शिक्षणाने दिला लढण्याचा आत्मविश्‍वास

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 नोव्हेंबर 2019

सर्वच क्षेत्रांत आत्मविश्वासाने मुक्त संचार करणाऱ्या महिलांच्या यशोगाथा, सेलिब्रेटी टिप्स, महिलांचे आरोग्य, ट्रेंड्स, पाककृती, सुरक्षिततेच्या दृष्टीने 'सेफ्टी झोन' वाचा 'सकाळ पुणे टुडे'च्या 'मैत्रीण' या पुरवणीत...

दखल - मिलिंद शिंदे, अभिनेता 
मराठी मालिका, चित्रपटांमध्ये उत्तमोत्तम काम करत घराघरांत पोचलेला चेहरा म्हणजे अभिनेता मिलिंद शिंदे. करिअरच्या सुरवातीला काम मिळवण्यासाठी मिलिंदला बराच संघर्ष करावा लागला. पण आता त्याने स्वतःच्या मेहनतीवर वेगळं स्थान निर्माण केलं आहे. जाणून घेऊ त्याच्या कलाप्रवासाची गोष्ट त्याच्याच मनोगतातून...

अभिनय कौशल्याबरोबरच कलाक्षेत्रामध्ये ग्लॅमरस चेहरा, राहणीमान, तुमची पर्सनॅलिटी या गोष्टींनाही बरंच महत्त्व दिलं जातं. मी जेव्हा या क्षेत्रात आलो तेव्हा माझ्या लूकमुळे मला बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला. बऱ्याचदा तर या क्षेत्रापासून दूर जावं असा निश्‍चयही मी मनाशी केला होता. जेव्हा मी मुंबईत आलो तेव्हा माझा अवतार अगदी विचित्र, त्यात मी दिसायलाही चांगला नाही. त्यामुळे आपला या क्षेत्रामध्ये निभाव लागणार का, हाच प्रश्‍न मला सतत भेडसावत होता. 

कलाक्षेत्रात मी काम मिळवण्यासाठी जेव्हा फिरू लागलो तेव्हा इतर हॅण्डसम, दिसायला गोऱ्या गोमट्या लोकांना पाहून आपलं इथं जमणारच नाही, असं वाटायचं. पण माझ्या शिक्षणानं मला साथ दिली. दिल्लीमध्ये नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये मी शिकलेलो आहे. पुण्यामध्ये एफटीआयमध्येही शिक्षण घेतलं आहे. त्यामुळे शिक्षणाची शिदोरी माझ्या पाठीशी होती. शिक्षणाने माझा पाया मजबूत केला. आज मी कलाक्षेत्रात जे काही करू शकलो ते शिक्षणामुळेच. 

प्रत्येक क्षेत्रात काम मिळवण्यासाठी प्रत्येकालाच स्ट्रगल हा करावाच लागतो. मलाही करावा लागला. मला काम द्या म्हणून मी सगळीकडे हिंडायचो. काम मागायला गेलं की हा नट आहे का? हा पहिला प्रश्‍न मला विचारला जायचा. बऱ्याचदा तर माझं म्हणणं ऐकून न घेता मला परत पाठवलं जायचं. पण तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला कधी ना कधी तरी मिळतंच.

माझ्याबाबतीतही तसंच घडलं. बऱ्याच प्रयत्नांनंतर मालिका, चित्रपटांमध्ये मला काम मिळत गेलं. आपल्या हाती आलेल्या प्रत्येक संधीचं सोनं करायचं हे मी मनाशी निश्‍चित केलं. त्याचप्रमाणे अगदी मन लावून काम करायला लागलो. ‘नटरंग’सारख्या चित्रपटात मला काम करण्याची संधी मिळाली.

शिवाय ‘बाबू बॅण्ड बाजा’ या माझ्या चित्रपटाला तर राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. ‘तू तिथे मी’ या मालिकेत मी साकारलेली तांबडे बाबा ही भूमिका तर घराघरांत पोहचली. आजही मी कुठे गेलो तर याच भूमिकेमुळे मला ओळखलं जातं आणि हीच माझ्या कामाची पोचपावती आहे, असं मला वाटतं. माझं काम बोलू लागल्यावर मला स्वतःहून चित्रपट, मालिकांसाठी विचारण्यात येऊ लागलं. त्यामुळे शिक्षण पाठीशी असलं तर कुठेच मरण नाही हे माझ्याबाबतीत खरं ठरलं. 

मी बऱ्याचदा नकारात्मक भूमिकांमधून प्रेक्षकांच्यासमोर आलो आहे; पण त्याचबरोबरीने मी इतर वैविध्यपूर्ण भूमिका केल्या आहेत. मी व्हिलनची भूमिका साकारत जरी असलो तरी मी साकारत असलेला प्रत्येक व्हिलन कसा वेगळा दिसेल, याकडे मी अधिक लक्ष देतो. त्या प्रत्येक भूमिकेमध्ये मी माझे रंग भरत असतो. शिवाय मी पहिल्यापासूनच ठरवून चित्रपट करतो.

एका चित्रपटात खलनायकाची भूमिका केली की दुसऱ्या चित्रपटामधून आणखी काय नवीन प्रेक्षकांना देता येईल याचा विचार करतो. नट म्हणून आपण वैविध्यपूर्ण असणं फार गरजेचं आहे. सुरुवातीच्या काळात संघर्ष होता पण आता त्याचं चांगलं फळ मला मिळत आहे. आता माझा आणखी एक चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. ‘कॉपी’ या चित्रपटाचं नाव आहे.

दयासागर वानखेडे आणि हेमंत धबडे दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती गणेश पाटील यांनी केली आहे. शिक्षण व्यवस्थेवर भाष्य करणारे बरेच चित्रपट आले. पण ग्रामीण भागात शिक्षण व्यवस्थेची भीषण परिस्थिती, शिक्षक, विद्यार्थ्यांचे हाल या चित्रपटात दाखवण्यात आले आहेत. या चित्रपटामध्ये माझी एक महत्त्वपूर्ण भूमिका आहे. पण या भूमिकेलाही एक वेगळा टच देण्यात आला आहे. 

एक गंभीर विषय प्रेक्षकांपर्यंत योग्य पद्धतीने पोहचावा यासाठी ‘कॉपी’च्या 
संपूर्ण टीमने खास मेहनत घेतली आहे. 
(शब्दांकन - काजल डांगे)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: celebrity milind shinde maitrin supplement sakal pune today