esakal | भवितव्य कोरोना-साथीचं
sakal

बोलून बातमी शोधा

pune

भवितव्य कोरोना-साथीचं

sakal_logo
By
डॉ. अविनाश भोंडवे

कोरोना विषाणूनं जगात हातपाय पसरवून आता २० महिने झाले. सर्व खंडांमधल्या १८० हून अधिक देशात ही महामारी पसरली. जवळजवळ २२ कोटी लोकांना या आजाराने बाधित केले आहे आणि ४५ लाखांपेक्षा अधिक लोकांचा या महामारीत मृत्यू झालेला आहे. विशेष म्हणजे हे आकडे दिवसेंदिवस वाढतच जात आहेत. अनेक देशात दोन, तीन, चार लाटा आल्या. असंख्य नवे व्हेरियंट जन्माला आले. अनेक कंपन्यांच्या निरनिराळ्या पद्धतीच्या लसी आल्या. या सर्व घडामोडींनी आणि त्यांच्या नित्य नव्या बातम्यांनी सर्व सामान्य जनता विस्मयात पडते आहे, क्वचितप्रसंगी भीतीची आणि भविष्यातील अनिश्चितीची लहर त्यांच्या मनात उमटून जाते.

काही दिवसांपूर्वी जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन यांचे एक विधान अनेकांना चक्रावून गेले. त्या म्हणाल्या, ‘‘भारतात लवकरच या महामारीचे (पॅनडेमिकचे) रुपांतर अंतर्गत साथीमध्ये (एनडेमिकमध्ये) होईल.’’ डॉ. स्वामिनाथन यांच्या या विधानाच्या निमित्ताने कोरोना महामारीचे भवितव्य या विषयावर सर्वतोपरी विचार करणे आवश्यक ठरते.

वैद्यकीय शास्त्रानुसार संसर्गजन्य साथीच्या तीन अवस्था असतात. ज्यावेळेस एखाद्या गावात, शहरात किंवा प्रदेशात एखाद्या संसर्गजन्य आजाराच्या रुग्णांची संख्या अचानक वाढू लागते, तेंव्हा त्या रोगाची साथ (एपिडेमिक) निर्माण झाली आहे असे मानले जाते. जेंव्हा ही साथ भूभागांच्या, देशांच्या आणि खंडांच्या सीमारेषा ओलांडून अनेक खंडातील अनेक देशात पसरेत तेंव्हा त्याला महामारी किंवा वैश्विक साथ (पॅनडेमिक) म्हणतात. आणि ही साथ जेंव्हा एखाद्या विशिष्ट प्रदेशापुरती मर्यादित राहते आणि अधून मधून सतत उद्भवत राहते तेव्हा त्या साथीच्या टप्प्याला अंतर्गत साथ (एनडेमिक) म्हणतात.

यामध्ये साध्या साथीची महामारी बनते आणि कालांतराने तिचे अंतर्गत साथीत रूपांतर होते. अर्थात साध्या साथीमधूनही अंतर्गत साथ निर्माण होऊ शकते. डॉ. स्वामीनाथननी वर्तवलेल्या भाकिताप्रमाणे काही गोष्टी महत्वाच्या असतात.

रुग्णसंख्या आणि महामारीचे स्वरूप

महामारीची अंतर्गत साथ मुख्यत्वे दोन प्रकारे होऊ शकते. पहिला प्रकार म्हणजे देशातील रुग्णसंख्या शून्यावर येऊन किंवा अगदी अत्यल्प होऊन मग पुन्हा काही मोजक्या राज्यात किंवा प्रदेशात नव्याने लागण सुरु होणे.

दुसरा प्रकार म्हणजे आत्ताच्या परिस्थितीत बहुतेक सर्व राज्यातली रुग्णसंख्या नाममात्र राहून, काही राज्यात सध्या आहे तशीच रुग्णांची वाढ आणि कोरोनाचा प्रादुर्भाव, संक्रमण आणि रोगप्रसार वाढतच राहणे. या दोन्ही प्रकारात रुग्णसंख्या संपूर्ण देशात किंवा बहुसंख्य राज्यात खूप कमी होणे हा मुख्य घटक आहे. जगातील साथीच्या रोगांचा इतिहास पाहता विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी जे सार्वजनिक आरोग्यखात्याचे नियम केले जातात त्यामुळे, म्हणजे मास्क वापरणे, शारीरिक अंतर ठेवणे, गर्दी न करणे, हात स्वच्छ धुणे आणि लॉकडाऊन, कंटेनमेंट झोन्स करणे अशा प्रतिबंधक उपायांनी विषाणूच्या प्रसारास पूर्णपणे आणि दूरगामी आळा घालता येत नाही. याला अपवाद दोनच-

२००३ मधील सार्स विषाणूची महामारी

२०१४ मधील आफ्रिका खंडातील इबोलाचा उद्रेक.

आजवरच्या इतर आजारांना आळा, विषाणूचा प्रसार रोखायला जनतेमध्ये निर्माण होणारी ''हर्ड इम्युनिटी'' किंवा ''सामुदायिक प्रतिकार शक्ती'' या तत्वाचाच उपयोग झाला आहे. कोणत्याही देशातल्या किंवा प्रदेशातल्या जनतेत ही हर्ड इम्युनिटी फक्त दोनच गोष्टींनी येऊ शकते. कोरोनाच्या बाबतीतली हर्ड इम्युनिटीचा विचार केला तर, ज्यांना कोरोना होऊन गेला आहे असे लोक आणि ज्यांनी प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत अशा व्यक्ती अशा दोन्ही गटांची एकत्रित टक्केवारी भारताच्या किंवा त्या त्या प्रदेशातल्या लोकसंख्येच्या ७० टक्के एवढी झाली तर सामुदायिक प्रतिकारशक्ती निर्माण होऊन कोरोनाचा संसर्ग वेगाने कमी होईल आणि रुग्णसंख्या अतिशय कमी कमी होत जाईल.

पण ही गोष्ट वाटते तितकी सोपी आणि सरळ नाही. त्यातले अडथळे म्हणजे - ज्यांना गंभीर स्वरूपाचा कोरोना होतो त्यांच्या शरीरात भरपूर प्रमाणात अँटिबॉडीज तयार होतात, पण त्या ६ महिन्यापर्यंतच टिकू शकतात. याउलट कोरोनाच्या दोन्ही लाटात ८० टक्के व्यक्तींना लक्षणविरहित किंवा सौम्य लक्षणांचा कोरोना होऊन गेला. अशा व्यक्तींमध्ये अँटिबॉडीजच खूप कमी तयार होतात आणि त्या जेमतेम तीन महिन्यांपुरत्या अस्तित्वात राहतात.

कोरोना प्रतिबंधक लसीकरणाने निर्माण झालेल्या अँटिबॉडीजसुध्दा ६ ते ८ महिने टिकतील अशी अधिकृत संशोधनं निर्माण झाली आहेत.कोरोनाचे नवे म्युटंट्स लसींना कमी प्रमाणात दाद देतात. कदाचित येत्या काही काळात लसीला अजिबात दाद न देणारा नवा प्रकार उदयाला आला, तर या नव्या म्युटंट विषाणूना आटोक्यात आणण्यासाठी लसींची पुढची आवृत्ती आणावी लागेल.

अर्थात हे सर्व करण्यासाठी बराच काळ व्यतीत होईल. श्वसनसंस्थेतून शरीरात प्रवेश करणाऱ्या विषाणूंबाबत, अँटिबॉडीज लवकर नष्ट होणे आणि बदलत्या विषाणूमुळे हर्ड इम्युनिटी लवकर तयार न होण्याच्या घटना जगात यापूर्वीही घडल्या आहेत. यामध्ये १९१८ ची ए / एच १एन १ इन्फ़्लुएन्झा विषाणूची साथ, १९५७ या वर्षातली ए/ एच २ एन २ इन्फ़्लुएन्झा विषाणूंची साथ, ए/एच३एन२ इनफ्लुएन्झा विषाणूची महामारी यांचा समावेश आहे. मात्र २००९मधील ए/एच१एन१ स्वाईनफ्लूच्या साथीला अगदी सुरुवातीला विषाणू नष्ट करणारे ऑसील्टाव्हिमिर हे औषध आणि प्रतिबंधक लस उपलब्ध झाल्याने त्या आजाराचे अगदी एक-दोन वर्षातच एनडेमिकमध्ये रुपांतर होऊ शकले.

प्रशासकीय कामगिरी

महामारीच्या रुग्णसंख्येत घट घडवून आणणे ही देशाच्या, राज्याच्या प्रशासनाची जबाबदारी असते. कोरोनाच्या सध्याच्या महामारीच्या स्थितीतले आरोग्य व्यवस्थापन, जनतेकडून प्रतिबंधक नियमांचे कसोशीने पालन करून घेणे, रोगाबाबत जनजागृती करणे, टेस्टिंग व्यापक स्वरूपात करणे, पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा मागोवा घेऊन त्यांचे टेस्टिंग करणे, सर्व पॉझिटिव्ह रुग्णांचे विलगीकरण करणे, औषधोपचारांची व्यवस्था ठेवणे, नव्या व्हेरियंटच्या शोधासाठी जीनोम सिक्वेन्सिंग करणे, लसीची उपलब्धता आणि लसीकरण केंद्रे वाढवून लसीकरणाचा वेग वाढवणे अशा गोष्टी प्रशासनाकडून काटेकोरपणे व्हाव्या लागतात. यातील बहुतेक सर्व मुद्द्यावर देशभरातली प्रशासकीय कामगिरी तोकडी पडते आहे.

लसीकरण

१६ जानेवारीपासून भारतात लसीकरण मोहीम सुरु झाली. अत्यंत मंदगतीने सुरुवात झालेल्या या मोहिमेला आताशा वेग येतो आहे. तरीही आज (२ सप्टेंबर रोजी) साडे सात महिन्यांमध्ये, भारतातल्या १३ कोटी ३३ लाख नागरिकांपैकी केवळ ३८.२ टक्के लोकांचा एक डोस आणि फक्त ११.५ टक्क्यांचे दोन्ही लसीकरण झालेले दिसते आहे. यामध्ये अजून १८ वर्षाखालील बालके, किशोर आणि तरुणांचे लसी कारण व्हायचेय आणि ‘आम्ही लस घेणारच नाही’ असे म्हणणारा एक सुशिक्षितांचा आणि अशिक्षितांचा मोठा वर्ग लसीकरणापासून वंचित आहे.

जानेवारी २०२० पासून आज अखेरपर्यंत, सुमारे ३ कोटी २९ लाख म्हणजे २.५ टक्के भारतीय कोरोना बाधित होऊन गेले आहेत. या २.५ टक्क्यात लसीकरण झालेल्या ११.५ टक्के मिळवले तर केवळ १४ टक्के नागरिकांमध्ये कोरोनाविरोधी अँटिबॉडीज आहेत. यात ज्यांना टेस्टिंग न केल्यामुळे कोरोना होऊन गेला हे कळलेच नाही असे पाच टक्के मिळवले तरी सामुदायिक प्रतिकारशक्तीचा सुवर्णरेखित ७० टक्क्यांचा आकडा गाठायला अजून खूप वेळ आहे आणि तो साहजिकच लसीकरणानेच गाठावा लागेल. शिवाय यात वर उल्लेखल्याप्रमाणे संसर्ग झालेल्या आणि लस घेतलेल्या व्यक्तींमध्ये अँटिबॉडीज पुरेशा काळापर्यंत न टिकण्याची समस्या आहेच.

वरील सर्व मुद्द्यांचा विचार केला तर जागतिक आरोग्य संघटनेने केलेल्या भाकिताप्रमाणे भारतात कोरोनाच्या महामारीचे रुपांतर एनडेमिकमध्ये होईल एखादेवेळेस, पण त्यासाठी अजून किमान दोन किंवा तीन वर्षांचा कालावधी लागेल. तोपर्यंत तिसरी लाट, चौथी लाट अशा लाटांमागून लाटा कदाचित येतच राहतील अशीच एकूण परिस्थिती पाहता म्हणावे लागेल.

(लेखक ज्येष्ठ वैद्यकीय तज्ज्ञ असून कोरोनावर त्यांची दोन पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत.)

loading image
go to top