‘तीसहजारी’ सेन्सेक्‍स (अतुल सुळे)

‘तीसहजारी’ सेन्सेक्‍स (अतुल सुळे)

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक (सेन्सेक्‍स) दीड महिन्यापेक्षा जास्त काळ तीस हजारांच्या पुढंच आहे आणि आता तर त्यानं ३१,२६२ अंशांची विक्रमी पातळीही गाठली आहे. सेन्सेक्‍सची ही आगेकूच कशामुळं सुरू आहे, शेअर बाजारातली तेजी पुढं किती काळ कायम राहील, सर्वसामान्य गुंतवणूकदारांनी काय करावं आदी गोष्टींचं विश्‍लेषण.

यंदा एप्रिल महिन्यात शेअर बाजारात एक ऐतिहासिक घटना घडली. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकानं (सेन्सेक्‍स) तीस हजारांचा महत्त्वपूर्ण टप्पा खात्रीपूर्वक ओलांडला. गेले काही दिवस तर तो ३१ हजारांच्या पुढं धावताना दिसतो आहे. यापूर्वी मार्च २०१५मध्ये सेन्सेक्‍सनं काही काळासाठी तीस हजारांची उच्चांकी पातळी गाठली होती; पण ती पातळी टिकली नव्हती. गेल्या दीड महिन्यापासून हा निर्देशांक सातत्यानं तीस हजारांच्या वरच राहिला असून, त्याची आगेकूच सुरू आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांकसुद्धा (निफ्टी) २६ एप्रिल रोजी ९,३१५ उच्चांकी पातळीवर पोचला होता आणि तोसुद्धा आता ९,६००च्या आसपास टिकून आहे. डिसेंबर २०१६पासून हे दोन्ही निर्देशांक १७ टक्‍क्‍यांनी वाढले आहेत. याच काळात राष्ट्रीय शेअरबाजाराचा ‘मिडकॅप’ निर्देशांक ३२ टक्‍क्‍यांनी, तर ‘स्मॉलकॅप’ निर्देशांक ३६ टक्‍क्‍यांनी वाढला आहे. या वाढीची काही ठळक कारणं अशीः

  •   अर्थव्यवस्थेची गेली कित्येक वर्षं रुळावरून घसरलेली गाडी परत एकदा रुळावर येत असल्याची चिन्हं
  •   यंदाच्या अर्थसंकल्पात ‘निगेटिव्ह सरप्राईज’ नसल्यामुळं आलेली सकारात्मकता
  •   गेल्या वर्षभरात परकी गुंतवणूकदारांनी केलेली सुमारे ५५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक; तसंच ठेवींवरच्या घटत्या व्याजदरांचा सामना करण्यासाठी देशांतर्गत गुंतवणूकदारांनी शेअर बाजारकडं वळवलेला पैशाचा ओघ
  •   निर्देशांकातल्या काही प्रमुख कंपन्यांनी केलेली अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी
  •   गेल्या वर्षीप्रमाणंच यंदाही पाऊस सरासरीइतकाच होण्याचा हवामान खात्याचा अंदाज

सुधारती अर्थव्यवस्था
सेन्सेक्‍स किंवा निफ्टी हे केवळ शेअर बाजाराचेच निर्देशांक नसून, ते अर्थव्यवस्थेचेही निर्देशांक मानले जातात- कारण निर्देशांकात देशातल्या विविध क्षेत्रांतल्या प्रमुख कंपन्यांचा समावेश केलेला असतो. देशाची अर्थव्यवस्था कमकुवत असताना शेअर बाजाराचा निर्देशांक उच्चांकी पातळी गाठत असेल, तर ते धोक्‍याचं चिन्ह मानलं जातं. परंतु, सध्या आपली अर्थव्यवस्था सुधारत असल्याची काही ठळक चिन्हं दिसत आहेत. ती अशीः

  •   देशांतर्गत उत्पादनाचा दर ७.१ टक्‍क्‍यांवरून ७.६ टक्‍क्‍यापर्यंत वाढण्याची अर्थमंत्र्यांनी नुकतीच बोलून दाखवलेली शक्‍यता
  •   गेल्या काही वर्षांत कच्च्या तेलाच्या घसरलेल्या किंमती आणि सोन्याची घटलेली आयात यांमुळं आटोक्‍यात आलेली चालू खात्यावरील तूट
  •   वित्तीय तूट २०१७-१८ मध्ये देशांतर्गत उत्पादनाच्या ३.२ टक्के, तर २०१८-१९मध्ये ३ टक्‍क्‍यांपर्यंत ठेवण्यासाठी सध्याच्या सरकारचे सुरू असलेले प्रयत्न
  •   महागाईचा दर तीन टक्‍क्‍यांच्या आत
  •   आपला परकी चलनाचा साठा ३७८ अब्ज डॉलर म्हणजेच उच्चांकी पातळीच्या जवळ
  •   पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटांचं निश्‍चलनीकरण, वस्तू आणि सेवा कायद्याची (जीएसटी) अंमलबजावणी, बॅन्क्रप्सी कोड, रिअल इस्टेट रेग्युलेशन ॲक्‍ट इत्यादींमध्ये सुधारणा.
  •   देशातली थेट परकी गुंतवणूक गेल्या तीन वर्षांत ३४,४८७ अब्ज डॉलरवरून ६१,७२४ अब्ज डॉलर्सवर
  • या सर्व सुधारणा विचारात घेतल्यास शेअर बाजारात नुसताच बुडबुडा निर्माण झाला आहे, असं वाटत नाही.

पाच वर्षांत ‘निफ्टी’ही तीस हजारांच्या वर?
सेन्सेक्‍सनं तीस-एकतीस हजारांचा टप्पा ओलांडल्यावर अनेक गुंतवणूकदारांना निफ्टी दहा हजार होण्याचे वेध लागले असताना, अलीकडंच ‘मॉर्गन स्टॅन्ली’चे व्यवस्थापकीय संचालक रिधम देसाई यांनी आगामी पाच वर्षात निफ्टी तीस हजारांच्या वर गेलेला असेल, असं भाकित करून शेअर बाजारातल्या गुंतवणूकदारांना आश्‍चर्याचा सुखद धक्का दिला.
निफ्टी हा निर्देशांक पाच वर्षांत तिप्पट होण्याची शक्‍यता त्यांनी चार प्रमुख घटकांच्या आधारानं वर्तवली ः

  •   २००८च्या जागतिक मंदीनंतर ग्राहकांनी आखडता हात घेतला होता; परंतु आता त्यांनी पैसा खर्च करण्यास सुरवात केली आहे. त्यामुळं अर्थव्यवस्थेला चालना मिळेल.
  •   देशाची निर्यात वाढताना दिसून येत आहे.
  •   सरकार पायाभूत सुविधांवर मोठ्या प्रमाणावर खर्च करत आहे.
  •   पहिल्या तीन कारणांमुळं आता खासगी क्षेत्रातल्या कंपन्यासुद्धा पुढच्या वर्षभरात मोठ्या प्रमाणात भांडवली खर्च (कॅपेक्‍स) करतील, अशी अपेक्षा आहे. देसाई यांच्या मते, आपण सध्या ‘बुल मार्केट’च्या मध्यावर आहोत आणि ज्यांच्याकडं भरपूर ‘पेशन्स’ आहे, असे गुंवतणूकदार भविष्यकाळात भरपूर पैसा शेअर बाजारातून कमावू शकतात. आता फक्त कंपन्यांचा नफा सुधारण्याची गरज आहे. २००३ ते २००७च्या ‘बुल रन’ मध्ये ‘निफ्टी’ मधल्या पन्नास कंपन्यांचा नफा तीस टक्के चक्रवाढीनं वधारला होता आणि त्या काळात ‘निफ्टी’ सातपट झाला होता. येत्या पाच वर्षांत ‘निफ्टी’तल्या पन्नास कंपन्यांचा नफा वीस टक्‍क्‍यांनी वाढला, तरी निफ्टी तीस हजारांपर्यंत पोचू शकतो. ही वाढ २५ टक्‍के चक्रवाढ गृहीत धरते.

निर्देशांकाचा ‘प्राईस-अर्निंग’ रेशो
निर्देशांकांचा ‘प्राईस-अर्निंग’ रेशो अथवा ‘मल्टिपल’ शेअर बाजाराची सध्याची परिस्थिती दर्शवतो. हा निर्देशांक १२च्या आत असल्यास शेअरचे भाव ‘अगदीच कमी’ व खरेदीलायक समजावेत. ‘पीई रेशो’ १२ ते १६च्या दरम्यान असला, तर भाव कमी समजावेत. हा ‘रेशो’ १६ ते २०दरम्यान असल्यास भाव योग्य समजावेत. ‘रेशो’ २०-४०दरम्यान असल्यास ते भाव जास्त आणि तो २४-२८च्या दरम्यान असल्यास भाव अतिशय जास्त समजावेत. ‘पीई रेशो’ २८च्या पुढं असल्यास बुडबुडा फुटण्याच्या तयारीत आहे, असं समजावं.

सेन्सेक्‍स आणि निफ्टीचा ‘प्राईस-अर्निंग रेशो’ सध्या २१-२२दरम्यान आहे. वर उल्लेख केलेल्या नियमांनुसार शेअरचे सध्याचे भाव जास्त आहेत. परंतु ते अतिशय जास्त अथवा ‘बबल टेरिटरी’मध्ये गेलेले नाहीत, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. त्यांच्या मते, निर्देशांकाचा ‘पीई’ रेशो जास्त वाटतो आहे- कारण कंपन्यांचा नफा मंदीमुळं दबलेला आहे आणि आगामी काळात तो सुधारल्यास ‘पीई’ रेशो जास्त वाटणार नाही. जानेवरी २००८मध्ये सेन्सेक्‍स २१ हजारांच्या उच्चांकी पातळीवर पोचला असताना त्याचा ‘पीई’ रेशो २८च्या पुढं गेला होता आणि त्यानंतर लगेच शेअर बाजारातला बुडबुडा फुटला होता, हे वाचकांना स्मरत असेलच.

‘मिडकॅप’ व ‘स्मॉलकॅप्स’मध्ये बुडबुडा?
सेन्सेक्‍समध्ये समाविष्ट तीस कंपन्या आणि निफ्टीमध्ये समाविष्ट पन्नास कंपन्या आकारानं मोठ्या आहेत. त्यांना ‘ब्लूचिप’ अथवा ‘लार्जकॅप’ कंपन्या असं म्हटलं जातं. मध्यम आणि छोट्या आकाराच्या कंपन्यांना ‘मिडकॅप’ आणि ‘स्मॉलकॅप’ असं म्हटलं जातं. ‘लार्जकॅप्स’च्या तुलनेत ‘मिडकॅप’ आणि ‘स्मॉलकॅप’ कंपन्यांचे भाव झपाट्याने वाढतात आणि तितक्‍याच झपाट्यानं पडतातसुद्धा. अशा कंपन्यांचे भाव सध्या झपाट्यानं वाढताना दिसत आहेत, तेव्हा छोट्या गुंतवणूकदारांनी अशा कंपन्यांबाबत खबरदारी बाळगणं गरजेचं आहे.

म्युच्युअल फंडांकडं वाढता कल
ज्या गुंतवणूकदारांना स्वतःचे शेअर्स स्वतः निवडण्याची सवड, आवड किंवा कौशल्य नाही, अशांनी म्युच्युअल फंडाचा मार्ग पत्करणे श्रेयस्कर ठरतं आणि नेमकं हेच सध्या घडताना दिसत आहे. छोटा गुंतवणूकदार सुज्ञ होत असल्याचं हे चिन्ह आहे. ३१ मे २०१७ रोजी म्युच्युअल फंडाच्या व्यवस्थापनाखालची संपत्ती १९ लाख कोटी रुपये इतकी झाली. त्यापैकी ५ लाख कोटी रुपये ‘इक्विटी’ म्युच्युअल फंडांत गुंतवण्यात आले. हेसुद्धा एक चांगलं लक्षण मानलं जातं. कारण व्याजांचे घटते दर, प्राप्तिकर आणि महागाई यांचा सामना करत आपली संपत्ती वाढवायची असल्यास ‘इक्विटी’मध्ये गुंतवणूक करावीच लागते. ही गुंतवणूक केवळ एक वर्ष ‘होल्ड’ केली, तरी होणारा नफा करमुक्त होतो आणि परतावा मुदत ठेवीपेक्षा कितीतरी अधिक असू शकतो. अलीकडंच एका म्युचुअल फंडाच्या योजनेत २२ वर्षांत एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीचं मूल्य एक कोटी रुपये झाल्याचं वाचलं असेल. ज्यांना एकरकमी गुंतवणूक करणं शक्‍य नाही (तरुण वर्ग), अशा व्यक्ती ‘सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन’द्वारे (एसआयपी) इक्विटी शेअरमध्ये गुंतवूक करू शकतात आणि हीच त्यांची ‘म्हातारपणाची काठी’ ठरू शकते. केवळ पाच हजार रुपये दरमहा गुंतवणूक वीस वर्षांसाठी केल्यास आपल्या बारा लाख रुपये गुंतवणुकीचं मूल्य एक कोटी रुपये इतकं होऊ शकतं. १९९४-९५मध्ये अस्तित्वात आलेल्या अनेक योजनांनी ही किमया करून दाखविली आहे.
सध्या अनेक म्युच्युअल फंडांच्या ‘नेट ॲसेट व्हॅल्यू’ (एनएव्ही) उच्चांकी पातळीवर पोचल्या आहेत आणि नफा काढून घ्यावा, की गुंतवणूक चालू ठेवावी, अशा संभ्रमात गुंतवणूकदार आहेत. अशा वेळी आपण केलेल्या गुंतवणुकीची कामगिरी तपासून पाहणं आवश्‍यक असतं. आपण निवडलेली योजना सातत्यानं चांगली कामगिरी करत नसल्यास, त्या योजनेतून बाहेर पडून चांगली कामगिरी करणाऱ्या योजनेत प्रवेश करणं दीर्घकालीन हिताचं ठरू शकतं.

शेअर बाजाराला जोखीम कशाची?

  • तज्ज्ञांच्या मते, निर्देशांक डिसेंबर २०१७पर्यंत दहा टक्के वाढ दर्शवू शकतो; परंतु या जोखमी निर्देशांकाला दहा टक्के खालीसुद्धा खेचू शकतात.
  •   पाऊस अपेक्षेप्रमाणं न होणं
  •   महागाई पुन्हा एकदा वाढू लागणं
  •   कंपन्यांची कामगिरी अपेक्षेप्रमाणं न सुधारणं
  •   वस्तू आणि सेवा कायद्याच्या अंमलबजावणीत येणारे अडथळे
  •   आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या अनपेक्षित घटना

या जोखमी ध्यानात ठेवूनच शेअर बाजारात दीर्घमुदतीसाठी गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळू शकेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com