
दिलीप कुंभोजकर - kumbhojkar.dilip@gmail.com
मातृत्वाचा सन्मान करणारी ही छोटी कविता समजून घेण्याआधी कवी बाळ सीताराम मर्ढेकर यांचा सविस्तर परिचय करून घेणे महत्त्वाचे वाटते. बाळ सीताराम मर्ढेकर ऊर्फ बा. सी. मर्ढेकर हे मराठी साहित्यामधील नव्या वाटेतील नामवंत कवी व लेखक होते. त्यांना केशवसुत यांच्यानंतरचे अर्वाचीन म राठी नवकाव्याचे प्रवर्तक मानले जाते. त्यांच्या साहित्यावर विजया राजाध्यक्ष, द. भि. कुलकर्णी, धों. वि. देशपांडे, प्रभाकर पाध्ये, श्री. पु. भागवत, के. रं. शिरवाडकर, डॉ. देवानंद सोनटक्के आदींचे अभ्यासपूर्ण लिखाण उपलब्ध आहे. १९९३ मध्ये विजया राजाध्यक्ष यांना ‘मर्ढेकरांची कविता : स्वरूप आणि संदर्भ’साठी साहित्य अकादमीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. मर्ढेकरांच्या कविता, त्यांच्याबद्दल केले गेलेले लेखन या सगळ्यांचा वेध घेणारे विवेचन नागपूरच्या विजयराजे ऊर्फ डॉ. विजयकुमार नारायणराव इंगळे यांनी त्यांच्या ‘मर्ढेकरांचे सौंदर्यशास्त्र आणि काव्य’ या ८१५ पानी ग्रंथात केले आहे. हा ग्रंथ लिहिण्यासाठी विजयराजे यांनी मर्ढेकरांचा ३० वर्षे अभ्यास केला होता.