esakal | बोन्साय’ ते ‘थीम पार्क इंडिया’
sakal

बोलून बातमी शोधा

बोन्साय’ ते ‘थीम पार्क इंडिया’

बोन्साय’ ते ‘थीम पार्क इंडिया’

sakal_logo
By
संदीप काळे saptrang@esakal.com

चित्रकार डॉ. नरेंद्र बोरलेपवार यांचा सकाळीच फोन आला. म्हणाले : ‘‘चला, काल ठरल्याप्रमाणे आपल्याला निघायचंय.’’आम्ही पुणे-मुंबई महामार्गालगत कार्ल्याच्या दिशेनं निघालो. आम्हाला ज्या व्यक्तीला भेटायचं होतं ती व्यक्ती, वाहाणगावच्या अगदी काही अंतरावर, आमच्या स्वागतासाठी उभीच होती. त्या परिसरातील सौंदर्य पाहून, आपण महाराष्ट्रातच आहोत काय असा प्रश्न पडला. चारही बाजूंनी पाणी, बसण्यासाठी गुंफा, आजूबाजूला असंख्य प्रकारच्या वनस्पती, झाडं, जिकडं जावं तिकडं झाडांच्या भोवताली लावलेलं मंजूळ संगीत...जी व्यक्ती आमची वाट बघत होती, तिनं छंदातून ‘सेंटर फॉर पर्फेक्ट हेल्थ’ हा प्रकल्प सुरू केला आहे. ‘थीम पार्क इंडिया’ हा त्यांचा मुख्य प्रकल्प असून, त्याअंतर्गत ‘सेंटर फॉर पर्फेक्ट हेल्थ’ हा प्रकल्प आहे. त्या व्यक्तीचं नाव गिरिधारी काळे. (bonsai to theme park india)

व्यवसायानं इंजिनिअर असणारे काळे यांना वैदिक संस्कृतीची, भारतीय शास्त्रपुराणांची अतिशय आवड. काळेकाकांनी त्याविषयी खूप अभ्यास केला आहे. त्यातून काहीतरी वेगळं करण्याचं त्यांनी ठरवलं आणि हा प्रकल्प आकाराला येत आहे. येत्या वर्षात तो पूर्णत्वाला जाईल. चार धामांपासून ते देशातल्या सर्व राज्यांच्या प्रतिकृती इथं साकारल्या जात आहेत. काळेकाकांनी आम्हाला सर्व प्रकल्प गाडीतून फिरवून दाखवला. दोन तास लागले. नंतर काळेकाका आपली सात वर्षांची नात कामाक्षी हिच्याशी खेळण्यात रमून गेले. ज्यांनी ‘इमेजिका प्रोजेक्ट’ तयार केला आहे ते प्रभुदा परदेशी - श्रीकर परदेशी यांचे भाऊ -हे या सर्व प्रकल्पाचं काम पाहत आहेत. त्यांच्याशीही गप्पा झाल्या.

काळेकाका म्हणाले : ‘‘वैदिक शिक्षण ही काळाची गरज आहे. माणसाची शारीरिक अवस्था, तिचा निसर्गाशी समतोल राखण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाची भूमिका बजावणारा आहे. वैज्ञानिक दृष्टीनं महत्त्व असलेला हा प्रकल्प संस्कार आणि सेवाभाव यावर नॅचरल थेरपीच्या माध्यमातून काम करेल. ‘तू किमान दहा लोकांना रोजगार दिला पाहिजेस,’ असं मला माझे वडील - श्रीनिवास काळे- म्हणायचेे. आज माझ्याबरोबर सेवाभावी कामासाठी असंख्य हात राबत आहेत...हे पाहण्यासाठी वडील आज हवे होते...’’

त्या प्रकल्पाच्या ठिकाणी सर्वात महत्त्वाची होती ती बोन्साय प्रकारातील झाडं. अत्यंत जुनी, कितीतरी वर्षांचं वय असणारी पाच हजारांहून अधिक बोन्सायची झाडं तिथं आहेत.

काळे काका म्हणाले : ‘‘माझी पत्नी प्राजक्ता काळे (९०१११००००१) बोन्साय-आर्टिस्ट आहे. बोन्सायची झाडं जमवणं, त्यांची निगा राखणं, त्यांचं प्रदर्शन भरवणं हा छंद तिनं ३८ वर्षांपासून जोपासला आहे.’’

आम्ही काळेकाकूंनाही भेटायचं ठरवलं आणि काकांचा निरोप घेऊन पुण्याकडे निघालो. पुण्यातल्य बाणेर-पाषाण रोडलगत असलेल्या ‘अभिमानश्री सोसायटी’त आम्ही पोहोचलो. रात्रीचे दहा वाजून गेले होते. काकांचे सोबती संतोष उणेचा यांनी आमची प्राजक्ताकाकूंशी ओळख करून दिली. काकूंनी आम्हाला जेवायचा आग्रह केला. जेवताना गप्पा रंगल्या.

हेही वाचा: अलिबाग-मुरूड मार्गावरील काशीद पूल गेला वाहून; एकाचा मृत्यू

काकूंनी बोन्सायचा हा छंद केवळ स्वतःपुरताच मर्यादित न ठेवता त्या माध्यमातून राज्यातल्या असंख्य महिलांना, उद्योगाची कास कशी धरायची, हेही शिकवलं असल्याचं गप्पांमधून कळलं.

‘बोन्साय नमस्ते’ नावाची संस्था काकूंनी स्थापन केली आहे. तीद्वारे अनेक बचतगटांच्या माध्यमातून होतकरू महिलांना या उपक्रमात त्यांनी सहभागी करून घेतलं. कितीतरी देशांतून त्यांनी बोन्सायचे अनेक विकसित वाण आणून त्यांच्यावर प्रक्रिया केली. ‘‘काही बोन्सायची किंमत तर दोन कोटींच्या घरात आहे,’’ अशी माहिती काकूंनी दिली.

हेही वाचा: लोकल तातडीने सुरु करा, प्रवीण दरेकरांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलं पत्र

‘‘तुम्ही ही झाडं विकत का नाही?’’ या प्रश्नावर काकू हसत हसत म्हणाल्या : ‘‘ज्या झाडांना मी माझ्या लेकरांप्रमाणे वाढवलंय, त्यांची निगा राखलीय ती झाडं मी इतरांना कशी विकू? अनेक जण माझ्याकडेच झाडं सांभाळायला आणून देतात. हा छंद विकसित व्हावा यासाठी आम्ही अभ्यासक्रमही सुरू केला आहे. जपानमध्ये तर शाळेतच हा अभ्यासक्रम शिकवला जातो. आता आम्ही वड, पिंपळ, आंबा, उंबर, बेल असं एकत्रित असणारं झाड विकसित करत आहोत, त्याला शास्त्रीय महत्त्व आहे.’’

काका-काकूंच्या उपक्रमाला मुलगा आलोक, सून कामना, मुलगी मोहिनी, काकूंचे बंधू राहुल राठी हे सर्वजण उत्स्फूर्तपणे मदत करतात.

काकू म्हणाल्या : ‘‘कोरोनाच्या काळात माझ्या सासूबाई कावेरीबाई यांची काळजी घ्यावी लागायची, म्हणून मी प्रकल्पाच्या ठिकाणी जाण्याऐवजी घरीच झाडांची कामं करते.’’

काकू हे सांगत असताना कावेरीबाईंच्या डोळ्यांत मुलगा आणि सून यांच्याविषयीचा अभिमान दिसत होता. सासूबाईंबरोबरच काकूंना त्यांचे वडील श्यामसुंदर आणि आई विमलाबाई यांचीही आठवण आली. ‘‘आज बाबा नाहीत,’’ असे म्हणत त्या भावुक झाल्या.

काकूंचा निरोप घेऊन आम्ही मुंबईकडे निघालो.

काळे काका-काकूंनी आपल्या छंदाला जिद्दीची जोड दिली आणि ‘बोन्साय’ ते ‘थीम पार्क इंडिया’ असा इतिहास निर्माण केला. तो आम्ही त्या दिवशी अनुभवला. त्यांनी हे सेवाभावी वृत्तीतून जोपासलं आहे हे विशेष. आपल्या व्यक्तिगत छंदाला जिद्दीच्या बळावर असं व्यापक, विधायक रूप तुम्ही-आम्हीही देऊ शकतो.

हो ना...!

संदीप काळे

९८९००९८८६८

loading image