‘अभी नहीं तो, कभी नहीं’ (व्हिडिओ)

Shubhangini Sangale
Shubhangini Sangale

बिझनेस वुमन - शुभांगिनी सांगळे, संस्थापक, एसएसई हॉस्पिटॅलिटी
‘अभी नही तो कभी नही’ हे ब्रीद मनाशी बाळगून आयटी क्षेत्रातील आयबीएमसारख्या मोठ्या मल्टिनॅशनल कंपनीतील नोकरी सोडून शुभांगिनी सांगळे यांनी ‘एसएसई हॉस्पिटॅलिटी’ची सुरवात केली. त्या आधी काम करीत असलेल्या आयटी क्षेत्रातूनच त्यांनी या व्यवसायाला सुरवात झाली.

या काही कोटींचा नफा मिळवणाऱ्या व्यवसायाच्या प्रवासाबद्दल सांगताना त्या म्हणतात, ‘‘आयटी क्षेत्रातील मंदीमुळे मी स्वतःच काहीतरी सुरू करावे, अशा विचारात होते. रोज ऑफिसमधील सहकाऱ्यांशी हिंजवडी भागातील साध्या एका टपरीवर तासन्‌ तास चर्चा करत होते. यातूनच ‘कॉर्पोरेट केटरिंग’ची कल्पना सुचली. रोज आयटी कंपन्यांमध्ये माझ्यासोबत असणाऱ्या लोकांनाच जेवण दिलं तर, असा प्रश्न स्वतःला विचारला आणि माझ्या व्यवसायाला सुरवात झाली. माझ्या गणिताच्या शिक्षकांनी सांगितलेले एक वाक्‍य माझ्या कायम लक्षात राहील आहे. ते म्हणाले होते, ‘‘सुरवातीला केलेल्या कार्यात एकदा पाय रोवून घट्ट उभे राहिलात, तर कायम टिकाल.’’ आयुष्यात काहीतरी चांगले करून दाखवायची माझ्यात येथूनच निर्माण झाली. 

शुभांगिनी यांनी घरचांच्या मदतीने ‘फूड इंडस्ट्री’मध्ये पहिले पाऊल टाकले. हाताला चव होतीच आणि नवनवीन ‘आयडिया’ होत्या. इंजिनिअरिंगच्या शिक्षणामुळे बोलणे-चालणे प्रेझेंटेशन देणे हे सगळ्या दृष्टीने चांगले होते. याचीच त्यांना खूप मदत झाली. व्यवसायाची कल्पना त्यांना सुचली तेव्हा त्यांनी ठरवून टाकलं, ‘आयटी कंपनीत जॉब नाही करता आला म्हणून काय झाले? आयटी कंपनीपासूनच सुरवात करून आयटी कंपनीमध्ये आपले स्वतःचे वेगळे रूप दाखवून देऊयात.’

त्या म्हणाल्या, ‘‘बरेच फूड प्रेझेंटेशन देऊन मी माझ्यासाठी तीन बाय तीनची जागा एका आयटी कंपनीच्या कॅफेटेरियामध्ये मिळवली आणि इथून सुरू झाला माझा पुढचा प्रवास. मी इंजिनिअर आहे व माझे मित्र-मैत्रिणी आयटीमध्ये जॉबमध्ये करत होते. त्याच कंपनीत मी माझ्या आउटलेटवर पडेल ते काम करून व्यवसायात जम बसविण्याच्या प्रयत्नात होते. मी करतेय ते बरोबर आहे का, हा प्रश्‍न मनात होताच. मात्र, दिवसाच्या अखेरीस कष्टाने मिळालेले पैसे नोकरीतून मिळणाऱ्या पगारापेक्षाही जास्त होते. यात माझा सर्वांत मोठा आनंद होता. मग नक्की झाले, की आता करिअर करायचे याच क्षेत्रामध्ये आणि नावही कमवायचे याच क्षेत्रांमध्ये! हा मनाचा निश्‍चय घेऊन, मी पुढे चालत राहिले. बऱ्याच अडचणी आल्या आणि मी पर्याय काढत राहिले. पण हार मानली नाही.’’

घरच्यांकडून त्यांनी वीस हजार रुपये उधार घेऊन व्यवसाय सुरू केला होता. ते पैसे त्यांनी अवघ्या पंधरा दिवसांमध्येच परत केले. आलेले पैसे त्या पुढे गुंतवत राहिले आणि व्यवसाय वाढत गेला. ‘तीन बाय तीन’ जागेतून सुरवात केलेल्या शुभांगिनी या आज चार हजार वर्गफुटांमध्ये काम करीत आहेत.

त्यांनी तीनशे लोकांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगार मिळवून दिला आहे. त्या म्हणतात, ‘‘माझी वीस हजाराची गुंतवणूक आज काही कोटींवर जाऊन पोचली आहे. एक व्यक्ती मनापासून ठरवते आणि ते मनापासून जिद्दीने ती मांडते तेव्हा ती गोष्ट नक्कीच पूर्ण होते. हेच प्रोत्साहन मला आजच्या महिलांना द्यावेसे वाटते. तुमच्या मनात जे आहे ते तुम्ही बाहेर काढा आणि ते पूर्ण करण्यासाठी जिद्दीने प्रयत्न करा. यश तुमच्या जवळ नक्कीच येईल.’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com