ढिंग टांग : मुन्नाभाई आणि मामू!

British Nandi writes about session of uddhav thackeray on raj thackeray
British Nandi writes about session of uddhav thackeray on raj thackeraysakal

दादू : (खुशीखुशीत फोन फिरवत) हाँऽऽव...गुर्रर्र...हाँऽऽऽव...घर्रर्र!!

सदू : (खवचटपणाने) कोण म्यांव म्यांव करतंय? छूत, छूत!!

दादू : (भडकून) सद्याऽऽ...तोंड सांभाळून बोल!

सदू : (साळसूदपणे) मामू, तू होय! मला वाटलं, खोलीत मांजर शिरलं!! सॉरी हं!

दादू : (विजयी सुरात) मामू काय मामू? अरे, मी दादू बोलतोय! काय, कशी वाटली आमची मास्टर सभा!!

सदू : (दांभिकपणाने) वेल डन, मास्टर...आपलं ते हे...मिस्टर मामू!! हल्ली बरं भाषण द्यायला लागला आहेस! सुधारणा आहे तुझ्यात!!

दादू : (दर्पोक्तीने) बघ, पुन्हा चुकून मामू म्हणालास, जाऊ दे! आपला खाक्याच असा आहे- एक घाव पन्नास तुकडे!! तुमच्या उत्तर सभा, तित्तर सभा, बूस्टर सभा, क्लस्टर सभा...यांना एकाच मास्टर सभेतून हाणलं मी!!

सदू : (थंड सुरात) गर्दी चांगली जमवलीस!!

दादू : (खवळून) खामोश! गर्दी कोणाला म्हणता? मर्द मावळ्यांचा सागर होता तो!! सव्वा लाख खुर्च्या होत्या, सव्वा लाख! तरीही लोक उभे होते! माझ्या मते पाच-सात लाख तरी असतील!! शिवाय टीव्हीवर बघणारे बाराएक कोटी असतील!!

सदू : (कुत्सितपणे) खीक!

दादू : (संतापून) सद्या...कळतात तुझे हे टोमणे आणि कुत्सित हसणं!

सदू : (वाद घालत) मी आणि टोमणे? ह्या!! आम्हाला नाही झेपत असलं काही! टोमणेबिमणे हे काम तुमचं, मामूजी!!

दादू : (सात्त्विक संतापानं) मामू म्हणू नकोस!! तुम्ही ज्याला टोमणे म्हणता, ती आमची शैली आहे! बाकी तुम्हाला काय कळणार म्हणा, शैली वगैरे! सदोदित कसले ना कसले भोंगे वाजवण्यात दंग असता तुम्ही!! आम्ही एक तर कुणाच्या वाटेला जात नाही, आणि कुणी भोंगे वाजवायला लागलाच तर...तर...(शब्द न सुचून) काय बरं ते?...

सदू : (वाक्य पूर्ण करत) शिंगावर घेणारा मावळा?

दादू : (उत्स्फूर्तपणे) करेक्ट!

सदू : (थंड खर्जात) पण भोंगे आणि शिंगे...नीट टोमणा जमत नाहीए!!

दादू (विषय बदलत) ते जाऊ दे! माझं भाषण कसं वाटलं ते सांग ना!

सदू : (सुस्कारा सोडत) ढाल, तलवार, गदा, गधाधारी, कोथळा, गाडून टाकू, शिंगावर घेऊ, अंगावर याल तर याद राखा, औरंग्या, अवलाद, पिलावळ, भगवा, झेंडा, गाढवं, सडके मेंदू, विकृत टाळकी, संस्कार, महाराष्ट्राचे शत्रू, मर्द मावळे, उघडपणे, खोटं बोलणं, मुंबईचे लचके, तुकडे तुकडे...एवढंच लक्षात राहिलं!

दादू : (दुर्लक्ष करत) त्या फडणवीसांची मी चांगली जिरवली पण! हो की नाही? तुमचे भोंगेबिंगे, बूस्टरबिस्टर...सगळ्याला एकच जमालगोटा दिला! एकाच बंदुकीच्या फैरीत सगळेच्या सगळे गारद! हाहा!!

सदू : (मुद्द्यावर येत) मला का उगाचच टोमणे मारलेस? एवढी मोठी सभा घेतलीस, पण शेवटी टोमणेबाजीच केलीस!

दादू : (शहाजोगपणे) सदूराया, तुला कसे रे मी टोमणे मारीन? कसा का असेनास, पण माझा भाऊ आहेस!

सदू : (नापसंती दर्शवत) मला मुन्नाभाई म्हणालास! शोभलं का हे तुला? बघून घेईन!

दादू : (‘कात्रज’ करत) मी कुठं म्हणालो? मी एवढंच म्हटलं की, एक मुन्नाभाई शाल पांघरुन सध्या गांधीगिरी करत हिंडतोय! तुला का येवढं लागलं?

सदू : (घुश्शात सॉलिड टोमणा मारत) मी मुन्नाभाई आणि मग तू कोण? - मामू?

जय महाराष्ट्र!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com