संवाद...मनातल्या झाडांशी, झाडांच्या मनाशी

अनिल बोपर्डीकर
रविवार, 9 एप्रिल 2017

कांचन प्रकाश संगीत यांचं ‘अन्वयार्थ’नंतरचं ‘हरितायन’ हे दुसरं पुस्तक. मुखपृष्ठ आणि त्यातल्या विविध गडद हरित छटा आणि ‘हरितायन’ हे समर्पक नाव पुस्तकाचं वाचन करण्याअगोदरच लेखिकेच्या नैसर्गिक सृष्टिमनाची साक्ष पटवतं.

कांचन प्रकाश संगीत यांचं ‘अन्वयार्थ’नंतरचं ‘हरितायन’ हे दुसरं पुस्तक. मुखपृष्ठ आणि त्यातल्या विविध गडद हरित छटा आणि ‘हरितायन’ हे समर्पक नाव पुस्तकाचं वाचन करण्याअगोदरच लेखिकेच्या नैसर्गिक सृष्टिमनाची साक्ष पटवतं.

संत तुकारामांसारख्या प्रापंचिक संन्यस्त वृत्तीच्या माणसानं ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे’ म्हणणं हे त्यांच्या वैश्‍विक अभ्यासाचं उत्तर आहे. तीच प्रवृत्ती लेखिकेच्या विविध वृक्षांच्या आवडीतून प्रगट होते. त्यांचं अनुभवविश्‍व हे स्वप्नाळू नाही, तर सत्यतेचा भाग आहे. त्यांची सूक्ष्म निरीक्षणशक्ती ‘येते बरं’ या ललितकथेपासून ‘चंदन प्रपंच’ या कथेपर्यंत विस्तारीत जाते. शब्दांची पेरणी वाचकास कथाभाग संपेपर्यंत खिळवून ठेवते. शहरी भाषा आणि ग्रामीण भाषा, त्यातला शब्दयोजनेचा मेळ लेखिकेस जुळवता आला, हे आणखी एक वैशिष्ट्य नजरेआड करता येणार नाही.

घर किंवा कोणतंही स्वप्न प्रत्यक्षात उतरवताना कष्ट ओतणं हा स्वप्नपूर्तीचा अविभाज्य भाग असतो; पण ती निर्मिती होत असताना येणारे अडथळे खरंच क्‍लेशकारक ठरतात. औरंगाबाद शहरात घर बांधताना नकळत औदुंबर वृक्षाला मुळासकट तोडावं लागलं हा अपराध; पण हा संन्यस्त वृत्तीचा वृक्षही मानवी विकाराप्रमाणं अपशकुन घडवून आणू शकतो का, असं एक बीज घेऊन लेखिकेनं ‘येते बरं’ ही कथा फुलवली आहे. औदुंबर, उंबर या झाडांशी संबंधित आठवणी, त्यातून मनात उभे राहिलेले संदर्भ, श्रद्धा-अंधश्रद्धांबाबतचे विचार, मनात उभी राहिलेली- सुटलेली कोडी अशा एकेक गोष्टी मांडत लेखिका एक वेगळंच तत्त्वज्ञान मांडू पाडते.
शेवग्याचं झाड लेखिकेच्या मनाचा हिस्सा होतं. त्या झाडावर पडलेले दवबिंदू, पावसाचे थेंब यांचं सौंदर्य लेखिका उलगडून दाखवते. ती त्याला ‘हिऱ्यांचं झाड’च म्हणते. शेवगा; तसंच इतर झाडांच्या कुपोषणाच्या समस्येवरचं भाष्य लेखिकेची मानसिकता अधोरेखित करतं. दु-ख सहन न होणं हा स्त्रीसुलभ स्वभाव आहे; पण त्याहीपेक्षा झाडांशी संवाद साधणं हा विलक्षण स्वभाव झाडांच्या भावविश्‍वाशी जुळणारा आहे. शेवग्याच्या निमित्तानं लेखिका सौंदर्यवृत्तीवर भाष्य करू पाहते.

पळसपान आणि त्याच्या पत्रावळी हा लेखिकेचा आवडता विषय. बालपणी लेखिकेच्या मनाचा कप्पा पळसानं व्यापून टाकला होता. पळस त्यांच्या आठवणींना गारवा देणारा ठरतो. मामाचं घर-आजोळ, तिथली वृक्षांची समृद्धी लेखिकेच्या लेखणीला स्फुरण देणारी ठरली. वृक्षशांती अनुभवण्यास पूर्वसंचिताची किमया लागते. ती त्यांना ईश्‍वरी प्रसादानं लाभली आणि त्यांचं वृक्षप्रेम रक्तातून अविरत वाहताना दिसतं. पळसाला प्राप्त झालेली नैसर्गिक देणगी म्हणजे लवचिकता. त्या म्हणतात- ‘ओल्या बांबूची चोय तोडताना पिरगळावी लागते आणि तरीही ती सहजी तुटत नाही. पत्रावळ कशी पाहिजे? सार-भात जेवला, तरी पत्रावळीखालची जमीन कोरडीच राहिली पाहिजे.’ भावनांच्या हिंदोळ्यांमुळं गलबलून न जाता जीवनाच्या अग्निदिव्यातून सहिसलामत सुटण्याचं कसब लेखिका या कथेतून अधोरेखित करते.

आपल्याच ऐश्‍वर्याच्या तोऱ्यात मिरवणाऱ्या बाईची फजिती जांभळाच्या फळांनी कशी केली याचं समर्पक उदाहरण ‘जांभळाई’ या कथेतून मिळतं. माणूस आपली योग्यता विसरून जातो, तेव्हा त्यातली हीन प्रवृत्ती कशी वरचढ होते, हे या कथेतून कळतं. ‘वानकची गोष्ट’ डोळ्यांच्या कडा पाणावून सोडते. ‘वानक’ या शब्दांची फोडच समर्पक आहे. ‘वाकून नमस्कार करणारा पिंपळ म्हणजे वानक’ असं लेखिका सांगते आणि ‘नम्रता’ हा स्थायीभाव वृक्षाकडूनच दत्तक घेतला पाहिजे, हेही सांगू पाहते. पिंपळाच्या पानाचा स्पर्श लेखिकेची चित्तवृत्ती प्रसन्न करतो. कार्यालयातला पिंपळवृक्षांशी संबंधित संवाद लेखिकेच्या समृद्ध मनाचा आविष्कार आहे. झाडांचं अस्तित्व आणि त्याचे छिन्न-विछिन्न रूप पाहताना होणाऱ्या संवेदना आपल्याच आहेत असे वाटणं इतकी सविकल्प समाधीची जाणीव या कथेतून होते. वानकात बांधलेलं कावळ्याचं घरटं, त्याचं निरीक्षण, जोरदार वाऱ्यामुळं आणि पावसामुळं झालेली वाताहत असं सगळं मांडणारी सूक्ष्मता क्वचितच वाचायला मिळते. कावळा-कावळीच्या संवादाची लेखिकेनं केलेली कल्पना गंमतिशीर आहे.

‘तुकुमराई’ या मुक्त ललितकथेत तुळशीचं महत्त्व, वातावरणशुद्धीत तिचा मोलाचा वाटा; तसंच पूरक नामाची विविधता रेखाटली आहे. तुळशीच्या मंजिऱ्यात असणारं लहान ‘बी’ म्हणून ‘तुकमराई.’ गावोगावी रानोमाळी बाभळीची झाडे असतात; पण ती दुर्लक्षित. ‘बोरी बाभळी उगाचंच जगती’ असं म्हटलं जातं; परंतु त्याचंही महत्त्व लेखिकेनं विस्तारानं मांडलेलं आहे. बाभळीच्या काट्यालाही सौंदर्याचे कोंदण देण्यात लेखिकेचे शब्द सहजतेनं फुलतात. बकुळीची फुलं लेखिकेच्या जीवनाचा अविभाज्य भाग. त्यातून एक वेगळीच प्रेमभावना त्या मांडतात. ‘चंदन प्रपंच’ कथेत शाळेतल्या आठवणीच्या लांबच लांब खुणा आहेत.

झाडांचं अस्तित्व, त्यांचं मोहरणं, फुलणं म्हणजे त्यांच्या प्रतिभाशक्तीचा विकास हे समीकरण प्रत्येक कथाभागातून दृढ होत जातं. ‘चंदन प्रपंच’, ‘आंबट नव्हेच ती’, ‘शकरीच्या बागेत’, ‘आठवणींचा पदर’ अशा काही कथांमध्ये अधिकच विस्तारीत झाल्यासारखा जाणवतो. थोडक्‍यात सांगायचं तर ‘हरितायन’ म्हणजे वाचकांना मिळालेली ‘साहित्यसरितेची मेजवानी’च. शब्दांच्या अर्थांत, सौंदर्यात डुंबण्याचा हा विलक्षण आनंद घ्यायलाच हवा.

पुस्तकाचं नाव - हरितायन
लेखिका - कांचन प्रकाश संगीत
प्रकाशक - प्राजक्त प्रकाशन, पुणे     
    (९८९०९५६६९५)
पृष्ठं - २२४/ मूल्य - २४० रुपये.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: book review in saptarang