आम्ही ‘पानवाल्या’! (व्हिडिओ)

आम्ही ‘पानवाल्या’! (व्हिडिओ)

बिझनेस वुमन
बीएस्सी किंवा बीकॉमसारखे शिक्षण घेऊन सासरच्यांनी सुरू केलेला व्यवसाय चॅलेंज म्हणून स्वीकारणे आणि त्यात आवड निर्माण करून तो यशस्वीरीत्या नावारूपाला आणण्याची किमया साधली आहे कोल्हापूरच्या ज्ञानेश्‍वरी आणि कविता घळसासी यांनी. व्यवसाय कशाचा, तर पान बनविण्याचा. मुळात पान म्हटले की पुरुषांनी टपरीवर जाऊन खाण्याचा प्रकार. महिला आणि विशेषतः छोट्या मुलांनी त्यापासून दूरच राहावे, अशी आपल्याकडची प्रथा. महिलांनी पान खाल्लेच तर फक्त सणावारापुरतेच मर्यादित. अशा व्यवसायात या दोन महिलांनी मुशाफिरी करावी आणि आता त्यांच्या कंपनीची फ्रॅंचायझी मिळावी म्हणून समाजात मानमरातब असलेल्या आणि उच्चशिक्षित कुटुंबातील लोकांनी प्रयत्न करावेत, यातच त्यांचे यश अधोरेखित होते.

कोल्हापुरातील प्रसिद्ध ‘राजा-बाळ पान मंदिरा’चे मालक म्हणजे ज्ञानेश्‍वरी आणि कविता यांचे घळसासी कुटुंब. लग्न होऊन घरात आल्यानंतर या दोघींनी देखील पान कसे बनवायचे हे जाणून घ्यायला सुरवात केली. पारंपरिक पद्धतीने पान बनविणे सुरू असताना एके दिवशी अचानक गोव्यावरून चॉकलेट पानाची ऑर्डर आली. या अगोदर या प्रकारचे पान कधीच बनविले गेले नसल्यामुळे या ऑर्डरची कोणी विशेष दाखल घेतली नाही. मात्र, ही ऑर्डर म्हणजे आपल्या कल्पकतेला वाव आहे हे हेरून या दोघींनी हे आव्हान स्वीकारले आणि येथूनच सुरवात झाली ज्ञानेश्‍वरी आणि कविता यांच्या रुची बॅंकवेट्‌स या कंपनीची. चॉकलेट फ्लेवरपासून सुरू झालेल्या प्रवासात आजपर्यंत ६०० फ्लेवरपर्यंतची पाने बनविण्यात आली आहेत. म्हणजे, अगदी फ्लेवर किंवा पदार्थाचे नाव घ्यावे आणि ते यांनी पानात आणावे एवढा त्यांचा हातखंडा! 

व्यवसाय म्हटले की मार्केट रिसर्च आलाच. त्यामुळेच कविता यांनीदेखील बनारसी आणि कलकत्ता पान म्हणजे नक्की काय हे जाणून घेण्यासाठी तिकडे जाऊन अभ्यास केला. महत्त्वाचे म्हणजे, पानामध्ये वैविध्य आणता यावे यासाठी दोघींचे अखंड वाचन सुरू असते. सध्याच्या पिढीला भावणारी चॉकलेट, पाणी-पुरी पान असे लोकप्रिय प्रकार बनवीत असतानाच धार्मिक किंवा ऐतिहासिक पुस्तकांचे वाचन करून त्या काळी पान कसे असेल, त्यात काय घटक वापरले जात असतील याचा सतत अभ्यास सुरू असतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा वध करण्यासाठी अफझलखानाने उचललेला विडा म्हणजे नक्की काय, कोल्हापुरातील महालक्ष्मीसाठी करण्यात येणाऱ्या होमात आहुतीसाठी वापरण्याचे पान, जोतिबासाठी नैवेद्यात येणाऱ्या पानात कोणते ५१ घटक वापरले गेले होते हे अभ्यासून या प्रकारची पाने सहज बनविली जातात. 

महत्त्वाचे म्हणजे, तंबाखू किंवा शरीराला हानिकारक घटकांचा वापर न करता महिला आणि लहान मुलांना आरोग्यवर्धक पान खाता यावे यासाठी ज्ञानेश्‍वरी आणि कविता प्रयत्नशील असतात. त्यामुळेच, रुची बॅंक्वेट्‌स हा ब्रॅंड आता गोव्यात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) किंवा पुण्यातील भीमथडी यात्रेत सहभागी व्हावा यासाठी आयोजक आग्रही असतात. 
(शब्दांकन - प्रवीण कुलकर्णी)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com