समकालीन जाणिवेतून रामकथेचा पारमार्थिक अन्वयार्थ

डॉ. स्वाती कर्वे
रविवार, 12 फेब्रुवारी 2017

‘रामायण’ आणि ‘महाभारत’ या दोन्ही महाकाव्यांना भारतीय सांस्कृतिक परंपरेत असणारं अनन्यसाधारण महत्त्व आजही टिकून आहे. ‘रामायण’ म्हणजे आदर्श प्रभू रामचंद्रांची चरित्रगाथा. रामानं सत्यवचनी, एकवचनी, आदर्श पुत्र, पती, राजा, योद्धा इत्यादी रूपानं समाजापुढं आदर्शच उभा केला. मर्यादापुरुषोत्तम रामाचं चरित्र आजही समाजमनावर संस्कार करून आत्मविकासाला प्रेरणा देणारं आहे. आजच्या गतिमान, व्यग्र आणि स्पर्धायुक्त जीवनात जगणाऱ्या माणसांसमोर अनेक प्रश्‍न आहेत. अशा वेळी सत्त्वयुक्त व्यक्तिमत्त्वाची जोपासना करण्यासाठी रामचरित्र मार्गदर्शक ठरेल.

‘रामायण’ आणि ‘महाभारत’ या दोन्ही महाकाव्यांना भारतीय सांस्कृतिक परंपरेत असणारं अनन्यसाधारण महत्त्व आजही टिकून आहे. ‘रामायण’ म्हणजे आदर्श प्रभू रामचंद्रांची चरित्रगाथा. रामानं सत्यवचनी, एकवचनी, आदर्श पुत्र, पती, राजा, योद्धा इत्यादी रूपानं समाजापुढं आदर्शच उभा केला. मर्यादापुरुषोत्तम रामाचं चरित्र आजही समाजमनावर संस्कार करून आत्मविकासाला प्रेरणा देणारं आहे. आजच्या गतिमान, व्यग्र आणि स्पर्धायुक्त जीवनात जगणाऱ्या माणसांसमोर अनेक प्रश्‍न आहेत. अशा वेळी सत्त्वयुक्त व्यक्तिमत्त्वाची जोपासना करण्यासाठी रामचरित्र मार्गदर्शक ठरेल. या विश्‍वासानंच तेजज्ञान फाउंडेशनचे संस्थापक सरश्री यांनी समकालीन जाणिवेतून रामचरित्राचा पारमार्थिक अन्वय लावणारी व्याख्यानं दिली. ही सर्व व्याख्यानंच ‘सकाळ प्रकाशना’नं ‘रामायण वनवास रहस्य’ या पुस्तकात प्रसिद्ध केली आहेत.
सरश्री यांनी विवेचन करताना एक संकल्पनात्मक विचार पायाभूत स्वरूपात प्रथम स्वीकारला आहे. माणसाचं शरीर म्हणजे दहा इंद्रियांचा दशरथ आहे. दोन डोळे, दोन कान, नाक, जीभ, त्वचा, मन, बुद्धी, प्राण यांचा मिळून दशरथ. राम या दशरथाचा सारथी आहे. शरीरात चेतनारूपी राम आरूढ होतो, तेव्हा शरीर अभिव्यक्तीसाठी सिद्ध होतं. चैतन्य लोप पावतं, तेव्हा शरीर अचेतन होतं. माणूस देव आणि दानवाचं संमिश्र रूप आहे. सकारात्मक दृष्टिकोन म्हणजे देवत्व. नकारात्मक दृष्टिकोन म्हणजे दुष्कर्म. म्हणजे दावनत्व. आपल्यातलं देवत्व विकसित करायचं आहे. स्वत-मधल्या रामाला (स्वभाव), ‘स्व’च्या जाणिवेला विकसित करायचं आहे. रामकथेच्या वाचनानं मनोविकास साधायचा आहे. या मध्यवर्ती सूत्राच्या आधारे सरश्री यांनी रामचरित्राचं निरूपण केलं आहे.

‘पूर्वलीला’, ‘बाललीला’, ‘स्वयंवर युद्धलीला’, ‘महालापासून दूर - मर्यादा आणि मिलाफ’, ‘राम वनवास लक्ष्य’, ‘रामनाम रहस्य’, ‘तुमच्या जीवनातील अल्प वनवास’, ‘संपूर्ण रामायण - संक्षिप्त दर्शन’ अशा आठ खंडांमध्ये सरश्रींनी निरूपण केलं आहे. परिशिष्टात लक्ष्यभेदी लक्ष्मण आणि नारदांच्या मानभंगाची कथा सांगितली आहे. सरश्रींच्या विवेचनाचं वैशिष्ट्य म्हणजे समकालीन जीवनाच्या संदर्भात रामचरित्रातल्या घटनांचा, प्रसंगांचा, व्यक्तिमत्त्वांचा त्यांनी घेतलेला वेध. उदाहरणार्थ सीता स्वयंवर. राम-सीतेचा विवाह ही रामाच्या चरित्रातली महत्त्वाची घटना आहे. सीता म्हणजे सत्य. सीतेची प्राप्ती म्हणजे सत्याची प्राप्ती आणि शिवधनुष्य म्हणजे अहंकार. माणसाला स्वत-विषयी, स्वत-च्या सामर्थ्याविषयी अहंकार, गर्व असतो. गर्व असतो, तोपर्यंत सत्याची प्राप्ती होत नाही. राम गुरूंच्या आज्ञेनं स्वयंवरात भाग घेतो. धनुष्याला वंदन करतो. नंतर धनुष्य उचलतो. धनुष्य भंग पावतं. अहंकार नसतो, म्हणून राम यशस्वी झाला. हे सारं विवेचन ‘सीता स्वयंवर - अहंकाराचा मृत्यू’ या प्रकरणात मुळातून वाचावं असंच आहे. मंथरेनं कैकेयीच्या मनात विष पेरलं. मंथरेच्या नादानं कैकेयीनं स्वत-चं नुकसान करून घेतलं. या घटनेचा उपयोग करून आपली बुद्धी भ्रष्ट करायला, सत्यापासून दूर नेण्याला, मन विचलित करायला अनेक मंथरा आपल्याभोवती वावरत असतात. त्यांना कसं ओळखायचं, त्यांच्यापासून दूर कसं राहायचं, याविषयी महत्त्वाचं विवेचन सरश्रींनी केलं आहे. या विवेचनाचा धागा रामचरित्राबरोबर पुढं समांतर रीतीनं विकसित केला आहे.

या पुस्तकाचं आणखी एक वेगळेपण आणि वैशिष्ट्य आवर्जून नोंदवलं पाहिजे. भक्तिमार्गात ‘नवविधा’ भक्तीला अतिशय महत्त्व आहे. रामानं लक्ष्मणाला भक्ती करण्याचे नऊ प्रकार सांगितले. तेविसाव्या अध्यायात भक्तीच्या नऊ प्रकारांचं स्वरूप स्पष्ट करून ज्ञान आणि भक्ती परस्परपूरक कशा आहेत, याविषयी महत्त्वाचं विवेचन केलं आहे. ‘खऱ्या भक्तीच्या परमोच्च अवस्थेत भक्त स्वानुभवातून ईश्‍वराचं आणि त्याच्या लीलेचं रहस्य जाणून घेतो. म्हणजेच अंतिम ज्ञान, तेजज्ञान प्राप्त करतो. भक्ती आणि ज्ञान हे दोन्ही एकमेकांचे आधार आहेत. ते परस्परांना मार्गभ्रष्ट होण्यापासून रोखून एकमेकांच्या साथीनं अंतिम लक्ष्य गाठतात. (पृ. १६९)
सातव्या खंडातलं ‘तुमच्या जीवनातील अल्प वनवास’ हे प्रकरण सर्वांत महत्त्वाचं. आज आधुनिक तंत्रज्ञानाच्या दृश्‍य माध्यमांच्या प्रभावाच्या काळात माणसं जीवन जगत आहेत. तंत्रज्ञानानं एकीकडं जग जवळ आणलं आहे. एका क्‍लिकवर हवं ते, हवं तेव्हा तुमच्या समोर येतं आहे. परंतु दुसरीकडे माणूस एकटा, सुटा, एकाकी होत आहे. यंत्रावर माणूस गरजेपेक्षा जास्त अवलंबून राहात आहे. अशा जीवनशैलीत मन शांत, विकाररहित होण्यासाठी माणसाला त्रास देणाऱ्या षड्रिपूंना म्हणजेच डोळे, कान, जिव्हा, त्वचा, विचार इत्यादींना काही काळ वनवासाला पाठवावं, अलिप्त ठेवावं. प्रयत्नपूर्वक सवयी हळूहळू कमी कराव्यात. त्यातूनच हळूहळू मनसंयम, निग्रह साधून मन-शांतीचा अनुभव घ्यावा. या संदर्भातलं सर्वच विवेचन महत्त्वाचं, वाचनीय आणि उद्‌बोधक आहे. अतिशय सोप्या, प्रवाही भाषेतलं, कोणालाही पटकन समजेल असं विवेचन हे या पुस्तकाचं वैशिष्ट्य. जीवनाच्या वाटचालीत कधी जाणवणाऱ्या मानसिक अस्वस्थतेच्या वेळी, ताणतणावाच्या प्रसंगी ‘वनवास रहस्य’ प्रकरण वाचलं, की मनातलं कोलाहल शांत होऊन मन सुशांत झाल्याचा अनुभवही घेता येईल.

पुस्तकाचं नाव -
रामायण - वनवास रहस्य

लेखक - सरश्री
प्रकाशक -
सकाळ प्रकाशन, पुणे  
(०२० - २४४०५६७८)
पृष्ठं - २५६ /
मूल्य - १९५ रुपये

Web Title: book review in saptarang