lionel messi
lionel messisakal

मेस्सीनं वर्ल्ड कप उंचावताना पाहायचंय...

विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेचा थरार आजपासून कतारमध्ये सुरू होत आहे. अनेक दिग्गज खेळाडूंची ही शेवटची स्पर्धा असल्याने या स्पर्धेकडे संपूर्ण जगाचे लक्ष असणार आहे.
Published on
Summary

विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेचा थरार आजपासून कतारमध्ये सुरू होत आहे. अनेक दिग्गज खेळाडूंची ही शेवटची स्पर्धा असल्याने या स्पर्धेकडे संपूर्ण जगाचे लक्ष असणार आहे.

- बायचुंग भुटिया (भारताचा माजी कर्णधार) saptrang@esakal.com

विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेचा थरार आजपासून कतारमध्ये सुरू होत आहे. अनेक दिग्गज खेळाडूंची ही शेवटची स्पर्धा असल्याने या स्पर्धेकडे संपूर्ण जगाचे लक्ष असणार आहे. ही स्पर्धा आतापर्यंतची सर्वांत महागडी स्पर्धाही ठरणार आहे.

आखाती देशात प्रथमच होणारी विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धा प्रत्येकासाठी वेगळा अनुभव देणारी असणार. या ना त्या कारणामुळे काही खेळाडू कधी तरी आखातात फुटबॉलचे सामने खेळलेले असले तरी विश्वकरंडक स्पर्धा ही एक वेगळंच आव्हान असलेली स्पर्धा असते. याची तुलना कोणत्याही स्पर्धेशी होऊ शकत नाही. साधारणतः बहुतेक खेळाडूंना युरोप आणि अमेरिका खंडात खेळण्याचा अनुभव असतो; पण आखातातील उष्णतेचा सामना करून खेळणं सोपं नाही. खेळाडूंना उष्णतेचा त्रास होऊ नये म्हणून वातानुकूलित स्टेडियम तयार करण्यात आली आहेत. खेळाडूंसाठीही हा अनुभव वेगळा असेल. स्पर्धा कुठंही होत असली तरी प्रमुख संघांची क्षमता कमी-जास्त होत नसते. आजकालचे खेळाडू सर्व प्रकारच्या आव्हानांत खेळण्यास सज्ज असतात. शारीरिक तयारीबरोबरच मानसिक तयारीही ते झटपट करू शकतात. हा सर्व विचार करता गतविजेते फ्रान्स, ब्राझील, अर्जेंटिना आणि बेल्जियम हे संभाव्य विजेत्या संघांच्या स्पर्धेत असतील.

फ्रान्स हॉट फेव्हरिट

फ्रान्सनं कमालीची प्रगती केली आहे. विशेष म्हणजे, गतविजेतेपदानंतर त्यांनी आपला स्तर कायम ठेवला आहे. पात्रतास्पर्धेतील शानदार कामगिरीनं त्यांनी आपला मार्ग पुन्हा तयार केला. मुळात डिडिअर डिशॅम्प्स यांनी गेल्या वेळीही संघ तयार केला आणि आताही संघ घडवला आहे. आपल्या प्रत्येक खेळाडूची क्षमता ते अगदी बारकाईनं जाणतात. त्यामुळे आपले पत्ते ते योग्य रीतीनं आणि आवश्यकतेनुसार वापरतील. गेल्या वेळच्या विजेतेपदातील शिलेदार पॉल पोग्बा अँगोलो कांटे या वेळी दुखापतीमुळे खेळू शकणार नाही; पण डिशॅम्प्स यांच्याकडे इतरही चांगले पर्याय आहेत.

यंदाचा बॅलन डिऑर हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळालेल्या करीम बेन्झेमामुळे फ्रान्सच्या आक्रमणाला चांगलीच धार आली आहे. गेल्या वेळी वेगळ्या कारणामुळे तो संघात नव्हता. आता तो त्याच्या संपूर्ण क्षमतांसह खेळणार यात शंकाच नाही. ‘जखमी शेर’ अशा प्रकारे तो भासू शकेल. एकीकडे बेन्झेमा आणि दुसरीकडे पेले यांचा नवा अवतार कायलियन एम्बापे यांची आक्रमणं थोपवणं कुणालाही सोपे नसेल; पण बेन्झेमा आणि एम्बापे यांच्याकडे लक्ष देत असताना ख्रिस्तोफर एन्कुकू याला विसरून चालणार नव्हतं. त्यानं या मोसमात १६ गोल केले आहेत; मात्र, कतारमध्ये आल्यानंतर सराव करताना एन्कुकूचा गुडघा दुखावला आणि तो स्पर्धेबाहेर गेला. डिशॅम्प्स यांनी इतर पर्यायही तयार ठेवले असणारच.

पुन्हा एकदा ब्राझीलची चर्चा

विश्वकरंडक स्पर्धा आली की संभाव्य विजेत्या संघांत नेहमीच ब्राझीलला स्थान असतं... आणि, का असू नये? तिथं प्रत्येकाच्या नसानसात फुटबॉलची झिंग भरलेली आहे. गेल्या २९ सामन्यांपैकी एकच सामना ब्राझीलनं गमावला आहे व तो म्हणजे कोपा अमेरिका स्पर्धेत अर्जेंटिनाविरुद्धचा अंतिम सामना. ब्राझील म्हटलं की नेमारचं नाव सर्वात पुढं येतं. लिओनेल मेस्सी आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो यांच्याएवढाच सुपरस्टारचा लौकिक असलेला हा खेळाडूही अजून ब्राझीलला विश्वकरंडक जिंकून देऊ शकलेला नाही; परंतु तो यंदा चांगलाच फॉर्मात आहे. पीएसजी संघातून खेळताना त्यानं १५ गोल केले असून ११ गोलांना सहकार्य केलं आहे. नेमारसह गॅब्रिएल जीझस आणि रिचर्डसन

यांच्यावर आक्रमणाची धुरा असेल. यंदा ब्राझीलसाठी सर्वात जमेची बाजू म्हणजे, त्यांचे गोलरक्षक अलिसन बेकर (लिव्हरपूल) आणि एडरसन (मँचेस्टर सिटी). दोघांकडेही चांगली चपळता आणि आक्रमण थोपवण्याची क्षमता आहे. यात अलिसन किंचित उजवा वाटतो. नेहमीच डोकेदुखी ठरत असलेल्या बचावफळीनं ब्राझीलला साथ दिली तर ब्राझील पुन्हा विश्वविजेता होऊ शकेल.

बेल्जियन डार्क हॉर्स

फ्रान्स, जर्मनी, ब्राझील यांचीच चर्चा नेहमीच होत असते; परंतु बेल्जियमला कुणीही दुर्लक्षित करू शकत नाही. ‘फिफा’च्या क्रमावारीत ते दुसऱ्या स्थानावर आहेत हे विसरून चालणार नाही. सर्व काही जुळून आलं तर बेल्जियम विजेता झाल्यास आश्चर्य वाटू नये. केविन डी ब्यूअन, एडन हाझार्ड आणि रोमेलू लुकाकू यांच्याकडे कोणताही बचाव भेदण्याची क्षमता आहे. एकीकडे हे आक्रमण आणि दुसरीकडे गोलजाळ्यात असलेली थिबॉट कॉर्टोईस ही भिंत जबरदस्त आहे. थिबॉट हा ‘ला लीगा’मध्ये अव्वल स्थानावर असलेल्या रेयाल माद्रिदचा गोलरक्षक आहे. ‘बॅलॉन डिऑर हा पुरस्कार स्ट्रायकरलाच का दिला जातो, गोलरक्षकाला का नाही?’ असा आवाज त्यानं या वेळी उठवला होता. एवढी त्याची कामगिरी भरीव होत आहे.

माझा सपोर्ट मेस्सीला

तुमचा-आमचा सर्वांचाच लाडका लिओनेल मेस्सी! फुटबॉलक्षेत्रातील या महान खेळाडूची ही अखेरची विश्वकरंडक स्पर्धा असेल. मेस्सीची महती किती वर्णावी...? पण अद्याप तो आपल्या अर्जेंटिनाला विश्वकरंडक जिंकून देऊ शकलेला नाही. ‘आत्ता नाही तर कधीच नाही...’ अशा वाटेवर तो आहे. क्षमतेपेक्षा अधिकचं देऊन तो प्रयत्न करणार यात शंकाच नाही; पण फुटबॉल हा टीम-गेम आहे. अचूक आक्रमण होणं, योग्य वेळी पास मिळणं या गोष्टी जेवढ्या महत्त्वाच्या असतात, तेवढा बचावही भक्कम असायला हवा. मेस्सी मैदानात उतरला की सर्वच प्रतिस्पर्धी त्याची कोंडी करतात; पण अशा वेळी दुसऱ्या खेळाडूंनी संधी साधली की मेस्सीवरचं दडपण दूर होईल. डीबाला आणि डी मारिया यांची साथ मेस्सीला मिळणे आवश्यक आहे. डीबाला पूर्ण तंदुरुस्त नाही, तरी त्याला संघात स्थान देण्यात आलं आहे. महत्त्वाच्या किंवा बादफेरीच्या सामन्यासाठी त्याला खेळवलं जाईल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे अर्जेंटिनाचा संघ चांगलाच फॉर्मात आहे. ‘कोपा अमेरिका’ स्पर्धेचं विजेतेपद आणि विश्वकरंडक स्पर्धेतील पात्रतासामने यांमध्ये ते अपराजित आहेत. यात आता सातत्य ठेवलं की मेस्सी विश्वकरंडक उंचावतोय, हे दृश्य आपण पाहू शकतो!

पाच राखीव खेळाडू गरजेचे

कतारमधील ही स्पर्धा सर्वांचाच कस पाहणारी ठरणार आहे. उष्ण हवामानामुळे खेळाडूंना थकवा येऊ शकतो, त्यासाठी तीनऐवजी पाच राखीव खेळाडू मैदानात उतरवण्याचा नियम ‘फिफा’नं या विश्वकरंडकासाठी तयार केला आहे. याचा फायदा सर्वच संघांना होईल. याचा जास्त फायदा बादफेरीच्या सामन्यांमध्ये होऊ शकेल; परंतु, या नव्या बदलाचा प्रशिक्षक कसा उपयोग करतात हे पाहणं उत्सुकतेचं असेल, हे मात्र खरं.

महिला रेफ्री

कतारमधील या स्पर्धेत आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य असणार आहे ते म्हणजे सहा महिला रेफ्रींचं. फुटबॉल या गतिमान खेळात केवळ खेळाडूंचाच कस लागत नाही, तर चेंडूबरोबर धावावं लागणारे रेफ्रीही तेवढेच चपळ आणि तंदुरुस्त असावे लागतात. आत्तापर्यंत महिलांच्या सामन्यात महिला रेफ्री असायचा; परंतु विश्वकरंडक स्पर्धेत महिला रेफ्री आपली पॉवर दाखवताना दिसतील. हे चित्र स्त्री-पुरुष एकात्मता जगाला दाखवून देईल. त्यामुळे मीसुद्धा हे सामने पाहण्यास उत्सुक आहे.

(शब्दांकन : शैलेश नागवेकर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com