतो. आपल्या अस्थमा ऍक्शन प्लानचे काटेकोर पालन करत आपला अस्थमा नियंत्रणाखाली ठेवा.
स्टेरॉइड्स असलेल्या इन्हेलर्ससह चालू असलेली सर्व औषधे घेत राहा. आपल्या डॉक्टरांशी बोलल्याशिवाय कोणतेही औषध थांबवू नका किंवा अस्थमा ट्रीटमेंट प्लान बदलू नका. आपत्कालीन स्थितीत डॉक्टरांनी लिहून दिलेल्या अस्थमा इन्हेलर्ससारख्या औषधांचा पुरवठा व्हावा यासाठी आपले आरोग्यसेवाकर्मी, पुरवठादार आणि फार्मसिस्ट यांच्याशी बोला. खूप दिवस घरातच राहावे लागणार असेल तर आपल्याजवळ नॉन-प्रिस्क्राइब्ड औषधांचा आणि इतर वस्तूंचा 30 दिवसांचा साठा असेल असे पाहा. दमा चाळविणाऱ्या गोष्टी टाळा.
विषाणूसंसर्गाची अधिकाधिक प्रकरणे पुढे येत असताना आणि हा आजार पसरू नये यासाठी समाजाकडून पावले उचलली जात असताना तुम्हाला या आजाराची चिंता वाटणे किंवा ताण येणे स्वाभाविक आहे. पण, मनातील भावना तीव्र झाल्यास अस्थमाचा झटका येऊ शकतो. तेव्हा ताणतणाव आणि चिंता यांच्याशी जुळवून घेण्यासाठी आवश्यक ती पावले उचला. याखेरीज इतर व्यक्ती व आपल्यामध्ये पुरेसे अंतर राखण्यासाठी रोजच्या रोज आवश्यक ती खबरदारी घ्या. बाहेर, सार्वजनिक ठिकाणी जाल तेव्हा इतर आजारी व्यक्तींपासून दूर राहा. आपले हात साबण आणि पाण्याने वारंवार धूत राहून किंवा अल्कोहोल बेस्ड हॅण्ड सॅनिटायझर वापरून स्वच्छ ठेवा. गर्दीच्या जागा आणि आजारी व्यक्तींचा संपर्क टाळा.
अस्थमा नियंत्रणात ठेवणारी औषधे घेत राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ती थांबवू नका. सध्याच्या स्थितीमध्ये रुग्णाने आपला अस्थमा नियंत्रणात ठेवणे हीच सर्वोत्तम गोष्ट आहे. नियंत्रक औषधांचा वापर थांबविल्याने अशा व्यक्तीमधील अस्थमाची लक्षणे तीव्र होण्याचा धोका वाढेल. विशेषत: विविध प्रकारच्या ऍलर्जींना कारणीभूत ठरणाऱ्या उन्हाळी मोसमात आपण प्रवेश करत असताना हा शक्यता अधिकच वाढते.
(डॉ. राजेश स्वर्णकार हे इंडियन चेस्ट सोसायटीचे राष्ट्रीय सचिव असून गेटवेल हॉस्पिटल व रिसर्च इन्स्टिट्यूटचे संचालक आणि श्वसन विभागाचे मुख्य सल्लागार आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.