दिपानिष्ठांची मांदियाळी

रोजच्या ‘तेच ते’च्या रगाड्यातून मला थोडं नवं होता येईल का या ध्यासातूनच सृजनाची चाहूल लागते.
celebrate this diwali like creativity culture pravin davne
celebrate this diwali like creativity culture pravin davneSakal

त्याच त्याच व्यवहारी डांबरी सडकेलाही केव्हातरी अनोळखी वळण घ्यावंसं वाटतं ते मृद्‍गंधाचं! तसंच, उत्सव येतात ते नेहमीच अटळ उन्हात चंद्रस्पर्श घेऊन! चैतन्याला एका जागी थांबता येत नाही...ते धावत असतं, बदल शोधत असतं, नवं रूप घेऊन पुन्हा स्वतःला शोधू पाहत असतं. हा आंतर्शोध म्हणजे आत्ममहोत्सवच.

रोजच्या ‘तेच ते’च्या रगाड्यातून मला थोडं नवं होता येईल का या ध्यासातूनच सृजनाची चाहूल लागते. पोटापाण्याची आकडेमोड आपण नेहमीच करतो; पण एखादी कविता सुचेल का? कॅनव्हासवर रोजचा सूर्योदय माझ्या क्षितिजातून उगवताना व्यक्त होईल का?

रोजचा कचेरीचा रस्ता चालणाऱ्या पावलांना स्वतःची गिरकी घेऊन थिरकता येईल का? दुसऱ्याच्या तालावर आपला सूर बेतण्यापेक्षा मला माझा आलाप माझ्या मनाप्रमाणे घेता येईल का? हा ध्यास जेव्हा एकाचा न राहता अनेकांचा होतो तेव्हा तो समाजाचा एकत्रित अंतरंगोत्सव होतो.

अशी वेगळी वाट शोधणारे कलंदर आपल्या मिटल्या अंगणात जाणिवांची एक ज्योत जागवतात, तेव्हा आंतरिक दिवाळी केवळ रूढी वा परंपरा राहत नाही. ती सामाजिक साठलेपणाला डोळस धक्का देते. ‘दीपावली अशीही साजरी करता येते’ हे शब्दाविनाच सांगून जाते.

मला आठवतंय...शिवनेरी, रायगड या गडांवर दिवाळीच्या दोन दिवस आधी सहज म्हणून गेल्यावर स्तिमित व्हावं असं दृश्य मी अनुभवलं होतं. एक मध्यमवयीन आई-बाबा त्यांच्या माध्यमिक शालावयीन मुलांबरोबर उजळलेल्या पणत्यांची आरास करताना मी तिथं पाहिले. अगदी प्रकाशाशी एकरूप झालेले! त्या कुटुंबाची ती तेजसमाधी मला ढळू द्यायची नव्हती; पण उत्सुकताही स्वस्थ बसू देत नव्हती.

अखेर मी विचारलंच : ‘‘जरा बोलू का? आपली ओळख नाही पण...’’

गृहस्थ हसून म्हणाले : ‘‘ओळख होईलच...या, तुम्हीही एक पणती लावा...!’’

त्या चौघांत मी पाचवा केव्हा गुंफला गेलो मला कळलंही नाही.

एकेक पणती उजळताना गप्पा होत गेल्या. त्यातून कळलं की, या कुटुंबाचा दरवर्षीचा हा नियम. मुलांना घेऊन गडावर जाऊन शक्य तितके दिवे उजळायचे...जवळच्या पाड्यांवर जाऊन आपल्याकडचा गोड फराळ तिथल्या रानलेकरांना द्यायचा नि मग घरी यायचं.

हे ऐकताना मलाही जाणवलं की, निघताना एक उजळलेली पणती आपणही आपल्याबरोबर घेऊन निघालो आहोत. दीपज्योत जेव्हा संवेदनेत जागी होते तेव्हा तो केवळ तेल-वातीचा उपचार राहत नाही... स्वतःची नवी पाऊलवाट शोधण्याचं ते निमित्त ठरतं. दिवाळी आकाशातून अशी रायगडावर उतरताना पाहणं हे डोळ्यांना ‘दृष्टी’ करतं! आपल्या अभिमानास्पद इतिहासावर जागरूक प्रेम करणं ही भविष्य तेजोमय करण्याची सुरुवात होऊ शकते.

काही वर्षांपूर्वीची एक वेगळीच, उबदार दिवाळी मला कायमची शाल पांघरून गेली! परिचित महाविद्यालयातल्या राष्ट्रीय सेवायोजनेच्या प्राध्यापकांचा दूरध्वनी आला : ‘‘उद्या पहाटे भिवंडीजवळच्या वृद्धाश्रमात आपले विद्यार्थी दिवाळी साजरी करताहेत. तुमच्या हातून तिथल्या ज्येष्ठांना भेटवस्तू द्यायच्या आहेत. याल का?’’

मी होकार दिला. पहाटे त्यांचं वाहन मला न्यायला आलं. मी घराबाहेर पडणार तेवढ्यात पत्नी म्हणाली : ‘‘ही बॅग भरलीय...तीही बरोबर घेऊन जा!’’

काही क्षण मी स्तब्धच झालो.

ही आता मलाच ‘तिथं - उपेक्षित ज्येष्ठांच्या त्या आश्रमात- जाऊन राहा’ असं सांगते की काय! तिनं स्मित केलं...म्हणाली : ‘‘नाही! तुम्ही घरीच या परत; पण ही बॅग तिथल्या आजी-आजोबांसाठी आहे. ती घेऊन जा!’’

‘‘काय आहे त्या बॅगेत?’’

‘‘वर्षभरात तुम्हाला मिळालेल्या शाली यात घड्या करून ठेवल्यात!’’

सामाजिक जाणिवेच्या कल्पकतेत पत्नीची ‘प्रज्ञा’ पुढं होती. त्या दिवाळीचा तो जिव्हाळा...ती हुरहूर...ती थरथर...मनाच्या कुटुंबाचा विस्तार करून गेली.

वाट पाहणारे ते पांढुरक्या पापण्यांचे आजी-आजोबा...रक्ताची नातवंडं भेटीसाठी न फिरकल्यानं त्या आजी-आजोबांना आलेलं मानसिक पोरकेपण अनोळखी नातवंडांकडून दूर होत असताना मी तिथं पाहिलं.

त्या अरुण-तरुण विद्यार्थ्यांच्या हातूनच एकेक शाल मी आजी-आजोबांना दिली. मुलं-मुली मिळून अनेक ठिपक्यांची ‘संस्कारभारती’ रांगोळी वृद्धाश्रमासमोर काढत होते. ध्वनिविरहित रोषणाईच्या फुलबाज्या नि अनार त्या ज्येष्ठांना बसल्याजागी थुईथुई नृत्याचा आनंद देत होते.

एकाच वेळी सगळ्या वातावरणाला चेतनेची पालवी फुटताना अनुभवण्यात यौवनाचा नवाच दीपोत्सव नादावत होता. ठिपका ठिपका जोडून नेत्रमोहक रांगोळी काढण्याचा संस्कार हा मनाला मन जोडून समाज सुंदर करण्याचा आहे.

रोषणाईत नि वर्तमानात प्रकाशाच्या बिया रुजवण्याचा हा हुंकार आहे. गोडाधोडातून मागची कटुता दूर सारून नव्या संवादाच्या माधुर्यानं पुन्हा सूर जुळवण्याचं आवाहन आहे. दिवाळीच्या निमित्तानं ‘नागरिकशास्त्र’ असं सजून-नटून येतं.

पुस्तकातले नियम पाठांतरातून उत्तरपत्रिकेत उतरतात खरे; पण आयुष्यात मात्र ते पाठ फिरवून नवीन प्रश्नपत्रिका तयार करतात हे आपण नित्य पाहतो. अशा वेळी दीपोत्सवातून नात्यांतले भेद मिटवून ‘विश्व स्वधर्म सूर्ये पाहो!’मधली एकात्मता शिकवणारं जागतं नागरिकशास्त्र आपण जगण्यात रुजवलं तरच ती दीपावली...!

निघताना त्या ज्येष्ठांकडे मी वळून पाहिलं. हिवाळी वारा जरा वाढला असावा किंवा शालीतला धागा त्यांना ओढ लावत असावा. अंगावर शाल लपेटून सगळे जण ‘पुन्हा लवकर या...!’ असं सांगणारा हात हलवत होते. निघतानाची स्तब्धता हुरहूर लावणारी होती. घरी आल्यावर मी पत्नीला म्हटलं : ‘‘समाजानं दिलेल्या सत्काराच्या शाली समाजाला परत दिल्या. मी खरा मोकळा झालो! श्रेय तुला आहे. किती योग्य वेळी तुला सुचतं...!’’

पुष्कळदा कार्यक्रमांतून मिळालेल्या शाली काही मंडळी तिथंच ठेवतात; चारशे-पाचशे रुपयांचे पुष्पगुच्छ टेबलावरच कोमेजून जातात; पण मी शाल आवर्जून बॅगेत ठेवतो. घरी आणतो. कधी चुकून विसरलीच तर मागं फिरून पुन्हा आणतो.

क्वचित् नजरांना वाटतं, ‘काय बुवा, असा हा शाल घरी नेण्याचा उत्साह?’ त्यांचं बरोबर असतं; पण मला उंबरठ्याशी आलेल्या दिवाळीची आश्रमभेट साद घालत असते. येत्या डिसेंबरात ही शाल माझ्या अनामिक आई-बाबांसाठी मुलाचा ऊबदार स्पर्श होण्याची वाट पाहत असते. माझी दिवाळी तिथून सुरू होते.

झुलणाऱ्या आकाशकंदिलातून एका वर्षीची दिवाळी दारापुढं आली. आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य आणि प्रसिद्ध नाटककार श्याम फडके यांच्या प्रयोगाचा रंगमंच म्हणजे, माझं ‘ज्ञानसाधना महाविद्यालय.’ त्यांनी केलेल्या अनेक प्रयोगांतले विद्यार्थी म्हणजे आम्ही प्राध्यापक. त्यांच्या केबिनला दरवाजा नव्हता. समोरच ते टेबल-खुर्चीवर बसत. त्यांच्याशी थेट संवाद साधण्याची कुणालाही मुभा होती. तशाच थेट भेटीत मी एकदा त्यांना विनंती केली :

‘‘सर, आपण यंदा एक वेगळीच स्पर्धा घ्यायची का?’’

‘‘कुठली?’’

आकाशकंदील-स्पर्धा! दिवाळी अगदी जवळ आलीये...मुलांकडून आकाशकंदील करून घेऊ या...!’’

त्यांनी क्षणभर माझ्याकडे पाहिलं.

‘‘स्पर्धा झकास आहे; पण अचानक...? सुचली कशी ही स्पर्धा?’’

मग त्या स्पर्धा सुचण्याची कहाणीच मी त्यांना सांगितली.

ते हसले : ‘‘व्वा! घ्या ही स्पर्धा!’’

थोडी नवीच नि आधी कधीही न घेतलेली स्पर्धा असल्यानं स्टाफरूममध्ये स्वाभाविकच ‘सहभागी किती होतील, कुणास ठाऊक?’ ही खास शंका प्रकटलीच; पण स्पर्धा जाहीर होताच, भराभरा नावं जमा झाली. त्यात तो आघाडीवर होता.

होय तोच ‘तो’, ज्याच्यामुळे मला ही वेगळी स्पर्धा आयोजित करावीशी वाटली. त्याच्या महाविद्यालयाला ‘जागं’ ठेवणारा उनाड जयंता! त्याला बोलावून मी म्हटलं : ‘‘पुन्हा तुझं नाव व्रात्य मुलांच्या यादीत आलंय...का वागतोस तू असा? खरं तर केवढा चपळ, गुणी दिसतोस तू...’’

कौतुकाचा काहीही परिणाम न होता जयंता म्हणाला : ‘‘आपल्याला फक्त लई बेस्ट आकाशकंदील करता येतात, बाकी भोपळा...!’’

तो हे वाक्य बोलला नि मेंदूत ताराच चकमला. आणि, नंतर जयंताही चमकला! जयंताच्या आकाशकंदिलाला पारितोषिक तर मिळालंच; शिवाय, इतर स्पर्धकांचे आकाशकंदीलही प्राध्यापकांनी विकत घेतले. अर्थातच जयंताचा आकाशकंदील मी विकत घेतला! तो पैसे घेत नव्हता. मी म्हटलं : ‘‘तू कलावंत आहेस, मानधन हा तुझा हक्क आहे...!’’ त्या क्षणापासून जयंतात आमूलाग्र बदल घडला.

उनाड झालेली ऊर्जा वळणावर आली की पुढं शिखर दिसू लागतं. माझी त्या वर्षीची दिवाळी जयंताच्या आकाशकंदिलातून साजिवंत झाली. रित्या हातांत दगड यायच्या आधी योग्य काम देणं हाही कर्तव्याचा दीपोत्सवच...!

...तेजाचे हे कण कण मी वेचतो आहे. त्यांची रांगोळी रेखतो आहे; पण हे तेजःकण कसे कधी आयुष्यात येतील सांगता येत नाही. असंच निर्धारातून आयुष्य उभं करणारा तेजोमय क्षण मेधा हिच्या पावलांनी आला.

जवळजवळ तीस वर्षांनी प्रकटलेली, ओळख सांगितल्यावरच आठवणं शक्य झालेली वर्गमैत्रीण एखाद्या कथेतल्या व्यक्तिरेखेसारखी घरी येते...तिची ढासळलेली जीवनकहाणी सांगते हे विलक्षण होतं. अघटिताला ठामपणे सामोरं जाण्याच्या त्या जिद्दीतच मला दिवाळी दिसली.

एकाकी अवस्थेला हळहळतं रूप देण्यापेक्षा फराळाचा व्यवसाय करण्यासाठी तिला आरंभीचं भांडवल हवं होतं. कुणी आलं, मागितले की उचलून पैसे द्यावेत, इतके आपण ‘बेफिकीर अमीर’ नसतो; पण जेव्हा शब्दांपेक्षा जिद्द डोळ्यांतून बोलत असते तेव्हा ते ऐकण्याची, उमजण्याची संवेदना आपल्यात असते.

इतक्या वर्षांनंतर अगदी आडपडदा न ठेवता तिनं थेट सांगितल्यावर जमेल तेवढी मदत करून मी मोकळा झालो. मंदिरातल्या दानपेटीत टाकलेलं दान नंतर जसं विसरून जायचं असतं, त्याच प्रकारे अशा पद्धतीनं केलेली आर्थिक मदतही विसरून जायची असते हे मला आयुष्यातल्या गतानुभवांनी पुरेपूर शिकवलं होतं; पण अनुभव कधीच एकसुरी नसतात हाच सुरेल धडा मेधा हिनं मला दिला.

माझ्याकडून घेतलेल्या पैशांत थोडी भर घालून व्याजासह म्हणून तिनं पाकीट समोर ठेवलं...तिनं दिवाळीत केलेल्या फराळाच्या पाकिटाबरोबर. आम्हा उभयतांना आश्चर्य वाटलं...मेधा दिवाळी संपताच दुसऱ्या की तिसऱ्या दिवशी ते सर्व पैसे घेऊन आली हे थोरच! मेधा मला म्हणाली : ‘‘तुझ्या लक्ष्मीला सरस्वतीचा स्पर्श आहे याची प्रचीती आली.

अपेक्षेच्या तिप्पट विक्री झाली. चकली नि अनारसे यांना तर खूपच मागणी. खरं सांगू, जवळच्या सर्व नातेवाइकांचं ‘अगं, नेमके कालच दिले एकाला,’ हे ऐकून मी अगदी नाइलाजानं, खरं तर खूप हिंमत करून, तुझ्या घराची बेल वाजवली. कुठल्याही प्रतिक्रियेची सगळी तयारी ठेवून... पण...!’’ पुढं तिचे डोळे बोलत राहिले.

अश्रूंच्या मुळाक्षरातून घरातली ती शांतता प्रज्ञा हिनं बोलकी केली : ‘‘मेधाताई, हे पाकीट तुम्ही परत घ्या. ‘ह्यां’च्याकडनं भाऊबीज म्हणून..!’’

गृहस्थाच्या आयुष्यातला हा सौभाग्याचा क्षण मला पत्नीनं दिला.

पैसे परत घेण्याचा तिचा निकराचा नकार ‘भाऊबीज!’ या भावनेनं विरघळला. महिन्याभरानं तिचा फोन आला : ‘‘भाऊबीजेच्या त्या पैशानं निवडक दिवाळी अंकांची लायब्ररी सुरू केलीय...छानच प्रतिसाद मिळालाय...निरपेक्ष स्नेह देणाऱ्या मित्र-मैत्रिणी जोडल्या गेल्यात...खरं सांगू, या प्रसंगानं मला जाणवलं की, कुटुंबापलीकडेही एक कुटुंब असतं. आपण एकटे नसतो...नातंही शोधावं लागतं.’’

मेधा नुसतीच शब्दांनी बोलत नव्हती. जिद्दीतून जगलेलं बोलत होती. दिवाळीतून जणू नव्या दिवाळीचा उन्मेष येत होता. नव्या निर्धारानं माणूस जीवनात पुन्हा ठाम उभा राहतो...ते अनुभवणं हाही दीपोत्सवच!

दीपानिष्ठांनी ही मांदियाळी आपल्या भोवती निष्ठेनं वाढवत राहणं हीच महापूजा.ती साकारते...कधी रायगडावर भेटलेल्या प्रयोगशील कुटुंबातून, कधी ज्येष्ठांना दिलेल्या शालीतून मिळणाऱ्या आशीर्वादाच्या उबेतून, कधी आकाशकंदील घडवणाऱ्या सकारात्मक ऊर्जेतून, तर कधी काळोखाला प्रकाशानं उत्तर देणाऱ्या मेधासारख्या असंख्य जिद्दज्योतीतून! असा एखादा मिटला दिवा उजळता येणं हेच उत्सवाचं प्रयोजन नि प्रकाशाचं आश्वासनही!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com