अडचणीत एकमेकांना सांभाळून घेतो

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 जुलै 2019

सर्वच क्षेत्रांत आत्मविश्वासाने मुक्त संचार करणाऱ्या महिलांच्या यशोगाथा, सेलिब्रेटी टिप्स, महिलांचे आरोग्य, ट्रेंड्स, पाककृती, सुरक्षिततेच्या दृष्टीने 'सेफ्टी झोन' वाचा 'सकाळ पुणे टुडे'च्या 'मैत्रीण' या पुरवणीत...

जोडी पडद्यावरची - मल्हार ठाकर, मानसी पारेख-गोहिल
अभिनेत्री मानसी पारेख-गोहिलने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे, तसेच ‘उरी’ या हिंदी चित्रपटातदेखील तिने काम केले आहे. शिवाय ती निर्मातीही आहे. अभिनेता मल्हार ठाकर याने गुजराथी चित्रपटसृष्टीत चांगलेच नाव कमावले आहे. त्याने अनेक चित्रपट व नाटकांमध्ये काम केले आहे. गुजराथी नाटकांमध्ये काम करणारा मल्हार आणि हिंदी मालिकांमध्ये काम करणारी मानसी हे दोघे जण पहिल्यांदाच एकत्र आले आहेत ‘डू नॉट डिस्टर्ब’ या गुजराथी वेबसीरिजसाठी. आपल्या पहिल्या भेटीबद्दल मल्हार म्हणाला, ‘‘मानसीची व माझी पहिली भेट मानसीला आठवत नसेल, परंतु मला नक्की आठवतेय. तिचे ‘मारो पियू गयो रंगून’ हे नाटक मी चार वेळा पाहिलेले आहे आणि मुख्य म्हणजे चारही वेळा मी मानसीला भेटलो आहे! ही भेट आता मानसीला आठवत नाही, हा विषयच वेगळा आहे.’’ 

यावर मानसी म्हणाली, ‘‘त्या वेळी शेड्यूल खूप बिझी असल्याने मला आठवत नाही. पण मल्हारला मी त्याच्या ‘लव्ह नी भवाई’ चित्रपटाच्या स्क्रीनिंगवेळी मुंबईत भेटलेले आहे, आम्ही तेव्हा बोललो होतो. माझ्यासाठी तरी ती पहिली भेट आहे, हे मला आठवतेय.’’ 

दोघेही गुजराती असल्याने त्यांचे ट्युनिंग अधिक चांगले जमून आले. त्यांनी याआधी एकत्र काम केले नसले, तरी त्यांची ओळख आहे. दोघांची एकमेकांशी गुजरातीमध्ये बोलायला आवडते. सोबत काम करताना कसे वाटते यावर मल्हार म्हणाला, ‘‘मला मानसीसोबत काम करताना कम्फर्टेबल वाटले आणि खूप मजा पण आली. पहिल्यांदा एकत्र काम करत असलो, तरी आम्ही अनेकदा काम केले आहे, असेच वाटत होते.’’ यावर मानसी म्हणाली, ‘‘आम्ही दोघांनी खूप एन्जॉय केले. एकमेकांना अडलेल्या गोष्टी सांभाळून व सावरून आम्ही काम केले.’’ एकमेकांचे कौतुक करताना मल्हार म्हणाला, ‘‘चांगल्या गुणांच्या आधी मला मानसीची वाईट सवय सांगायची आहे. ती मेकअप करायला खूप जास्त वेळ घेते आणि मला ते आवडत नाही. पण चांगला गुणही तितकाच आहे, मानसीचा आवाज खूप छान आहे आणि ती उत्तम गाते.’’ 

मानसी म्हणते, ‘‘मल्हार खूप मदत करतो. कोणतीही गोष्ट अडली अथवा काही झाले तरी तो सर्वांत आधी धावून येतो. ही वेबसीरिज मी स्वतःच निर्मित करत असल्याने मला थोडेफार दडपण यायचे. मात्र मल्हारने सर्व सांभाळून घेतले, हा त्याचा चांगला गुण आहे.’’ 

सेटवरील गमतीजमतींबद्दल मल्हार म्हणाला, ‘‘आम्ही खूप धम्माल केली. कामाबरोबरच आम्ही मस्तीसुद्धा तितकीच केली. त्यामुळे कामाचा स्ट्रेस आला नाही. एकंदरीत मानसी आणि मल्हार यांच्यात घट्ट मैत्री जाणवली. यानंतर ते दोघेही एक चित्रपट करण्याचा विचार करीत आहेत. त्यांची मैत्री ही या वेबसीरिजपुरती न राहता पुढेही एकमेकांच्या करिअरमध्ये उपयोगी ठरणार आहे. 

ही गुजराथी वेबसीरिज एमएक्‍स प्लेअरवर प्रर्दशित होणार आहे. या वेबसीरिजमध्ये लग्न झालेल्या गुजराथी जोडप्याची कथा सांगण्यात आली आहे. यामध्ये त्यांच्यात होणारे संभाषण आणि त्यांनी एकमेकांसोबत घालवलेला वेळ दाखवण्यात आला आहे. ही एक रोमॅंटिक कथा आहे. (शब्दांकन - स्नेहा गांवकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: celebrity Malhar Thakar Manasi Parekh Gohil maitrin supplement sakal pune today