झगमग वाढते हे खरंय, पण तगमग त्यापेक्षा अधिक आहे. ‘पूर्वी असं नव्हतं’ हे माझं म्हणणं म्हणजे शैली नव्हे! तेच सत्य आहे. निकामी नाही; पण रिकामी होत गेलेली गावं घरोघरी लागलेले ‘टाळे’ कसे टाळायचे? हा यक्षप्रश्न आहे. आमचे बाबू, बंटी, पप्या आणि चंदू शहरात तरी खऱ्या अर्थाने बहरतात का? छे हो! ‘बर्नआउट बॉइज’ हा शब्दप्रयोग मी स्वतः माझ्या लेखनात करत आलो.
सगळी होरपळ आहे. नातलगांकडे राहायचं, पंधरा- वीस हजारांचं मासिक उत्पन्न जेमतेम मिळवायचं किंवा स्पर्धा परीक्षांच्या जाळ्यात तडफडायचं, नोकरी गावली, तरी ‘मुंबै’त स्वतःचं घर नसल्यामुळे लग्नकार्याचा पत्ताच नाही, असं बेकार जगणं त्यांनीच ओढवून घेतलेलं. मग वैफल्यातून ‘ड्रिंक्स’ तर ओघाने येणारच!
एक ‘बाप्या’ तर मला म्हणाला, ‘...बॉस रजाच देत नाही. नोकरी टिकवणं महत्त्वाचं आहे...’ बिनचेहऱ्याच्या बिगर मराठी गर्दीत कोकणी तरुणाई घुसमटली, तरी तसं थेट दाखवत नाही. तुम्ही म्हणाल, पूर्वीही कोकणी मुलं सिटीकडे पाठवण्याचा प्रवाह होताच की! मंडळी, तेव्हा चंगळवाद इतका खवळलेला नव्हता. एकाकीपण इतकं अंगावर आलेलं नव्हतं.
‘ओव्हरस्मार्ट फोन’चं व्यसन लागलेलं नव्हतं. ‘आकाशवाणी’ची निवेदिका तिच्या आवाजासारखीच दिसायला गोड असेल का?’ असं सौम्य, कुणाचाही घात न करणारं स्वप्नरंजन होतं. आता रेडिओ हेसुद्धा ‘स्मरणरंजन’ ठरतंय! माणसं माणसांना धरून होती. गावात आणि शहरातसुद्धा. नातीगोती वरवरची, उथळ, आभासी आणि फक्त स्वार्थाचा आमरस प्राशन करणारी नव्हती.
लैंगिक उनाडक्या कोकणात तर फारच कमी होत्या. कारण गावात एक ‘ओळख’ असायची. अभद्र काही वागणारं माणूस वाळीत पडायचं. आजही एखाद्यावर छोट्या गावात बहिष्कार पडू शकतो, पण कारणं मामुली असतात. ज्या गोष्टींना विरोध व्हायला हवा त्या मात्र सर्वच मोकाट आहेत. जीवन मुक्त न होता थेट मोकाटच झालं. कोकणात राहून शेतीभाती करणाऱ्याला आपल्या जिंदगीची माती होईल अशी भावना येते. त्यामुळे लोक शहराकडे वळतात.
बौद्धिक दुष्काळ आणि अंधविश्वासांची चलतीसुद्धा चिंताजनकच की! दापोलीलगत कोकणातल्या जुन्या, घरगुती वस्तू जपून ठेवणारं, पर्यटकांना दाखवणारं एक छोटेखानी वस्तूसंग्रहालय एका कार्यकर्त्याने हौशीने सुरू केलं. तिथे चक्रीवादळ येऊन थडकलं आणि जात्याप्रमाणे घरघरणाऱ्या आभाळाने वावटळ पाठवली. त्या वस्तूसंग्रहालयाची हानी झाली.
आमची ‘आऊट ऑफ प्रिंट’ असलेली पुस्तकंसुद्धा तिथं पाहुण्यांना बघण्यासाठी ठेवलेली असायची. मुळात जुन्यापान्या, पूर्वी वापरात असलेल्या वस्तू ‘दाखवण्या’साठी ठेवाव्या लागल्या हे सूचक आहे. करकरणारे, पण कुटुंबवत्सल झोपाळे, चुलीवरचा चवदार स्वयंपाक, ऐसपैस घरं, पडवी, माजघर, मानपान सांभाळणारी भाबडी माणसं, त्यांनी मुद्दाम राखलेली झाडं, घरची फळं, देवासाठी फुलं पुरवणारे वृक्ष, त्यांच्या आसऱ्याने राहणारी नानाविध पाखरं, घरट्यातली त्यांची लेकरं असा एक गोतावळा गायगुरांसह होताच. कुत्रा नि मांजर तर गृहीतच असायचं. माझ्या परिचयाच्या एका समाजसेविकेच्या घरी तर पाळीव मुंगूस लुडबुडत असायचं. ते परिवार काळाच्या पडद्याआड गेले.
‘श्यामची आई’ची टीम डॉ. मंडलिकांच्या ऐसपैस घरी उतरली होती. तेव्हा त्यांच्या दृष्टीने तो एक घरगुती सणच होता. तिथं राहून कलावंत मंडळी चित्रणासाठी जायची. आचार्य अत्रे ह्यांच्या गडगडाटी गप्पांचा कानोसा गडीमाणसंही घ्यायची. खास माणूस आहे हे त्यांनाही जाणवायचं. मुख्य म्हणजे तेव्हाच्या बंगलेवाल्यांना केवळ सांस्कृतिक समज नव्हती, निव्वळ आदरातिथ्य नव्हतं, तर उपजत समाजभान अधिक होतं. आताही बंगले आहेत.
मुद्दाम ठरवून बांधले जातात. छान दिसतात त्यांना सामाजिक जाणीव अजिबात नाही असंही नव्हे! मात्र तिथल्या महिलाही बँकेत, मीडियात किंवा शाळेत जॉब करू लागल्या. वेळ कुठून आणणार? शिवाय ज्यांच्यासाठी समाजकार्य करायचे त्यांनाच त्यांची जाणीव नसते असा माझाही अनुभव आहे!
मामाचं गाव आपण म्हणतो, पण ते आजीचं अधिक असायचं. आजीबाय निराधार झालेली नव्हती. वृद्धाश्रमांची चाहूल लागलेली नव्हती. आज असे आश्रम हीसुद्धा काळाची गरज बनलीय. मुंबईहून येणारी नातवंडं त्या काळात मराठीतच बोलत आणि अन्या, सुन्या एस.टी.त बसून येत.
झोपाळ्यावर हलका झोका घेत निवांत बसलेली आजीबाई त्यांची वाट पाहत असायची. तेव्हा टपालाने पत्र यायची व पोस्टमन हमखास चालत किंवा सायकलवरून यायचा. आता इंधनवाहन त्याच्याकडेही आहे, पण खुशालीची पत्रं कागदावर कोण कुणाला लिहितंय?
वयात येताच पॉर्न व्हिडिओजकडे वळणारी कोवळी पिढी आभासी लाटांवर डुचमळते आहे. वर्तमान असं चिंताजनक आणि भविष्य त्याहून भेसूर असलेलं कोकण सकाळी आठ वाजता घाम फुटतो इतकं उष्ण बनतंय. यंदाच्या वसंत ऋतूत मला एकदाही ‘कुकूकॉल’ ऐकू आला नाही.
बर्डवॉचर म्हणून साधारणपणे १९९० च्या दशकात मी डिसेंबरमध्येसुद्धा खरोखर कोकीळसाद ऐकलेली आहे. एकदा नव्हे अनेकदा! कारण तेव्हा उंच उंच वृक्ष सुखरूप होते. रुंद खोडाची झाडं धनेश पक्ष्यांना आसरा देत होती. एकाच वेळी पाच-सहा ‘धनचिडया’ म्हणजे हॉर्नबिल पक्षी मी स्वतः माझ्या परिसरात किचाट करून माझी वामकुक्षी मोडताना अनुभवायचो.
घोरपड असेल, कांडर (मण्यार) असेल, ‘लाजरी’ म्हणजे पावसाळ्यात धीट बनणारी प्रणयोत्सुक पाणकोंबडी असेल, काळी इंगळी असले, खोडसाळ वानर असतील झाडाच्या पाठीवर घसरगुंडी खेळणाऱ्या चान्या म्हणजे खारी असतील. त्यांची ये-जा आणि मौजमस्ती आमच्या आवारात आम्ही बघायचो.
‘सदनिका संस्कृती’ची व अलिप्त आत्मप्रेमी आयुष्याची ती सुरवात होती. होय, आम्ही स्वयंकेंद्रित होत गेलो. मी राहतो ती ‘अवंतिका’ सोसायटी. ही सोसायटी कल्चरची दापोलीतली सुरवात मानली जाते.
सायकलवरून जुन्या काळात फिरणारे शिक्षक- प्राध्यापक कार चालवताना हळुहळू दिसू लागले. त्यांनीही शानदार सदनिका विकत घेतल्या. विद्यार्थ्यांच्या अवांतर वाचनाला आणि सुसंस्कृत वर्तनाला मात्र बहर आल्याचं कुठेही दिसत नाही. पूर्वी निदान मास्तरांचा धाक असायचा.
उशिरा आला म्हणून अध्यापकाने स्वतःच्याच मुलाला शाळेत कडक शिक्षा दिल्याची उदाहरणं होती. आता शिक्षक नावाच्या ‘सरकारी नोकराला’ शासनाच्या बदलत्या धोरणांचा आणि पालकांचा धाक आहे!
मोडी लिपीसारखं जुनं जग मोडीत निघालं. वस्तू सोडा, पण माझ्यासारख्या पर्यावरणाचा पुरोगामी मूल्यव्यवस्थेचा अंधश्रद्धा निर्मूलनाचा विचार करणाऱ्या माणसांनाही सहजपणे ‘येड्यात’ काढणारी व्यवस्था खेड्यात आली.
असं सगळं असलं, तरी वाचनसंस्कृती पूर्वीपासून जपणारी, बुद्धिप्रामाण्यवाद जोपासणारी काही सुसंस्कृत घर तालुक्यात नक्कीच आहेत. ही जुनी मंडळी नव्या, बदलत्या प्रवाहांशी, तंत्रज्ञानाशी जुळवून घेत असतानाच तत्त्वांवर मात्र ठाम आहेत.
स्वयंरोजगारावर भर देणारे माझे काही माजी विद्यार्थी कोकणाला धरून आहेत. त्यातल्या एखाद्याने चवदार खाद्यपदार्थांचा फुटस्टॉल सुरू केला, तरी मला आनंदच होतो. शुद्ध हवा, घरगुती आहार आणि मायेची सावली त्याला मिळते आणि वडिलांनी घर पूर्वीच बांधलेलं असल्यामुळे तो त्या बळावर लवकर संसाराला लागतो.
आपल्या छोट्या बाळाला ‘हे आमचे सर आहेत’ असं सांगतो. बाळ हसतं. ते मनात म्हणत असेल की, ‘काय, पण सर! स्मार्टफोनसुद्धा वापरत नाहीत...’ सौरउर्जेचा, सूर्यचुलीचा, विहिरीचं निर्मळ पाणी वापरण्याचा सुखद पर्याय त्या त्या बाबतीत बाळगणारे, स्वीकारणारे पर्यावरणस्नेहीही दिसत आहेत. वाळवंटीकरणाचा वरवंटा फिरला तरी हिरवळीत गवतफुलं दिसणारच!
हर्णैच्या किनाऱ्यावर शेकडो समुद्रपक्षी दर्या ओलांडून हिवाळ्यात येणारच! म्हणूनच गड्यांनो मी हताश नाही. जगणं वणव्यासारखं ज्वालाग्राही होत असताना आपण आपली फुलं वेचावी हे उत्तम! तेवढंच मी करतोय. पूर्वी आणि आतासुद्धा!
(लेखक व्याख्याते आणि स्तंभलेखक आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.