मी हिंदू ; पण हिंदुत्ववादी नाही!

देशात सध्या हिंदू व हिंदुत्ववादी या दोन शब्दांभोवती मोठी चर्चा सुरू आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी या दोन्हीतील फरक स्पष्ट केलेला आहेच. तो काय आहे? हिंदू व हिंदुत्व वेगळे कसे याची उकल झाली पाहिजे.
Rahul Gandhi
Rahul GandhiSakal
Summary

देशात सध्या हिंदू व हिंदुत्ववादी या दोन शब्दांभोवती मोठी चर्चा सुरू आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी या दोन्हीतील फरक स्पष्ट केलेला आहेच. तो काय आहे? हिंदू व हिंदुत्व वेगळे कसे याची उकल झाली पाहिजे.

देशात सध्या हिंदू व हिंदुत्ववादी या दोन शब्दांभोवती मोठी चर्चा सुरू आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी या दोन्हीतील फरक स्पष्ट केलेला आहेच. तो काय आहे? हिंदू व हिंदुत्व वेगळे कसे याची उकल झाली पाहिजे. हा फरक वर्षानुवर्षाचा आहे, तो काय आहे याची चर्चा झाली पाहिजे. हिंदू व हिंदुत्व पूर्णपणे वेगळे आहे. हिंदुत्व नावाची बाब वेद, उपनिषदांमध्ये कुठेच सापडत नाही.

भारतात सगळ्यात पहिले जे लोक आले ते म्हणजे ग्रीक, त्यांनीच सिंधू नदी पाहिली व सिंधू नदीच्या काठावर राहणारे लोक असा उल्लेख केला. त्यानंतर मुस्लीम आले. या देशात अनेक लोक आले, शक आले, हूण, कुशाण आले, आर्य बाहेरुन आले की इथलेच होते हा एक वादाचा विषय आहे. लोकमान्य टिळकांनी यांनी यावर पुस्तकही लिहिले. लोकमान्य टिळकांनी म्हटले आहे की आर्य हे बाहेरुन आले आहेत. अनेक लोक येथे आले त्यातून ही संस्कृती बनली, त्यांनी या देशाला आपले म्हटले. या देशाच्या सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय जीवनात ते मिसळून गेले. ‘आयडिया ऑफ इंडिया’ किंवा भारतीयतेच्या संकल्पनेला समजायचे असेल तर हे लोक येथे आले व येथे मिसळले गेले, त्यामुळे येथे विविधता दिसते. मग श्रेष्ठत्व व कनिष्ठत्वाची बाब कुणी आणली? मनुस्मृतीचा कर्ता आला, मनुस्मृतीच्या कायद्यात ब्राह्मण्यवाद आला, त्याला पहिले ब्राम्हण्य धर्म म्हणायचे. पुरुषसुक्तामध्ये जे आहे ते नंतर ऋग्वेदामध्ये नंतरच्या काळात घुसडण्यात आले, असेही म्हटले जाते. ऋग्वेदाची जी भाषा आहे, ती पुरुषसुक्ताशी जुळत नाही.

अनेक आक्रमक या देशात आले त्यात मुस्लीम व ख्रिश्चनही होते, यांनी या देशात येऊन सत्ता मिळवली. उदा. बाबर हा भारतात धर्मविस्ताराच्या हेतूने आला नव्हता, म्हणजे तो त्याचा किंवा मुघलांचा प्राथमिक हेतू नव्हता. धर्मापेक्षा साम्राज्यविस्तार व संपत्तीची लालसा हाच या आक्रमकांचा पहिला हेतू होता. ब्रिटिशांच्याही बाबतीत तेच. (या आक्रमकांचा हेतू केवळ धर्मप्रसाराचा असता तर बहुसंख्य देश इस्लामिक किंवा ब्रिटिशांनी ख्रिश्चन बनवला असता.) अर्थात तत्कालिन आक्रमक फक्त मुस्लीम किंवा ख्रिश्चन धर्माचे म्हणून जमिनीवर आक्रमक करत नसत. तर त्यांचा तत्कालिक प्राथमिक हेतू साम्राज्यविस्तार असल्याचे अनेक संदर्भातून दिसते. बाबर किंवा ब्रिटिश जर धर्मविस्तारासाठी देशात आले असते तर आज देशात ८३ टक्के हिंदू कसे असते? असाही प्रश्न पडतो. साम्राज्यविस्तार आणि धर्मविस्तार या दोघांमध्ये एक मुलभूत फरक आहे. तो समजून घेतला पाहिजे.

परकीय आक्रमक बाहेरील देशांतून आले तरीही येथील संस्कृतीच्या प्रवाहात मिसळून गेले. मुस्लीम लोक या देशात आक्रमक म्हणून आले तरी ते या देशात एक होऊन गेले. या देशाच्या संस्कृतीशी समरस होण्याचा त्यांनी प्रयत्न केल्याचेही दिसून येते. पुढे खानपानाच्या सवयी एक झाल्या. सुफींनी दोन्ही धर्मात दुवा साधण्याचा प्रयत्न केला. ‘ गंगा जमनी तहजिब ’ यातून निर्माण झाली. हिंदू मुस्लीम यांना एकत्र आणणारा हा एक दुवा म्हणता येईल.

महात्मा गांधी यांचा जेव्हा उदय झाला त्यावेळी त्यांनी याच संकल्पनेचा पाया विस्तारला. या देशातील कामगार, शेतकरी, महिला, बहुजन यांना या संकल्पनेशी जोडले. ज्यांना कोणतेही राजकीय, सामाजिक अधिकार नव्हते, त्यांना शैक्षणिक व सामाजिक अधिकार मिळवून देण्यासाठी लढा उभारला. या लोकांना अधिकारक्षम केले, ते महात्मा गांधी यांनीच. कारण ते या चळवळीचा भाग झाले. ही चळवळच सर्वसामान्यांची झाली. नंतर मात्र काही मंडळींच्या असं लक्षात आलं की, ब्राह्मण्यवाद टिकवायचा असेल तर काँग्रेस आपल्या काही कामाची नाही आणि त्यातूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली आणि हे करत असताना एकीकडे आरएसएस व दुसरीकडे सावरकर असे चित्र राहिले. खरेतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना करण्यामागे सावरकरांचीच प्रेरणा होती. त्यांचा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचा आत्मा एकच होता.

या भूमीवर ब्रिटिशांचे साम्राज्य येण्यापूर्वी इथे स्वकीयांची सत्ता राहिली. त्यानंतर ब्रिटिशांनी राज्य केले. इंग्रज गेल्यानंतर ही सत्ता आपल्याकडं आली पाहिजे असा काहींचा कयास होता, पण ती शक्यता टिळकयुगाच्या अस्तानंतर आणि गांधीयुगाच्या उदयानंतर मावळली होती. म्हणून त्यांनी ब्रिटिशांशी जुळवून घेतले. ब्रिटिश साम्राज्य संपताना, ब्रिटिश हि सत्ता आपल्या हातात सोपवून जातील असाही या लोकांचा समज राहिला. येथून पुढे एक मोठा लढा सुरु झाला.

काँग्रेसच्या नेतृत्वाखाली एकत्र येऊन ब्रिटिशांविरोधात राजकीय स्वातंत्र्य मिळवण्याचा लढा झाला. तर डॉ. आंबेडकर, पेरियार हे सामाजिक प्रबोधन व स्वातंत्र्यासाठी लढत होते. भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, चंद्रशेखर आझाद हे क्रांतिकारी मार्गानं स्वातंत्र्य मिळते का यासाठी प्रयत्न करत होते. या सर्वांचा एकच उद्देश होता तो म्हणजे या देशातल्या संपूर्ण समाजासाठी स्वातंत्र्य मिळाले पाहिजे. मात्र याचवेळी एक प्रवाह होता जो आरएसएसचा होता, सावरकरवाद्यांचा होता, ज्यांना वाटत होते की राजसत्ता ही ब्रिटिशांनतर फक्त मूठभर ब्राह्मण्यवृत्तीच्या लोकांच्या हातात असावी. यातूनच १९२३ साली ‘हिंदुत्व’ हे पुस्तक सावरकरांनी लिहिले. सत्ता मिळवण्यासाठी ते लिहिले गेले, असे संदर्भ आढळून येतात.

‘हिंदू’ या शब्दाची उकल जर पाहिली, तिचा विकास जर पाहिला तर ती सर्वसमावेशक आहे, ती इतरांचा द्वेष न करणारी आहे. समुद्राप्रमाणे अथांग आहे, ज्यामध्ये अनेक नद्या मिळून त्यातील खारेपण हे स्वतः जपून इतरांचे गोडेपण ठेवणारी, अशी ही हिंदू संस्कृती आहे. म्हणून राहुल यांनी म्हटलं की, हे शंकरासारखं आहे.. विष पिऊन घेतो म्हणजे तो घाबरत नाही. मात्र हिंदुत्व कमजोर आहे, घाबरट आहे आणि हिंदुत्व सत्तेसाठी कोणत्याही थराला जाऊ शकतं. त्यात द्वेष पसरवणे आले, विष कालवणे आले, म्हणजेच दोन जातीत, धर्मात तेढ निर्माण करणे. ही गोष्ट आपण गेल्या ९० वर्षांपासून बघत आलो आहोत. जोपर्यंत हा समाज हिंदू होता तोपर्यंत काही लोकांनी राजकीय बाबीसाठी धार्मिक दंगली घडवून आणल्या तरी मात्र ते कधी राजकीय लोकांच्या हातात गेली नाही. त्यामुळे एकप्रकारचे सामंजस्य जे आहे, ते सर्वसमावेशकतेकडे पाहिले गेले. सर्वांना बरोबर घेण्याचा, चालण्याचा उद्देश राहिल्याने विकास हाच नेरेटिव्ह राहिला. मनरेगा, अन्नसुरक्षा, शिक्षणाचा अधिकार, स्वतःला ओळख देणारे आधारकार्ड, गुंतवणूक किती आली, महागाई या सगळ्या भोवती चर्चा होती, विकासाभोवती होती. मात्र अलीकडच्या काळात हा नेरेटिव्ह पूर्णपणे बदलत जातांना दिसतोय. सध्याच्या रचनेत पूर्णपणे हिंदुत्वाकडे झुकलेला दिसतो. हिंदू खतरे मे...म्हणजे ‘हिंदुत्व खतरे मे’ म्हणजेच ‘ब्राह्मण्य खतरे मे’ असे ते आहे. ‘हिंदू कधीच खतरे मे’ नव्हते. हिंदू धर्माने इतर धर्माला आपल्या पोटात घेतले. हीच हिंदूंची श्रेष्ठत्वाची भाषा होती. मात्र आता याला वेगळ्याच विचारसरणीचे तत्वज्ञान जोडले गेले आहे. धार्मिक भीतीच्या किनारीला फॅसिस्ट विचार जोडून एकाला दुसऱ्याच्या विरोधात उभे करणे सध्या सुरु आहे. जसे हिटलरने जर्मनीत तिथल्या जनतेला ज्युंच्या विरोधात उभे करून एक विरोधात एक नेरेटिव्ह सेट केला. तसेच सध्या या देशात ठराविक समाज घटकांच्या बाबतीत सुरु आहे. त्यांना भीतीच्या वातावरणात ठेवणे हाच उद्देश्य सध्या सगळीकडे दिसतो आहे.

हिंदू व हिंदुत्व याच्यात गल्लत केली तर एका वर्गाचे श्रेष्ठत्व निर्माण करुन इतरांना पाच हजार वर्षाच्या गुलामगिरीत ढकलण्याचे काम सुरु आहे. ते थांबणार नाही. हे जेव्हा सर्वांच्या लक्षात येईल तेव्हा उशीर झालेला असेल. सामान्य माणसाला सरकार निवडण्याचा अधिकार राहिल की नाही? ही सुद्धा भीती आता वाटू लागली आहे. राज्यघटनेत केलेले बदल किंवा राज्यघटना तशीच ठेवून आपल्याला हव्या असलेल्या गोष्टी करुन घेणे. असे सरसकट सुरु आहे, हे अनेक उदाहरणातून दिसते.

हजारो वर्ष ज्या लोकांना सामाजिक अधिकार नव्हते, शिक्षणापासून दूर रहावे लागले, पर्यायाने ते राजसत्तेपर्यंत जाऊ शकले नाहीत. त्यांना राज्यघटनेने अधिकार दिले आहेत. बहुजनांना दिलेले अधिकार कसे संपवायचे, ज्या लोकशाही संस्था आहेत त्या ठराविक समाज घटकांच्या बटिक कशा करायच्या आणि मुठभर लोकांच्या हातात सगळी संपत्ती कशी द्यायची, यासाठीच ''हिंदू खतरे मे है'' म्हणणाऱ्याचे प्रयत्न सुरु आहेत, असे माझे ठाम मत आहे. समस्त बहुजन वर्गाला हिंदुत्वाच्या नादाला लावून, दोन वेळच्या जेवण्याची भ्रांत, नोकरीची भ्रांत, कायम स्वतःच्या प्रश्नात गुंतवून ठेवणे हा त्यांचा डाव असावा. मुठभर लोकांच्या हातात सत्ता देऊन आरामात शासन करायचे हा त्यांचा उद्देश आहे, यात कसलीही शंका वाटत नाही. वाद हा हिंदू मुस्लीमांचा नाही. जे हिंदू आहेत त्यांना हिंदुत्वामध्ये ओढून आणायचे, अशी हि नवीन योजना आहे, ती ओळखायची गरज आहे. हे महात्मा गांधींनी बरोबर ओळखले होते. जे इंदिराजी, राजीवजी यांनी ओळखले होते तेच राहुल गांधीनी सामान्य लोकांच्या लक्षात आणून दिलेले आहे. इथून पुढची चर्चा व्हायचीच असेल तर राज्यघटनेच्या माध्यमातून सर्व अधिकार बहुजन समाजाला मिळाले आहेत. ते त्याला का द्यावे लागले? यावर झाली पाहिजे, पहिल्यांदा हे अधिकार नव्हते, तर ते कोणत्या व्यवस्थेमुळे नव्हते याची सुद्धा समीक्षा करावी लागेल.

‘हिंदू म्हणून जन्मलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही’ अशी भूमिका घेऊन आंबेडकर, पेरियार यांना का लढावं लागलं, ज्योतिबा फुले यांना का लढावं लागलं, कारण ते हिंदू होते आणि हिंदुत्ववाद त्यांना अडवत होता, मारक ठरला होता हिंदुत्ववाद.. तो पुन्हा आपल्याला मारक ठरू नये. गोड स्वप्ने दाखवत स्वतःच्या राजसत्तेचा मार्ग सुकर केला जात आहे, तो वेळीच ओळखण्याची गरज आहे. हाच फरक या संकल्पनेतील आहे. म्हणूनच हिंदू व हिंदुत्व याचा एक अर्थ होत नाही ते दोन वेगळे आहेत, हेच राहुल गांधी यांनी सांगितले आहे. काँग्रेस पुन्हा एकदा सिद्ध करु इच्छित आहे. आता योग्य मार्गाची निवड आपल्याला करायची आहे.

(लेखक काँग्रेसचे सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते आहेत.

लेखातील मते वैयक्तिक.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com