भातावर का बरे राग | saptarang | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भातावर का बरे राग

भातावर का बरे राग!

भात कधी भारतीयांच्या ताटाबाहेर राहू शकतो का? आपण हॉटेलमध्ये जेवायला गेलो तर जेवण्याच्या थाळीला राईस प्लेट असे म्हणतात. पण त्यात फक्त राईसच नसतो पोळ्यासुद्धा असतात. तरी त्या थाळीला चपाती प्लेट म्हटले जात नाही.

आजकाल कोणाचे दिवस कधी पालटतील याचा काही नेम राहीला नाही. रावाचा रंक अन रंकाचा राव कधी झाला हे अजिबात कळत नाही. ''अरे, बघ तो बीएमडब्लूमध्ये फिरतोय, नाहीतर एक वेळ माझ्या मागे मागे फिरायचा एक कप चहासाठी.’ यात आपण त्याचा मोठेपणा सांगतोय की आपला फडतुसपणा हेच समजत नाही. असो, तर काही वर्षांपूर्वी अगदी थाटात प्रत्येकाच्या ताटात विराजमान असलेला भात हा पांढराशुभ्र खाद्यपदार्थ आता तोंड काळे करून पसार झाला आहे, असे म्हणण्याची वेळ आली आहे. अगदी जेवताना दररोज जेवणाची सुरुवात व शेवट आपण ज्या भाताने करत होतो त्याच भातावर ताटातून परांगदा होण्याची वेळ यावी? अहो शेवटी भात घ्यावा म्हणजे सासुरवाडी श्रीमंत मिळते, अशी या भाताची ख्याती असताना आता या भाताकडे पाठ फिरवण्याची वेळ आली.

‘अहो, जेवणात भात नसला ना की मला पोट भरल्यासारखेच वाटत नाही,’ ‘शेवटी दही भात तर हवाच,’ ‘भाताला नाही म्हणू नका हो, घ्या थोडा’, असे वाक्य आपल्या कानी नेहमी पडतात. पण आता ‘भात नको बरं मला, डॉक्टरांनी नाही म्हणून सांगितले आहे, वजन कमी करण्यासाठी’, ‘अगदी थोडा भात द्या मला, डायबेटिस आहे ना’ , ‘तुम्हाला वजन कमी करायचे आहे ना, मग भात एकदम बंद’ असे वाक्य कानावर आदळतात. समस्त भारतीयांना अतिप्रिय असलेला भात हा खाद्यपदार्थ वाढते वजन कमी व्हावे यासाठी खाण्याला प्रतिबंध केला जात आहे. प्रत्येक लहान मुलाला पहिला खाद्यपदार्थ कोणता दिला जात असेल तर तो अगदी मऊ भात व वरण अन त्यावर तूप. काय शाही चव असते या भाताची. अशा भातासमोर अगदी पंचतारांकित हॉटेलमधील जेवण फिके वाटेल. आपल्या जीवनात ज्या खाद्याने प्रारंभ केला त्या खाद्यपदार्थाला आता खाऊ नका असे म्हणणे म्हणजे एखाद्या पट्टीच्या पोहणाऱ्याला आता पोहू नको असे म्हणणे किंवा सचिन तेंडुलकरला ऐन भरात असताना क्रिकेट खेळू नकोस असे म्हणण्यासारखे आहे.

मासा कधी पाण्याच्या बाहेर राहू शकतो का? तसे भात कधी भारतीयांच्या ताटाबाहेर राहू शकतो का? आपण हॉटेलमध्ये जेवायला गेलो तर जेवण्याच्या थाळीला राईस प्लेट असे म्हणतात. पण त्यात फक्त राईसच नसतो पोळ्यासुद्धा असतात. तरी त्या थाळीला चपाती प्लेट म्हटले जात नाही. इतके महत्त्व भाताला आहे. आपल्या डोक्यावर अक्षदा पडतात त्यासुद्धा तांदळाच्या बनलेल्या असतात. गव्हाला तेथे स्थान नसते. परीक्षेला जाताना आई दही-भातच खाऊन जाण्यासाठी आग्रह करायची ना. पेपर चांगला जावा म्हणून. मग या संकटमोचन भाताने इतकी आम्हाला साथ दिली असताना आता मात्र त्याला लाथ मारणे हे अप्पलपोटेपणाचे लक्षण नाही का? लहानपणीच नाही तर माणूस मेल्यानंतर भातच कायमचा सोबती असतो. तेरवीत भाताचीच खीर असते ना? एवढेच काय दरवर्षी आपल्या पितरांना जेऊ घालताना आपण भाताचीच खीर करतो.

एवढे असताना हे निर्दयी आम्हाला भात खाऊ नका असे सांगतात. किती हा अन्याय. बेसन भात, पीठले भात, झुणका भात नाही खायचा तर मग जगायचे तरी कशाला? मस्त दही घालून चमचमीत केलेल्या पिठले भातासोबत नाही खायचे म्हणजे अतीच झाले. वजन कमी करायचे म्हणून भात, खिचडी खाऊ नका मग बडवा दोन्ही वेळ पोळ्या, वाढले न काम, असा स्रियांचा घोष चालू असतो. मसाले भात, बिर्याणी हे चमचमीत पदार्थ कधी खावे? तुरीच्या शेंगाच्या मौसमात सोले भात खायचा नाही म्हणजे काय? असे अनेक प्रश्न भात बंद करण्याचा निर्णय घेतला तर निर्माण होतात. अर्थात भात बंद करण्याचा निर्णय योग्य की अयोग्य हे मी आपणावर सोपवतो व लांबलेले हे भातपुराण थांबवतो.

-संजय पांडे, नागपूर

loading image
go to top