ढिंग टांग : असली नकली! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

British Nandi write about thackeray family

ढिंग टांग : असली नकली!

स्थळ : मातोश्री हाइट्स, वांद्रे सोसायटी.

वेळ : निजानीज टाइम.

चि. विक्रमादित्य : (दार ढकलून आत येत) हाय देअर बॅब्स…मे आय कम इन?

उधोजीसाहेब : (निक्षून सांगत) नोप! गुड नाइट!

विक्रमादित्य : (तरीही खोलीत शिरत) आयम गोइंग टु अयोध्या, बॅब्स!

उधोजीसाहेब : (हबकून) कशाला उगाच इतक्या लांब? केवढा तो प्रवास, छे…मागल्या वेळेला मी गेलो होतो, तेव्हा केवढा थकलो होतो! शिवाय तिथं कुठं जवळपास फोटोबिटो काढायला जंगल, वन्यप्राणी असंही काही नाही!

विक्रमादित्य : (हट्टानं) मी जाणार म्हंजे जाणार!

उधोजीसाहेब : (समजूत घालत) …कित्ती फिरतोस? आत्ताच दिल्लीला जाऊन आलास ना? मध्यंतरी तो मेट्रोरेल्वेचा बोगदा वगैरे बघून आलास! कालपरवा वरळीलाही दौरा करुन आलास! पायाला भिंगरी आहे तुझ्या! आपल्या घराण्यात बाहेर हिंडायची प्रथा नाही, आपण भेटायला जायचं नसतं, लोक येतात! अशानं दमशील!!

विक्रमादित्य : (पोक्तपणाने) ते पर्यावरणाचं काम होतं..!

उधोजीसाहेब : (खांदे उडवत) असेल! मला फक्त वरणाचे दोन प्रकार माहीत आहेत! आंबट वरण आणि साधं वरण! पर्यावरण माहीत नाही बुवा आपल्याला!

विक्रमादित्य : (उत्साही आवाजात) कमॉन बॅब्स! बी अ स्पोर्ट!! मी अयोध्येला जावं, अशी आपल्या कार्यकर्त्यांची खूप इच्छा आहे! यूपीत होर्डिंगं लागलेत मी येणार म्हणून! - ‘असली आ रहा है, नकली से सावधान’!

उधोजीसाहेब : (खवचटपणाने) हाहा!! हल्ली नकलींचं पेव फुटलंय ना! सगळा डुप्लिकेट माल मार्केटमध्ये आलाय!! पण यूपीतल्या लोकांना बरोब्बर कळतं, कोण असली आणि कोण नकली ते!!

विक्रमादित्य : (निरागसपणाने) मग मी असली की नकली?

उधोजीसाहेब : (टप्पल मारत) अरे वेड्या, तू शतप्रतिशत असली आहेस! तुझे ते शिवाजी पार्कवाले काका आहेत ना, तेसुध्दा अयोध्येला निघाले आहेत! पण ते नकली आहेत, समजलं? त्यांना उद्देशून तर ती होर्डिंगं लागलीयेत, यूपीत!

विक्रमादित्य : (खबर दिल्यागत) त्यांनी बॅगा भरायला घेतल्या आहेत, म्हणे!

उधोजीसाहेब : (संशयानं) तुला कसं कळलं?

विक्रमादित्य : (सहज सांगितल्यागत) मीच त्यांना फोन केला होता! त्यांना म्हटलं की तुम्ही अयोध्येला चालला आहात, तर आमच्याकडे आरतीचं मोठं तबक आहे,ते घेऊन जा!! तर ते म्हणाले की, ‘‘ तू काही असली आहेस असं म्हणता येणार नाही! तुझ्यापेक्षा मी बराच असली आहे, त्यापेक्षा तू माझ्यासोबत येतोस का? चल, तुझंही तिकिट काढतो…’’

उधोजीसाहेब : अजिब्बात जायचं नाही त्यांच्यासोबत! हवं तर एकटा जा! आपल्याला काही प्रॉब्लेम नाही तिथं, कारण आपल्याइतकं असली किंवा ओरिजिनल कोणीही नाही!

विक्रमादित्य : (कुतुहलानं) जस्ट औट ऑफ क्युरिऑसिटी, विचारतोय…मीच खरा असली आहे, असं शिवाजी पार्कवाले काका म्हणाले, तर त्यांना कुठला प्रूफ द्यायचा?

उधोजीसाहेब : (संताप आवरत) प्रूफबिफ काही नाही! आपण फक्त असली आहोत, बाकी सगळे नकली आहेत एवढं लक्षात ठेव!! या नकली लोकांना प्रभु श्रीराम उभंदेखील करणार नाही,लिहून ठेव!

विक्रमादित्य : (विचारात पडत) काका जाऊन आले की आठवडाभरात मीसुध्दा तिथं जाईन, म्हणतो! पण…(एक पॉज घेत) आपण इतके ओरिजिनल आणि असली आहोत, तर बॅब्स, तुम्ही का हो जात नाही हल्ली अयोध्येला?

Web Title: British Nandi Write About Thackeray Family

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top