ती बडबडी, तर मी अबोल!

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 9 November 2019

सर्वच क्षेत्रांत आत्मविश्वासाने मुक्त संचार करणाऱ्या महिलांच्या यशोगाथा, सेलिब्रेटी टिप्स, महिलांचे आरोग्य, ट्रेंड्स, पाककृती, सुरक्षिततेच्या दृष्टीने 'सेफ्टी झोन' वाचा 'सकाळ पुणे टुडे'च्या 'मैत्रीण' या पुरवणीत...

जोडी पडद्यावरची - रेश्‍मा शिंदे आणि आशुतोष गोखले
अभिनेता आशुतोष गोखलेला ‘तुला पाहते रे’ या मालिकेतील भूमिकेमुळे खरी प्रसिद्धी मिळाली. तर अभिनेत्री रेश्‍मा शिंदे ही ‘लगोरी’, ‘बंध रेशमाचे’सारख्या मालिकेतून प्रेक्षकांसमोर आली. हे दोघेही पहिल्यांदाच एकत्र आले ते स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेतून. एकमेकांना नावाने ओळखणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या पहिल्या भेटीबद्दल विचारले असता आशुतोष सांगतो, ‘‘आम्ही दोघे पहिल्यांदाच मालिकेच्या सेटवर भेटलो होतो.

खरेतर या मालिकेसाठी माझी निवड उशिरा झाली होती. त्यामुळे माझ्या चित्रीकरणाच्या पहिल्याच दिवशी आमची ओळख झाली. मी फार बोलत नसल्याने रेश्‍मानेच माझ्याशी बोलण्यासाठी पुढाकार घेतला होता.’’ 

यावर रेश्‍मा सांगते, ‘‘एकाच चित्रपटसृष्टीत काम करत असल्याने आम्ही एकमेकांना पाहून ओळखत होतो. या मालिकेच्या निमित्ताने आम्हाला पहिल्यांदाच एकत्र काम करण्याची संधी मिळाली. या मालिकेच्या चित्रीकरणा वेळी आम्ही पहिल्यांदा एकमेकांना भेटलो. आशू फारच कमी बोलतो आणि मला बोलायला फार आवडते, त्यामुळे मी स्वतःच त्याच्याशी बोलण्यासाठी पुढाकार घेतला होता. पहिल्याच दिवशी आमची केमिस्ट्री असलेला सीन झाला होता. आमची पहिली भेट फारच छान होती.’’ दोघांनाही एकमेकांच्या गुणांबद्दल विचारले असता रेश्‍मा आशुतोषबद्दल सांगते, ‘‘मी सतत बडबड करत असते. पण आशू खूपच गप्प असतो. तो फारच कमी बोलतो पण एकदा त्याने बोलायला सुरुवात केली की, तो खूप बोलतो. पण तो कधीही स्वतःहून बोलायला पुढाकार घेत नाही. आशू कधीच कोणत्या गोष्टी सिरीयसली घेत नाही हा मला त्याचा गुण खूपच आवडतो.’’ 

आशुतोष रेश्‍माबद्दल सांगतो, ‘‘रेश्‍मा नेहमीच सेटवरील कोणालाही खूप 
चांगल्या कॉम्लिमेंट्‌स देत असते. सीनच्या वेळी मला किती हसावे हा अंदाज अजून आलेला नाही. तेव्हा बरेचदा ती मला किती हसले पाहिजे आणि किती नाही हे बरोबर सांगते. त्याचबरोबर एखाद्या ज्युनिअर कलाकाराच्या चांगल्या गोष्टींचे ती कौतुक करते. मला तिचा हा गुण फारच आवडतो. पण ती प्रत्येक गोष्टीचा खूपच जास्त विचार करते. तिचा हा गुण मला अजिबात आवडत नाही.’’ दोघांमधील गमतीजमतीबद्दल विचारले असता रेश्‍मा सांगते, ‘‘या मालिकेसाठी आमचा पत्रकारांसोबत पहिलाच इंटरव्ह्यू होता. एका पत्रकाराने आशुतोषला, ‘‘रेश्‍मा दिवाळीतला कोणता फटाका वाटते?’ असा प्रश्‍न विचारला. त्यावर आशूने सापगोळी असे उत्तर दिले होते. त्यावेळी आमचे मस्तीमध्ये भांडण झाले होते.’’ 

दोघेही कलाकार म्हणून आणि एक व्यक्ती म्हणून कसे आहात असे विचारल्यावर आशुतोष सांगतो, ‘‘रेश्‍मा ही कलाकार म्हणून खूपच चांगली आहे. आमच्या भेटीला एक महिनाच झाला असल्याने ती व्यक्ती म्हणून कशी आहे, हे मी व्यवस्थित ओळखू शकलेले नाही. पण तिचे फर्स्ट इंप्रेशन हे फारच छान होते. कदाचित अजून काही महिने एकत्र काम केल्यानंतर मी तिला व्यवस्थित ओळखू शकेन.’’ याबाबत रेश्‍मा सांगते, ‘‘आमची काही महिन्यांपूर्वी ओळख झाल्याने त्याला व्यक्ती म्हणून ओळखायला थोडा वेळा जाईल. पण जेवढे मी त्याच्याबरोबर काम केले आहे, त्यावरून तो व्यक्ती म्हणून मला छान वाटतो. कलाकार म्हणून तर तो उत्तम आहेच.’’
(शब्दांकन - स्नेहल सांबरे)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: celebrity reshma shinde and ashutosh gokhale maitrin supplement sakal pune today