संतुलित आहाराचा भारतीय मंत्र

नयना निर्गुण
रविवार, 5 मार्च 2017

भारतीय आहार हा आरोग्यदृष्ट्या संतुलित मानला जातो. पूर्वी काय, किती, केव्हा खावं याचा निर्णय घरातल्या स्त्रियांच्या हातात होता. पोळी-भाजी, वरणभात, आमटी, चटण्या, कोशिंबीर, एखादा गोड पदार्थ असा थाट असायचा. कोणत्या पदार्थाबरोबर काय खायचं, हेही ठरलेलं असायचं. म्हणूनच जड वाटणारे पदार्थही सहज पचायचे.

भारतीय आहार हा आरोग्यदृष्ट्या संतुलित मानला जातो. पूर्वी काय, किती, केव्हा खावं याचा निर्णय घरातल्या स्त्रियांच्या हातात होता. पोळी-भाजी, वरणभात, आमटी, चटण्या, कोशिंबीर, एखादा गोड पदार्थ असा थाट असायचा. कोणत्या पदार्थाबरोबर काय खायचं, हेही ठरलेलं असायचं. म्हणूनच जड वाटणारे पदार्थही सहज पचायचे.
आता ‘फिटनेस’च्या जमान्यात असा चारी ठाव स्वयंपाक मागं पडला, शिवाय खाण्याचं नियोजन आहारतज्ज्ञ किंवा नेटवरून मिळवलेली माहिती, जाहिरातींच्या हाती गेलं. त्यातूनच भारतीय आहारातील प्रमुख घटक असलेले काही पदार्थ वर्ज्य केले जाऊ लागले. पिढ्यान्‌ पिढ्या खाल्ले जाणारे, परिसरातच पिकणारे, स्वादिष्ट आणि आरोग्यदायी, मात्र आता आजार आणि वजनवाढीच्या भीतीनं दूर सारलेले, अशा दहा भारतीय पदार्थांचं-‘सुपरफूड्‌स’चं महत्त्व प्रसिद्ध आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनी ‘इंडियन सुपरफूड्‌स’ या पुस्तकात सांगितलं आहे. फिटनेसच्या जमान्यात वर्ज्य मानलं जाणारं तूप, नारळ, काजू, गावठी आणि फॅट कमी करण्यासाठी निरुपयोगी समजला जाणारा फणस, ऊस, केळी, तांदूळ आणि अगदीच कमी प्रतीचं मानले जाणारे अळीव, कोकम, आंबाडी यांविषयीचे गैरसमज दूर करत भारतीय आहारशैलीचं महत्त्व लेखिकेनं अधोरेखित केलं आहे.

डायबेसिटी (डायबेटिस आणि ओबेसिटी) आणि त्यापाठोपाठ येणारे फिटनेस, डाएट हे सध्या परवलीचे शब्द झाले आहेत. पाश्‍चात्यांचं अनुकरण, असंतुलित आहार, फास्ट फूड यांमुळं ‘डायबेसिटी’ लहान वयातच डोकं वर काढते आणि मग वजन कमी करण्यासाठी आपल्याकडं न पिकणारा, महागडा आणि अत्यंत बेचव पदार्थ ‘डाएट’ म्हणून सेवन केला जातो. अशा प्रकारे वजन कमी करणं शक्‍य आहे; पण कमी झालेलं वजन टिकवणं अवघड असते. मात्र, भारतीय ‘सुपरफूड्‌स’च्या मदतीनं हे सहज साध्य करता येतं.

खाण्यापिण्यासंबंधीचं ज्ञान मागच्या पिढीकडून पुढच्या पिढीला मिळतं; पण मध्येच कोणी तरी काही सल्ला देतो आणि ही साखळी तुटते. हृदयविकार, मधुमेह झाला की तूप, तांदूळ यांना दूर सारलं जातं; पण हेच पदार्थ हे आजार नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त ठरतात, याची आपल्याला माहिती नसते. तूप रक्तशर्करा आणि स्थूलतेवरही नियंत्रण आणते. म्हणूनच जुन्या पिढीतले लोक रोज एक चमचा तूप खाण्याचा सल्ला देत. तांदूळ तर जन्मापासून, मृत्यूपर्यंत लहानमोठ्या प्रसंगात आपल्या सोबत असतो. जन्माला आल्यानंतर आपण दुधानंतर सर्वप्रथम चव घेतो ती भाताचीच. आयुर्वेदात तांदूळ आरोग्य, धनसंपदा, जननक्षमता यांचं प्रतीक मानला जातो. तरीही मधुमेह होताच ताटातून भाताची उचलबांगडी होते.

तीच गोष्ट काजू आणि केळ्याची. केळ्यामध्ये त्वरित ऊर्जा मिळविण्यासाठी सर्व पोषक द्रव्यं असतात, तर केळफूल हे हार्मोनल प्रॉब्लेमवरचं उत्तर आहे. काजू कोलेस्टेरॉल, स्थूलता वाढवतो, असं सांगितलं जातं. प्रत्यक्षात शरीराच्या विविध जैविक कार्यामध्ये तो सहभाग घेतो. आपण कोलेस्टेरॉलसाठी ओट्‌स उत्तम मानतो आणि काजूला मात्र बदनाम करतो.

कोकम हे नैसर्गिक पित्तनाशक आहे. आमसूल, कोकमाचा रस, कोकम तेल यांचा वापर कशा पद्धतीनं करावा आणि त्याचे औषधी गुणधर्म या पुस्तकातून समजतात. आंबाडीची भाजी उदरशांतीसाठी उपयुक्त असते. ती फॉलिक ॲसिड, आयर्नचा स्रोत आहे. नारळाला तर भारतीय संस्कृतीत अतिशय महत्त्व आहे. कोणतीही चांगली गोष्ट सुरू करण्यापूर्वी नारळ फोडला जातो, कारण तो अविरत काम करण्याची ऊर्जा पुरवतो, मन शांत आणि स्थिर ठेवतो. हृदयविकार, मधुमेह, लठ्ठ असणाऱ्यांनी नारळ खाऊ नये, असं सांगितलं जातं; मात्र या तिन्ही गोष्टींत नारळ कसा उपकारक आहे, हे लेखिकेनं सांगितलं आहे.

आयुर्वेदात बाळंतिणीच्या आहारात अळीवाला महत्त्वाचं स्थान दिलं आहे. ते शक्तिवर्धक, सौंदर्यवर्धक असतं. जननक्षमता वाढविणाऱ्या फणसाला स्थूलता वाढविणारे फळ म्हणून बदनाम केले जाते आणि बेचव विदेशी फळे खाणं प्रतिष्ठेचं मानलं जातं. साखर हे तर चिरतारुण्याचं गुपित. प्राचीन काळापासून भारतात साखरेचा उपयोग औषध म्हणून केला जातो. तरीही साखरेविषयी अनेक गैरसमज सध्या आहेत. ते पसरण्याची कारणं, त्याचबरोबर ते कसे निराधार आहेत, हे लेखिकेनं शास्त्रशुद्धरीत्या पटवून दिलं आहे.

पुस्तकात वर्णन केलेले दहा भारतीय ‘सुपरफूडस्‌’ आरोग्यदायी असले तरी, ते कशा पद्धतीनं, किती, केव्हा, कशाबरोबर खावे, याचेही नियम आहेत. लेखिकेनं हे सांगत असतानाच प्रत्येक पदार्थाविषयीचे गैरसमज आणि वास्तव याविषयीचे तक्ते दिले आहेत. त्यातून आपल्या मनात त्या पदार्थाविषयी असलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळतात. हे ‘सुपरफूड्‌स’ स्थानिक आहेत. त्यांच्या झाडाच्या प्रत्येक भागाचा काही ना काही उपयोग आहे. ते पर्यावरणपूरक आहेत. आपलं आरोग्य चांगलं राखतात, शिवाय स्थानिक शेतकऱ्यांना पैसाही मिळवून देतात.

समृद्ध निसर्गानं एवढे चवदार आणि आरोग्यदायी पदार्थ दिलेले असताना, अनेक जण ‘डाएट’च्या नावाखाली परदेशी बेचव भाज्या, फळं, डबाबंद ज्यूस घेत असतात. बेचव म्हणजे आरोग्य, असं मानणाऱ्या आणि स्थानिक पदार्थांना ‘गावठी’ म्हणत नाक मुरडणाऱ्या लोकांनी हे पुस्तक जरूर वाचावं. या संपन्न खाद्यखजिन्यात त्यांना आरोग्याची गुरुकिल्ली नक्कीच गवसेल.

पुस्तकाचं नाव - इंडियन सुपरफूड्‌स
लेखिका - ऋजुता दिवेकर,
अनुवाद - प्रा. रेखा दिवेकर
प्रकाशक - अमेय इन्स्पायरिंग बुक्‍स,
पुणे (०२०-२५६७७५७१)
पृष्ठं - ११६/ मूल्य - १९९ रुपये

Web Title: book review in saptarang