छंदातून व्यवसायाकडे! (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 एप्रिल 2019

बिझनेस वूमन -  पल्लवी पराडकर
सर्वच क्षेत्रांत आत्मविश्वासाने मुक्त संचार करणाऱ्या महिलांच्या यशोगाथा, सेलिब्रेटी टिप्स, महिलांचे आरोग्य, ट्रेंड्स, पाककृती, सुरक्षिततेच्या दृष्टीने 'सेफ्टी झोन' वाचा 'सकाळ पुणे टुडे'च्या 'मैत्रीण' या पुरवणीत...

बिझनेस वूमन -  पल्लवी पराडकर
कला किंवा छंदाचे व्यवसायात रूपांतर होते, ते लोक नशीबवान आणि भाग्यवानच म्हणावे लागतात. त्यापैकी मी एक. आयुष्याच्या महत्त्वाच्या टप्प्यावर चांगल्या पगाराची नोकरी सोडून मी पूर्णपणे माझ्याकडे असलेल्या चित्रकलेच्या जोरावर पूर्णवेळ चित्रकला हाच व्यवसाय स्वीकारला.

सुरवातीला अडचणी आल्या, मात्र घरातील लोकांच्या पाठिंब्यामुळे व्यावसायिक चित्रकार म्हणून ओळख झाली आहे. सुरवातीला नोकरीतून वेळ काढून कधी आपले विश्‍व, रोजच्या घडामोडी तर कधी प्रेरणा देणाऱ्या व्यक्तिमत्त्वाची चित्र काढत होती, मात्र माझ्यातील कलाकार मला शांत बसू देत नव्हता. हे होण्यासाठी तुमच्याकडे एक प्रकारची जागरूकता असल्यास आपल्याकडील कलेचा व्यवसाय होऊ शकतो. या गोष्टीमुळे आनंद आणि पैसे दोन्ही मिळतात. त्यामुळे आनंदाने काम करत असताना हेच काम आणखीन सोपे कसे करता येईल, असे डोके सतत चालत राहिल्यास नवनिर्मितीसुद्धा होत राहते. उत्तम व्यावसायिक हा उत्तम विद्यार्थी असतो.

तो सतत शिकत असतो. त्याला कोणतेही काम करताना कष्ट तर वाटत नाहीतच; पण ते काम पूर्ण केल्यावर चेहऱ्यावर एक वेगळीच चमक असते. तसेच, एखादे काम कमी महत्त्वाचे आणि एखादे जास्त महत्त्वाचे असे त्याला वाटत नाही आणि त्यातूनच कामाचा दर्जा उंचावत जातो.

प्रत्येकाने आपल्या छंदाकडे आता व्यावसायिक दृष्टिकोनातून बघितले पाहिजे. चित्रकलेत देखील पूर्ण वेळ करिअर होऊ शकते. मला सुरवातीला नोकरी सोडल्यानंतर आर्थिक बाजू सावरण्यासाठी कसरत करावी लागली.

पुण्यासारख्या शहरामध्ये मोठ्या हॉटेल्समध्ये, शैक्षणिक संस्थांमध्ये भितींवरील चित्रांना चांगली मागणी आहे. आता मी लवकरच कलादालन सुरू करणार असून, मुलांना आणि पालकांना या कला आणि क्षेत्राला व्यावसायिक दृष्टिकोनातून कसे बघता येईल याचे मार्गदर्शन करणार आहे. अनेकदा सामाजिक दबावाखातर, मित्रांच्या आग्रहाखातर, कुठल्यातरी स्नेहींच्या यशस्वी कारकिर्दीकडे पाहून आपण मेडिकल किंवा इंजिनिअरिंगची वाट धरतो. मात्र, आपल्याकडे असलेल्या कलेविषयी आत्मविश्‍वास बाळगल्यास आपल्या आवडीच्या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळते व तिचे सोनं नक्कीच करता येते. कोणतीही कला किंवा छंद कधीही किरकोळ नसतो, हे छंदातून व्यवसायाकडे वळलेल्या प्रत्येक व्यावसायिकाने लक्षात ठेवले पाहिजे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Business Woman Talk Pallavi Paradkar maitrin supplement sakal pune today