esakal | भव्य आणि उत्कंठावर्धक रहस्यशोध
sakal

बोलून बातमी शोधा

भव्य आणि उत्कंठावर्धक रहस्यशोध

भव्य आणि उत्कंठावर्धक रहस्यशोध

sakal_logo
By
भूषण गोखले, एअर मार्शल (निवृत्त)

वसंत वसंत लिमये हे नाव जितकं वेगळं, तितकंच त्यांचं व्यक्तिमत्त्वही असाधारण. अभिनय, लेखन, पर्यटन, गिर्यारोहण, छायाचित्रण, व्यवस्थापन प्रशिक्षण असे विविध छंद जोपासणाऱ्या लिमये यांची ही दुसरी कादंबरी. त्यामुळं ती दर्जेदार असणारच याची खात्री होतीच. आधीची कादंबरी ‘लॉक ग्रिफिन’ हीदेखील ऐतिहासिक घटनांवर आधारित कादंबरी होती. मात्र, ‘विश्वस्त’ ही त्याही पुढं जाणारी अतिशय उत्कंठावर्धक आणि ऐतिहासिक रहस्यमय अशी कादंबरी.

‘विश्वस्त’ या कादंबरीसाठी लिमये यांनी साडेचार वर्षांहून अधिक काळ संशोधन केलं आहे. इंग्रजी साहित्यात आढळणारी ही बाब मराठी साहित्यासाठी अपवादात्मक म्हणावी लागेल. या कादंबरीची कथा जिथं घडते, तिथं स्वत- जाऊन चिंतन-मनन केल्यानं ही कादंबरी अधिक जिवंत आणि प्रवाही वाटते. कादंबरीचा पट मोठा असला, तरी ही कादंबरी प्रत्यक्षात ३० मार्च २०१३ ते ५ मार्च २०१४ या एका वर्षभराच्या काळातच उलगडते. या कादंबरीत लेखकानं प्राचीन काळ, पुरातत्वीय संदर्भांबरोबर समकालीन संदर्भांचाही खुबीनं वापर करत रंजकता आणखी वाढवली आहे. पौराणिक, ऐतिहासिक आणि वर्तमानातले दुवे यांचा परिणामकारक समन्वय साधणारी अलीकडच्या काळातली ही महत्त्वाची साहित्यकृती आहे, असं म्हटल्यास वावगं ठरू नये. सभोवतीच्या माणसांमधून पात्रं उभी करण्याचं लेखकाचं कसब वाखाणण्यासारखं आहे.

लेखकानं संस्कृत, मराठी, गरजेनुसार इंग्रजी आणि सध्याच्या तरुणाईच्या कट्ट्यावरच्या भाषेचाही वापर केला आहे. त्यावरून लेखकाचं भाषांवरचं प्रभुत्वही लक्षात येतं. त्यामुळं सर्वांनाच ही कादंबरी भावेल. पुण्यातल्या कॅफेत सातत्यानं भेटणाऱ्या पात्रांमुळं पुणेकरांना ही कादंबरी आपलीशी वाटेल. द्वारका, सोमनाथ, दिल्लीचे संदर्भ तिला देशपातळीवर पोचवतात आणि स्कॉटलंडमधल्या संदर्भांमुळे या कादंबरीला ’ग्लोबल टच’ही मिळतो. वसंत वसंत लिमये यांनी त्यांच्या स्वभावानुसार खोलात जाऊन तपशीलवार पद्धतीनं प्रत्येक पात्राची, संदर्भाची मांडणी केल्यानं पृष्ठसंख्या काहीशी वाढली आहे. मात्र, ती कुठंही खटकत नाही. लेखकाचा भारतीय संस्कृती, पौराणिक कथा, समृद्ध इतिहास यावरचा गाढा विश्वास आणि अभ्यासही आपल्याला सातत्यानं जाणवत राहतो. त्यांची नाटकाची, अभिनयाची आवड त्यांच्या लिखाणातूनही अधूनमधून डोकावत राहते. म्हणूनच या कादंबरीवर एखादा भव्य चित्रपटही होऊ शकतो, या मताशी मीही सहमत आहे. या कादंबरीत पूरक चित्रं, ऐतिहासिक संदर्भ, श्‍लोकांचा खुबीनं वापर करण्यात आला आहे. त्यामुळं या कादंबरीच्या सौंदर्यात भरच पडली आहे. लिमये यांना गिर्यारोहणाची आवड आहे, गड-किल्ल्यांवर त्यांचं विशेष प्रेम आहे. म्हणूनच या कादंबरीतून मनोरंजन करतानाच ते गड-किल्ल्यांची दुरवस्थाही समोर आणतात आणि त्यांचं संवर्धन करण्याचा संदेशही पोचवतात.

पश्‍चिम किनाऱ्यावर खंबातच्या खाडीमध्ये कल्पसर हा भव्य प्रकल्प नियोजित आहे. ऐतिहासिक काळात द्वारकेची संपत्ती असलेली जहाजं याच परिसरात बुडालेली नाहीत ना, याचा शोध लेखकानं आपल्या या कादंबरीतून वाङ्‌मयीन अंगानं घेण्याचा प्रयत्न केला आहे.

‘हे विश्वस्त दैवययेगात्‌ तव रिक्‍थो भवाम्हयम्‌!’
‘हे विश्वस्ता, केवळ दैवामुळं, योगायोगानं हा वारसा आम्हाला मिळाला आहे. त्याचे विश्वस्त होण्याची जबाबदारी आमच्यावर आहे,’ असं म्हणत लिमये यांनी भारताच्या समृद्ध इतिहासाचे, संस्कृतीचं संचित वेगळ्या माध्यमातून सर्वांसमोर आणलं आहे. युवा पिढीला आपल्या समृद्ध इतिहास, संस्कृतीचा शोध घेण्यास उद्युक्त करण्यासाठी ते फायद्याचं ठरेल.

‘राजहंस’नं ही कादंबरी प्रकाशित केली आहे. नव्या पिढीला आवडेल, रुचेल अशा पद्धतीनं ‘विश्वस्त’ कादंबरीनं मराठीत पहिल्यांदाच ‘बुक ट्रेलर’ ही संकल्पना आणली आणि यशस्वीही केली. लिमये यांच्या ब्लॉगवरही कादंबरीबाबतचे ‘अपडेट्‌स’ सातत्यानं सापडत होते. या कादंबरीचं प्रकाशनही अगदी आगळ्यावेगळ्या पद्धतीनं झालं. त्यामुळं ही कादंबरी सातत्यानं चर्चेत राहिली आहे. एकदा वाचल्यानंतरही मध्येच पुन्हा वाचावी, अशी इच्छा होणारी ही कादंबरी प्रत्येक रसिक वाचकाच्या संग्रही असलीच पाहिजे.

पुस्तकाचं नाव - विश्वस्त
लेखक - वसंत वसंत लिमये
प्रकाशक - राजहंस प्रकाशन, पुणे (०२०-२४४७३४५९)
पृष्ठसंख्या - ५२६/ मूल्य - ५०० रुपये

loading image