
डॉ. कैलास कमोद
जन्मदिवस वर्षागणिक पुनःपुन्हा येतो तो वाढदिवस म्हणून. वास्तविक सूर्य रोज उगवतो तसा मावळतोसुद्धा. सूर्याला दिवस, महिना, वर्ष वगैरे संकल्पना ठाऊक नाहीत. निसर्गाचं कालचक्र अव्याहत सुरू आहे, सुरू राहणार आहे. साहजिकच वर्षगणना ही मानवनिर्मित संकल्पना आहे, म्हणून माणसाच्या जीवनात वाढदिवस येत असतो. उत्पत्ती-स्थिती-लय ही अवस्था कुणाच्याही जीवनाची असतेच असते. ‘गीतरामायणा’तल्या ‘वर्धमान ते ते चाले मार्ग रे क्षयाचा’ या उक्तीनुसार, ‘एक वर्षानं वय वाढलं’ याचा अर्थ ‘एक वर्षानं आयुष्य कमी झालं’. तरीही त्याचा विचार केला जात नाही. वय वाढलं याचाच आनंद व्यक्त केला जातो. ती मानवी प्रवृत्ती आहे. जगभरातून वाढदिवस वेगवेगळ्या पद्धतीनं साजरे केले जातात.