गरज ‘कॅन्सर मिशन’ची!

‘भारत जगातील कॅन्सर रुग्णांची राजधानी होत चालली आहे’ अशी बातमी काही दिवसांपूर्वी आली आणि पुन्हा एकदा त्याचीच चर्चा सुरू झाली. भारतात कर्करुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.
Cancer Mission
Cancer Missionsakal

‘भारत जगातील कॅन्सर रुग्णांची राजधानी होत चालली आहे’ अशी बातमी काही दिवसांपूर्वी आली आणि पुन्हा एकदा त्याचीच चर्चा सुरू झाली. भारतात कर्करुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाचा कर्करुग्णांचा देश झाला आहे. युरोपियन कमिशनच्या धर्तीवर आता भारतातही तशीच चळवळ सुरू करण्याची नितांत गरज आहे. भारत सरकारनेही लवकरात लवकर कॅन्सर मिशनची सुरुवात करणे काळाची गरज बनली आहे.

भारत आज माहिती तंत्रज्ञानाची, आयुर्वेदाची आणि योगाची जागतिक राजधानी आहे, असे म्हणतात. त्यामध्ये अजून एका राजधानीची भर पडताना दिसून येतेय. ‘भारत जगातील कॅन्सर रुग्णांची राजधानी होत चालली आहे’ असे शीर्षक मागील आठवड्यातील अनेक राष्ट्रीय वृत्तपत्रांतील बातम्यांचे होते.

२०२४ च्या जागतिक आरोग्य दिनी प्रसिद्ध झालेल्या अपोलो हॉस्पिटलच्या ‘हेल्थ ऑफ नेशन’ अहवालाच्या चौथ्या आवृत्तीत भारताला ‘जगातील कर्करोगाची राजधानी’ असे संबोधले गेले आहे. त्यामुळे भारतात कर्करुग्णांची झपाट्याने वाढ होत आहे, हे अधोरेखित झाले आहे.

अपोलो हॉस्पिटलच्या अहवालाच्या आधी गेल्या वर्षी आशियातील ४९ देशांच्या कॅन्सर रुग्णांचा अभ्यास करून भारतीय तसेच इतर आशियाई देशातील शंभरपेक्षा अधिक संस्थांमधील संशोधकांनी हे संशोधन मागील आठवड्यात मेडिकल सायन्समधील सुप्रसिद्ध ‘लॅन्सेट प्रादेशिक आरोग्य दक्षिणपूर्व आशिया’ जर्नलमध्ये प्रसिद्ध केले होते. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कुरुक्षेत्र आणि ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स), जोधपूर आणि भटिंडा येथील तज्ज्ञ या संशोधनात सहभागी होते.

या संशोधनाच्या माहितीवरून कोविडपूर्वी म्हणजेच २०१९ मध्ये भारत जवळपास ९.३ लाख नागरिकांचा कॅन्सरमुळे मृत्यू झाला आहे आणि हे प्रमाण भारत सरकारच्या अधिकृत माहितीनुसार २०२० ते २०२२ पर्यंत कोविडमुळे झालेल्या मृत्यूपेक्षा अधिक आहे. फक्त २०१९ मध्ये नवीन १२ लाख कर्करुग्णांची नोंद झाली होती.

अपोलो हॉस्पिटलच्या नवीन अहवालानुसार, तीनपैकी एक भारतीय प्री-डायबेटिक आहे, तीनपैकी दोन प्री-तणावग्रस्त आहेत आणि दहापैकी एक नैराश्याने ग्रस्त आहे. कर्करोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग आणि मानसिक आरोग्य विकारासारखे आजार भारतात गंभीर पातळीवर पोहोचले आहेत, ज्यामुळे देशाच्या आरोग्यावर लक्षणीय परिणाम होतो.

भविष्यही अंधकारमय

२०२२ मध्ये भारतातील कर्करोगाच्या रुग्णांची संख्या १४.६ लाख होती. २०२५ मध्ये ती १५.७ लाखांपर्यंत वाढण्याचा अंदाज भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने मार्च २०२३ मध्ये राज्यसभेत दिलेल्या माहितीत व्यक्त केला आहे. भारत हा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा कर्करुग्णांचा देश झाला आहे. अमेरिका आणि चीननंतर भारताचा क्रमांक लागतो. २०२२ मध्ये भारतात १४ लाख रुग्ण आढळून आले.

त्यामध्ये २०२५ पर्यंत अजून वार्षिक एक लाखाची वाढ होऊन साधारण १५ लाख रुग्ण आढळून येतील. २०२२ मध्ये भारतात पुरुषांपेक्षा स्त्रियांना अधिक प्रमाणात कर्करोग झाल्याचे आढळून आले. त्यामध्ये सुमारे सात लाख ५० हजार स्त्रियांचा समावेश होता. कमी-अधिक प्रमाणात सात लाख पुरुषांमध्ये कर्करोग आढळून आला. सध्या भारतात दर एक लाख नागरिकांमागे शंभर जणांमध्ये कर्करोग होण्याचे प्रमाण दिसून येत आहे.

त्यामध्ये वाढ होत जाऊन २०४० पर्यंत वार्षिक २० ते २५ लाख नागरिकांना कर्करोग होण्याचे प्रमाण दिसून येईल. काही निमशासकीय संस्थांच्या अंदाजानुसार २०२२ मध्ये भारतातील कर्करोगाच्या घटनांची नोंद १९ ते २० लाख असेल. वास्तविक घटना नोंदवलेल्या प्रकरणांपेक्षा १.५ ते ३ पट जास्त आहेत. म्हणजेच आजच्या दिवशी भारतामध्ये अंदाजे ५० लाख कर्करुग्ण असू शकतात.

पर्यावरणाची हानी कर्करोगाला कारणीभूत

भारतामध्ये कर्करुग्णांच्या वाढीचा दर मुख्यतः जागरूकतेचा अभाव आणि कॅन्सर स्क्रीनिंग कार्यक्रमांच्या कमी उपस्थितीशी निगडित आहे. उशिराच्या टप्प्यामध्ये आढळून येण्यामुळे उच्च रोगाच्या ओझ्याचासुद्धा प्रश्न वाढला आहे. भारतात कॅन्सर दुसऱ्या किंवा तिसऱ्या टप्प्यात शोधण्याचे प्रमाण २९ टक्के इतके कमी आहे.

फक्त १५ टक्के आणि ३३ टक्के स्तनाच्या, फुप्फुसाच्या आणि गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचे निदान अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात होते, जे चीन, यूके आणि यूएसपेक्षा लक्षणीयरीत्या कमी आहे. विशेषत: भारत, नेपाळ, कतार, बांगलादेश आणि पाकिस्तानसारख्या अतिशय प्रदूषणशील देशांमध्ये कॅन्सरचा वाढता भार चिंताजनक आहे.

एकट्या भारतातील सुमारे ४० टक्के कॅन्सर रुग्णवाढीचा दर प्रदूषणामुळे होतोय. भारतामध्ये गुटखा आणि पानमसाला यांसारख्या धूरविरहित तंबाखूच्या सेवनाने तोंडाच्या कर्करोगाचे प्रमाण भयावह आहे. २०१९ मध्ये जागतिक मृत्यूंपैकी ३२.९ टक्के तोंडाच्या कर्करोगाची २८.१ टक्के नवीन प्रकरणे एकट्या भारतात नोंदली गेली आहेत.

भारतीय रस्त्यांवर पेट्रोल वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे वायुप्रदूषणात लक्षणीय वाढ झाली आहे. वायुप्रदूषणातील वाढीमुळे भारतीय नागरिकांमध्ये फुप्फुस आणि श्वसनाचे विकार अन् अनेक प्रकारच्या कर्करोगाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

त्याच जोडीला तंबाखूचा नियमित वापर, अतिप्रमाणात दारू पिणे, अयोग्य किंवा असंतुलित आहार, शारीरिक व्यायामाचा अभाव आणि बैठी जीवनशैली तसेच कर्करोगाचा कौटुंबिक इतिहास इत्यादी कारणांमुळेच भारतीयांमध्ये कॅन्सरची वाढ होत चालली आहे. ग्रामीण आणि शहरी भागात असणारे दूषित पाणी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे भेसळयुक्त दुधामुळे कॅन्सरच्या प्रमाणात वाढ होत आहे.

भारतासारख्या कमी आणि मध्यम-उत्पन्न असलेल्या देशांमध्ये कर्करुग्णांसाठी असणाऱ्या पायाभूत सुविधा एक तर दुर्मिळ आहेत किंवा परवडत नाहीत. विशेषतः ग्रामीण भागात रुग्णांना उशिरा निदान आणि उपचार मिळतात, ज्यामुळे जगण्याचे प्रमाण कमी होते, अशी माहिती संशोधक देतात.

परिणामी कॅन्सर तपासणी आणि उपचार वेळेवर उपलब्ध होण्यासोबतच त्याची किफायतशीरता किंवा उपचार खर्चाच्या धोरणास प्राधान्य असले पाहिजे.

जागरूकता, सुविधा आणि उपचार पद्धतीवर भर

युरोपियन कमिशनने २०२० मध्ये युरोपमधील २८ देशांमध्ये कॅन्सर मिशन सुरू केले आहे. कर्करोगाचा प्रसार रोखणे, नागरिकांमध्ये चांगल्या राहणीमानासाठी जागरूकता निर्माण करणे, रुगांसाठी कमी खर्चात चांगल्या सुविधा निर्माण करणे आणि कॅन्सरवर नवनवीन उपचार पद्धती शोधण्यासाठी संशोधनावर भर देणे अशी कॅन्सर मिशनची मुख्य उद्दिष्टे आहेत.

मिशनअंतर्गत २०२१-२२ मध्ये सुमारे १० हजार कोटी कॅन्सर संशोधनासाठी युरोपियन कमिशनने उपलब्ध करून दिले आहेत. त्याच धर्तीवर भारतातील कॅन्सरच्या वाढत्या प्रमाणावर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारनेही लवकरात लवकर कॅन्सर मिशनची सुरुवात करणे काळाची गरज आहे.

इतर विकसित देशांमध्ये जपान, चीन, कोरिया आणि ऑस्ट्रेलिया यांनीसुद्धा कॅन्सरवर संशोधन अन् उपाययोजनेसाठी भरीव कार्यक्रम सुरू केले आहेत. भारत त्यामध्ये खूपच मागे असून आफ्रिकन आणि आशियाई देशांची कामगिरी अगदीच खराब आहे. भारतात सध्या केंद्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणात कॅन्सर प्रतिबंध कार्यक्रम आखण्याची गरज दिसून येत आहे.

त्याच जोडीला भारतामध्ये कर्करोगावरील संशोधनाला चालना आणि त्यासाठी मोठा संशोधन निधी उपलब्ध करून देण्याची गरज आहे. कोविडनंतर जगातील अनेक विकसित देशांत कर्करोगावरील लशीच्या संशोधनाला वेग आला असून त्यासाठी हजारो कोटींचा निधी उपलब्ध करून दिला जात आहे.

अमेरिका-युरोपमधून पुढील काही वर्षांत कर्करोगाच्या लसी रुग्णांसाठी उपलब्ध करून दिल्या जातील. भारत कर्करोगाच्या लसीच्या संशोधनात खूपच मागे असून दुर्दैवाने पुढील काही वर्षांत त्यामध्ये काही बदल घडून येताना दिसणार नाहीत आणि आपल्यावर विकसित देशांनी संशोधित केलेल्या महागड्या लसी विकत घेण्याची वेळ येईल.

thoratnd@gmail.com

(लेखक लंडनमध्ये विज्ञान संशोधक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com