
'केप वर्ड'चा ऐतिहासिक प्रवेश
esakal
पोर्तुगाल देशाने आता ‘केप वर्ड’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देशातील जागेला १५व्या शतकात वसाहत म्हणून विकसित केले. ‘केप वर्ड’ या देशाने ५ जुलै, १९७५मध्ये स्वातंत्र्य मिळवले; मात्र स्वातंत्र्य मिळवल्यानंतरही त्यांच्या देशामध्ये पोर्तुगीज भाषा कायम राहिली. आणखी काही आफ्रिकन देशांमध्ये पोर्तुगीज भाषेचा वापर केला जातो. त्यामध्ये अँगोला, मोझांबिक, जिनिया बिसाऊ यांसारख्या देशांचा समावेश आहे. या देशाच्या नावाची उच्चारण पद्धतीही वेगळी आहे. पोर्तुगीज भाषेनुसार ‘काबो वेर्दे’ असे उच्चारण या देशाचे केले जाते. त्यांच्या देशामध्येही अशाच शब्दांत उच्चारण केले जाते; मात्र इतर इंग्रजीचे प्रभुत्व असलेले देश आजही या देशाचे उच्चारण ‘केप वर्ड’ असाच करतात.
असो, ‘केप वर्ड’ या देशाने २०२५मध्ये आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये मुसंडी मारली असली तरी या देशाने विश्वकरंडकाची वाटचाल २००२मध्येच सुरू केली होती. त्या वेळी ‘केप वर्ड’ या देशाला विश्वकरंडकाच्या पात्रता फेरीमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. तिथपासून या देशाने फुटबॉल विश्वकरंडकाकडे गांभीर्याने बघितले. इतर देशांतील स्थलांतरीत खेळाडूंना आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करण्यास राजी करायचे, अशी योजना आखली गेली. यंदाच्या विश्वकरंडक पात्रता फेरीतील लढतींमध्ये २५ पैकी १४ खेळाडू हे स्थलांतरित होते.