दोघं मिळून शोधतो समस्यांवर उपाय

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 मे 2019

सर्वच क्षेत्रांत आत्मविश्वासाने मुक्त संचार करणाऱ्या महिलांच्या यशोगाथा, सेलिब्रेटी टिप्स, महिलांचे आरोग्य, ट्रेंड्स, पाककृती, सुरक्षिततेच्या दृष्टीने 'सेफ्टी झोन' वाचा 'सकाळ पुणे टुडे'च्या 'मैत्रीण' या पुरवणीत...

जोडी पडद्यावरची - अक्षया देवधर आणि  हार्दिक जोशी
अभिनेता हार्दिक जोशी आणि अभिनेत्री अक्षया देवधर हे दोघंही ‘झी मराठी’वरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत एकत्र काम करत आहेत. या मालिकेमुळं हे दोघंही पहिल्यांदाच एकत्र आले. त्याच्या पहिल्या भेटीबद्दल हार्दिक म्हणातो, ‘‘आम्ही ‘तुझ्यात जीव रंगाला’च्या सेटवरच पहिल्यांदा भेटलो. माझं या मालिकेसाठी आधीच चित्रीकरण सुरू झालं होतं. अक्षयानं मालिकेच्या चित्रीकरणाला नंतर सुरवात केली. मी पहिल्यांदा तिला भेटल्यावर मला थोडं ऑक्वर्ड वाटलं, कारण मी आजपर्यंत कधीच मुलींबरोबर जास्त बोललेलो नाही. त्यामुळं माझी दिग्दर्शकांनी तिची को-स्टार म्हणून ओळख करून दिली तेव्हा थोडं अस्वस्थ वाटलं. पण काम करताना हळूहळू आम्ही एकमेकांशी बोलू लागलो आणि आता खूप चांगले मित्र आहोत.’’

याबाबत अक्षया म्हणाली, ‘‘मालिकेच्या सेटवरील पहिल्याच दिवशी मी हार्दिकला भेटले. हार्दिकचं चित्रीकरण आधीपासून सुरू झाल्यानं मी तिथं नवीनच होते. मी पुण्याची आणि तो मुंबईचा. आम्ही एकत्र काम करायला लागल्यावर चांगले मित्र झालो.’’ सेटवरील गमतीजमतींबद्दल हार्दिक सांगतो, ‘‘मी अक्षयाला खूप त्रास देतो. कधीतरी स्क्रिप्ट वाचत असताना ती गंभीरतेनं स्क्रिप्ट वाचत असते आणि मध्येच काहीतरी फोन आल्याचं नाटक केल्यावर ती चिडते...’ याबद्दल अक्षया म्हणाली, ‘‘आम्ही खूप भांडतो. हे भांडण गमतीत चालतं. सतत छोट्या गोष्टींवरून आमची भांडणं होत असतात.

आम्ही दोघंही स्क्रिप्ट वाचून प्रॅक्‍टिस करत असतो, मग मध्येच हार्दिकला फोन येतो मग मला राग येतो. मग आमची भांडणं होतात. अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टींवरून आम्ही भांडत असतो.’’ मैत्री वाढत गेल्यावर एकमेकांच्या स्वभावाला आपण ओळखू लागतो, एकमेकांच्या स्वभावाबद्दल आणि आवडत्या-नावडत्या गोष्टी विचारल्यावर अक्षया म्हणाली, ‘‘हार्दिक मनमिळाऊ आणि साधा आहे. तो खूपच वर्कोहोलिक आहे. कधी कामाच्या बाबतीत तो कारणं देत नाही. त्याचे हे मला गुण आवडतात. तो नको बोलतो, हे मात्र मला आवडत नाही. तो लोकांवर पटकन विश्‍वास ठेवतो.’’ अक्षयाबद्दल हार्दिक म्हणाला, ‘‘ती एखाद्या गोष्टीवर पटकन रिॲक्‍ट होते. समोरच्याला बोलायला वेळच देत नाही. हे मला आवडत नाही. ती प्रत्येक गोष्टीकडं सकारात्मक दृष्टिकोनातून बघते. काही चुकत असल्यास व्यवस्थित समजावून सांगते. हे तिचे गुण मला आवडतात.’’ 

मालिकेचे ८५० भागांत एकत्र काम केल्यावर एकमेकांबरोबर काम करायला कसं वाटतं यावर हार्दिक म्हणाला, ‘‘अक्षयासोबत काम करताना मजा येते. तिच्याकडून शिकण्यासारखं खूप आहे. तिचं भाषेवर प्रभुत्व आहे.

तिच्याबरोबर काम करताना छान वाटतं. ती कलाकार आणि व्यक्ती म्हणूनही उत्तम आहे. मी माझ्या कोणत्याही वैयक्तिक गोष्टी तिच्यासोबत शेअर करतो.’’ अक्षया म्हणाली, ‘‘हार्दिक भूमिका छान रंगवतो व तो मेहनती आहे. तो माणुसकी जपणारा आहे.’’ 

चित्रीकरणाव्यतिरिक्त बाहेर भेटता का, असे विचारल्यावर हार्दिक म्हणाला, ‘‘पॅकअप झाल्यावर आम्ही कधीतरी जेवायला बाहेर जातो. अक्षया खूपच फूडी आहे. ती नवनवीन पदार्थ शोधून काढत असते. मी मात्र नेहमीच डाएटवर असतो.’’ याबाबत अक्षया सांगते, ‘‘एखाद्या दिवशी चित्रीकरण नसल्यास आम्ही जेवायला जातो. कोल्हापूरमधील अनेक ठिकाणं आम्ही शोधून काढली आहेत.’ दोघांच्याही मैत्रीच्या बॉडिंगबद्दल विचारलं असता हार्दिक म्हणाला, ‘‘आम्ही ऑनस्क्रिन जसे आम्ही मित्र आहोत, तसेच ऑफस्क्रिनही आहोत.’ अक्षया म्हणाली, ‘आम्ही नेहमी जरी भांडत असलो, तरी आम्ही एकमेकांना सपोर्टही करत असतो.’’ 

(शब्दांकन - स्नेहल सांबरे) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: celebrity Akshaya Deodhar and Hardik Joshi maitrin supplement sakal pune today