पर्यटनाभिमुख ‘प्रवाही’ नेतृत्व (झेलम चौबळ)

प्रवीण कुलकर्णी
बुधवार, 15 मे 2019

"सर्वच क्षेत्रांत आत्मविश्वासाने मुक्त संचार करणाऱ्या महिलांच्या यशोगाथा, सेलिब्रेटी टिप्स, महिलांचे आरोग्य, ट्रेंड्स, पाककृती, सुरक्षिततेच्या दृष्टीने "सेफ्टी झोन" वाचा "सकाळ पुणे टुडे"च्या "मैत्रीण" या पुरवणीत..

बिझनेस वुमन
केसरी टुर्सच सर्वेसर्वा केसरी पाटील आणि त्यांचे भाऊ आणि राजाराणी ट्रॅव्हल्सचे मालक राजाभाऊ यांच्यात काश्‍मीर प्रेम इतके की, दोघांपैकी ज्याला कन्यारत्न प्राप्त होईल तीच नाव ‘झेलम’ हे ठेवण्यात येईल, हे अगोदरच ठरले होते. शांत, निखळ आणि व्यवसाय प्रवाही ‘झेलम’ केसरी पाटील यांच्या भाग्याला आल्या. घरातूनच प्रवास, भटकंती (टुरिझम) आणि व्यवसायाचे गुण मिळाल्याने झेलम ‘टुर्स’ व्यवसायात नसत्या आल्या तरच नवल.

झेलम यांचे बालपण अगदी सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या मुलांप्रमाणेच होते. मराठी माध्यमात शिक्षण आणि पालघरमधील छोट्याशा मथाने या गावातून शहराच्या ठिकाणी येण्यासाठी ग्रामीण भागातील बैलगाडीचा प्रवास, अगदी सर्वसामान्यांप्रमाणेच. ‘बी.कॉम.’चे शिक्षण पूर्ण करून लग्नानंतर त्या अमेरिकेत स्थायिक झाल्या. मात्र, व्यवसायाची आवड त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती आणि त्यातूनच त्यांनी 1990 मध्ये ‘ए टू झेड टुर्स अँड ट्रॅव्हल्स’ नावाची ‘टिकिटिंग आणि सर्व्हिसेस’ कंपनीची सुरवात केली. घर आणि व्यवसाय सर्व काही व्यवस्थित सुरू असताना भारतात येण्याची तीव्र इच्छा असल्याने त्यांनी अमेरिकेतील कॅलिफोर्निया सोडून भारतातील कॅलिफोर्निया म्हणून ‘पुणे’ येथे स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पुण्यातील केसरी ऑफिसला सुरवात करून नावारूपाला आणले.  

केसरीच्या संचालिका असलेल्या झेलम यांना फायनान्स, टिकिटिंग आणि ॲडमिनिस्ट्रेशन या विभागांमध्ये विशेष रुची आहे. मात्र, पर्यटनाच्या नवनवीन योजना आखण्यात त्यांचा हातखंडा आहे. नेहमीच्या ग्राहकांबरोबरच शेतकऱ्यांना पर्यटनाबरोबरच शेती आणि शेतीपूरक व्यवसायासंबंधी नवीन तंत्रज्ञानाची ओळख व्हावी म्हणून ॲग्रो टुरिझम, विद्यार्थ्यांसाठी ‘नासा’ टूर आणि कार्पोरेट क्षेत्रात विशेष लोकप्रिय असलेली माईस (MICE) अशा पूर्णपणे भिन्न आणि लोकप्रिय योजना आखण्याचे श्रेय ‘झेलम’ यांचेच. मात्र, यावरच समाधानी न राहता ग्राहकांना सतत नवनवीन पर्यटनस्थळे दाखविण्यासाठी त्या प्रयत्नशील आहेत.

‘टुरिझमचा व्यवसाय म्हणजे जगभर फिरणे,’ हे वाटते तेवढे सोपे नसल्याचे सांगताना त्या जेट एअरवेजचे ताजे उदाहरण देतात. अचानक कंपनी बंद झाल्याने टुरिझम क्षेत्राला मोठा आर्थिक फटका बसला आहे. ऐन सुट्यांच्या हंगामात पुन्हा नव्याने टिकिटिंग’ करणे सोपे नाही. मात्र, हे ग्राहकांना जाणवूही न देता त्यांची सहल आनंददायी व्हावी, यासाठी करावे लागणारे प्रयत्न हे कल्पनेच्या बाहेरचे असतात. त्याशिवाय, नवीन प्रदेशात पर्यटकांना घेऊन जाणे, त्यांची व्यवस्था करणे, तातडीच्या वेळी प्रसंगावधान राखत निर्णय घेणे, विविध देशातील भारतीय दूतावासांबरोबर संपर्क ठेवणे अशी अनेक आव्हाने या क्षेत्रात असतात. मात्र, अतिशय वेगाने विस्तारणाऱ्या पर्यटन क्षेत्रात नव्या व्यावसायिकांना आणि विशेषतः महिलांना मोठ्या संधी असल्याचे त्या सांगतात.

भारतीयांचा देश-विदेशात पर्यटन करण्याकडे कल झपाट्याने वाढला आहे. अशावेळी जास्तीत जास्त ग्राहकांना सेवा देण्यासाठी आम्ही चारही भावंडे प्रयत्नशील असून, आता तिसरी पिढीदेखील या व्यवसायात उतरली आहे. एकाच व्यवसायात कुटुंबातील सदस्य कार्यरत असूनदेखील कौटुंबिक संबंध अतिशय जिव्हाळ्याचे असल्याचे त्या आवर्जून स्पष्ट करतात. 

झेलम चौबळ यांची मुलाखत ऐका...
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Business Women Zelam Chaubal maitrin supplement sakal pune today