

Brazil Presidential Election
esakal
श्रीराम पवार - shriram1.pawar@gmail.com
एखाद्या देशाची निवडणूक झाल्यानंतर तिथल्या लोकांनी कोणालाही कौल दिला तर जगातील बाकी सारे देश ज्याला कौल मिळाला त्यांचे औपचारिक अभिनंदन करतात किंवा अगदीच आपल्या हिशेबात न बसणारा नेता पक्ष सत्तेत आला तर प्रतिक्रियाच टाळतात. ब्राझीलच्या अध्यक्षीय निवडणुकीत लुईझ इनाशाओ लुला डी सिल्व्हा यांनी पुन्हा बाजी मारल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मात्र या राजनयाच्या संकेताला तिलांजली देत ब्राझीलमधील निवडणुकीत घोटाळ्याचे आरोप केले. मी निवडणुकीत कोणाची बाजू घेत नाही, पण ब्राझीलचा निकाल भयानक आहे. आणखी एका निवडणुकीत हेराफेरी झाली, ही त्यांची प्रतिक्रिया होती. त्यातून त्यांचा लुला यांच्यावरचा संताप उघड दिसतो. ट्रम्प यांना असा संताप का यावा. एकतर लुला याच्या विरोधातील फ्लाविओ बोल्सनारो हे ट्रम्प यांचे मित्र. म्हणजे त्यांचे वडील माजी अध्यक्ष याईर बोल्सनारो हे ट्रम्प समर्थक आणि ब्राझील मधील उजव्या मंडळीचे म्होरके वंशवादी, पुरुषसत्ताकवादी आणि पर्यावरणाविषयी अत्यंत बेदरकार असलेल्या त्या नेत्यांचा लुला यांनी मागच्या निवडणुकीत पराभव केला होता. या वेळी त्यांच्या मुलाचे आव्हान लुला यांच्यासमोर होते. लुला हे ट्रम्प यांच्या समीकरणात बसणारे नेते नाहीत. विजयानंतर लगेचच लुला यांनी ब्राझील कोणाचे हक्काचे परडे नाही, अशी प्रतिक्रिया दिली. रोख स्पष्टपणे ट्रम्प यांच्याकडे होता. लुला यांच्या विचारांचे आहेत जाहीरपणे ते ट्रम्पविरोधी गोटातील आहेत. चौथ्यांदा लुला विजयी झाल्याने ट्रम्प वादाच्या गडद छायेखाली दिवस कंठणाऱ्या दक्षिण अमेरिकेत लुला दा सिल्व्हा यांनी ब्राझीलची अध्यक्षीय निवडणूक जिंकून आशेचा किरण जागवला आहे. याच वेळेस सर्बियाच्या निवडणुकीत आणखी एक उजवे नेते आलेक्झांडर वुविच यांना पराभवचा धक्का बसला. सर्बियातील विजय निःसंशयपणे तेथील जेन-झी म्हणवल्या जाणाऱ्या आंदोलनात उतरलेल्या तरुणाईचा, तर ८० वर्षांच्या लुला यांच्यामागेही ब्राझीलमधील तरुण मोठ्या संख्येने उभा राहिले. हा दोन्हीकडचा आणखी एक समान धागा.