आयपीओ म्हणजे काय? (भूषण गोडबोले)

भूषण गोडबोले godbolebhuushan19@gmail.com
रविवार, 1 एप्रिल 2018

भांडवलाच्या उभारणीसाठी अनेक उद्योग शेअर बाजारात प्रवेश करतात. प्राथमिक समभागविक्री (आयपीओ) करून ही कंपनी शेअर बाजारात प्रवेश करते. आयपीओ हा प्रकार नेमका असतो कसा, त्याचं काम कसं चालतं, मूल्यं कशी निश्‍चित केली जातात आदी गोष्टींबाबत माहिती.

भांडवलाच्या उभारणीसाठी अनेक उद्योग शेअर बाजारात प्रवेश करतात. प्राथमिक समभागविक्री (आयपीओ) करून ही कंपनी शेअर बाजारात प्रवेश करते. आयपीओ हा प्रकार नेमका असतो कसा, त्याचं काम कसं चालतं, मूल्यं कशी निश्‍चित केली जातात आदी गोष्टींबाबत माहिती.

कोणत्याही व्यवसायाची उभारणी करण्यासाठी भांडवलाची गरज असते. सर्वसाधारणपणे लघुउद्योगाची निर्मिती एक व्यक्ती किंवा काही व्यक्तींच्या भागीदारीतून होऊ शकते. अशी कंपनी प्रोपायटरी किंवा पार्टनरशिप फर्म अथवा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असू शकते. मोठ्या उद्योगाच्या निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात भांडवलाची गरज असते. साधारणपणे वित्तसंस्था, बॅंका यांच्याकडून कर्ज घेऊनदेखील पुरेसं भांडवल जमा होत नसेल, तर असं भांडवल लोकांकडून जमा करता येतं. लोकांकडून अशा प्रकारे भांडवलाची मागणी किंवा पैशाची उभारणी करण्याच्या प्रक्रियेला "पब्लिक इश्‍यू' किंवा "इनिशिअल पब्लिक ऑफर' म्हणजेच "आयपीओ' असे म्हणतात. मराठीत प्राथमिक समभागविक्री असा शब्द वापरला जातो.

पब्लिक इश्‍यूमार्फत भांडवलाची उभारणी करण्यात आलेल्या कंपनीमध्ये लोकांचं म्हणजेच "पब्लिक'चं भांडवलदेखील गुंतवण्यात आल्यानं अशा कंपनीला "पब्लिक लिमिटेड' म्हणून संबोधलं जातं. जे लोक आयपीओमार्फत कंपनीच्या भांडवलात गुंतवणूक करतात, अशा लोकांना कंपनीच्या भांडवलात गुंतवणुकीचा हिस्सा असल्याचे प्रमाणपत्र म्हणजेच शेअर सर्टिफिकेट मिळतं. शेअर म्हणजे कंपनीच्या भांडवलात गुंतवणूकदाराचा हिस्सा. उदाहरणार्थ, समजा दोन व्यक्तींनी स्वतःकडच्या दहा कोटी रुपयांचं भांडवल गुंतवून एका कंपनीची उभारणी केली, तर अशा कंपनीमध्ये केवळ मालकांकडच्या भांडवलाची गुंतवणूक असल्यानं या कंपनीस प्रायव्हेट लिमिटेड म्हणून रजिस्ट्रेशन करता येऊ शकेल. मात्र, समजा सात जणांना कंपनी उभारण्यासाठी पन्नास कोटी रुपये भांडवलाची गरज आहे. अशा वेळेस कंपनीनं स्वतःकडच्या तीस कोटी रुपयांचं भांडवल गुंतवून वीस कोटी रुपयांचं भांडवल आयपीओमार्फत लोकांकडून गोळा केल्यास या कंपनीमध्ये लोकांचंदेखील भांडवल गुंतवलं गेल्यानं या कंपनीस पब्लिक लिमिटेड म्हणून संबोधलं जाईल. ज्या लोकांनी कंपनीमध्ये भांडवल गुंतवलं, अशा लोकांना गुंतवणुकीच्या प्रमाणात गुंतवणुकीचा हिस्सा असल्याचं प्रमाणपत्र म्हणजेच शेअर सर्टिफिकेट देण्यात येईल. आयपीओ किंवा इनिशिअल पब्लिक ऑफर मार्फतकंपनी गुंतवणूकदारांकडून भांडवल जमा करते आणि गुंतवणूकदारांना शेअर्सचं वितरण करते. यामुळे "इनिशिअल पब्लिक ऑफर' बाजाराला "प्रायमरी मार्केट' म्हणूनही ओळखलं जातं.

आयपीओमार्फत शेअर्सची विक्री दोन प्रकारे करता येते. पहिला प्रकार म्हणजे फिक्‍स्ड प्राइस किंवा निश्‍चित मूल्य आणि दुसरा प्रकार म्हणजे बुक बिल्डिंग. फिक्‍स्ड प्राइस प्रोसेसमध्ये शेअरची एक निश्‍चित किंमत जाहीर केली जाते. ती ज्यांना मान्य असते, ते लोक शेअर्ससाठी आयपीओसाठीचा अर्ज भरतात. हे अर्ज सर्व शेअर ब्रोकर्सकडे उपलब्ध असतात; तसंच ऑनलाइनदेखील भरता येतात. बुक बिल्डिंग प्रकारात एक ठराविक किंमत न ठरवता किमान ते कमाल अशा किंमतीचा एक पट्टा जाहीर केला जातो. जेव्हा कंपनीमार्फत शेअर्स वितरीत होतात, त्या भावाला "इश्‍यू प्राईस' म्हणतात. "बुक बिल्डिंग' प्रकारात गुंतवणूकदारांचा प्रतिसाद म्हणजेच मागणी लक्षात घेऊन "डिस्कवर्ड प्राइस'नं म्हणजेच किमान आणि कमाल पट्ट्यातल्या ज्या जास्तीत जास्त किंमतीचे शेअर्स विकले जाऊ शकतात, त्या सगळ्यांना मागणीच्या पुरवठ्याच्या प्रमाणात शेअर्स दिले जातात. कंपनीनं शेअर सर्टिफिकेटवर जी किंमत छापलेली असते, तिला छापील किंमत किंवा "दर्शनी किंमत' किंवा "फेस व्हॅल्यू' म्हणतात. सर्वसाधारणपणे दर्शनी किंमत एक रुपया, दोन रुपये, पाच रुपये, दहा रुपये अशी असते. आपण ज्या किंमतीला शेअर्स खरेदी करतो किंवा आयपीओमार्फत ज्या किंमतीला कंपनी गुंतवणूकदारांना शेअर्सचं वितरण करते, ती किंमत फेस व्हॅल्यूपेक्षा वेगळी असू शकते. उदाहरणार्थ, समजा एका शेअरची दर्शनी किंमत दहा रुपये आहे; पण पब्लिक इश्‍यूमध्ये शेअरचा भाव पन्नास ते साठ रुपये या रेंजमध्ये मागितला असेल, तर इथं चाळीस ते पन्नास रुपयांचा प्रीमियम मागण्यात आला आहे. पन्नास ते साठ रुपये या किंमतपट्ट्यात लोक शेअर्सची मागणी करू शकतात. या रेंजला "प्राइस बॅंड' असं म्हणतात. या प्राइस बॅंडमध्ये ज्या किंमतीला जास्तीत जास्त मागणी होते, अशा किमतीला "कट ऑफ प्राइस' म्हणतात. समजा मागणीनुसार "कट ऑफ प्राइस' 55 रुपये जाहीर झाल्यास 55 रुपयांना शेअर्सचं वितरण करण्यात येतं.
व्यक्तींप्रमाणंच बॅंका, वित्तसंस्था, अनिवासी भारतीय यांनादेखील भागधारक किंवा शेअरहोल्डर होता येतं. भागधारकांमधून ठराविक लोकांची निवड करून संचालक मंडळात समाविष्ट केलं जातं. संचालक मंडळाद्वारे कंपनीचं कामकाज चालवलं जातं.

Web Title: bhushan godbole wirte article in saptarang