दिग्गजांकडून खूप शिकायला मिळाले

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 सप्टेंबर 2019

सर्वच क्षेत्रांत आत्मविश्वासाने मुक्त संचार करणाऱ्या महिलांच्या यशोगाथा, सेलिब्रेटी टिप्स, महिलांचे आरोग्य, ट्रेंड्स, पाककृती, सुरक्षिततेच्या दृष्टीने 'सेफ्टी झोन' वाचा 'सकाळ पुणे टुडे'च्या 'मैत्रीण' या पुरवणीत...

सेलिब्रिटी टॉक - अमायरा दस्तूर, अभिनेत्री
मी मूळची मुंबईची. मला लहानपणापासूनच फॅशन आणि अभिनयाची आवड होती. शिवाय नृत्य हा माझा आवडता छंद आहे. अभिनय क्षेत्रात करिअर करायचे, असे मी लहान असतानाच ठरवले होते. वयाच्या सोळाव्या वर्षी मी ‘क्लीन अँड क्लिअर’, ‘डव्ह’, ‘व्होडाफोन’ या जाहिरातींमध्ये काम करून माझ्या करिअरची खरी सुरवात केली. जाहिरातीत काम करता-करता मी माझे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना मला पहिला चित्रपट ऑफर झाला. ‘इश्क’ हा माझा पहिला हिंदी चित्रपट आहे. हिंदी चित्रपटांबरोबरच मी तमीळ आणि तेलगू चित्रपटांतही काम केले. पहिला चित्रपट मला मिळाला तेव्हा मी अतिशय आनंदी होते. याच चित्रपटाने माझ्या आयुष्यात खऱ्या अर्थाने अभिनय प्रवासाला सुरवात झाली. 

अभिनयाव्यतिरिक्त मला नृत्याची तर आवड आहेच, शिवाय पुस्तके वाचायला फार आवडतात. मला फावल्या वेळेत चित्रपट आणि मालिका बघायलाही आवडतात. अभिनय करण्याआधी मी स्वतः त्या भूमिकेत रममाण होते. माझ्या अभिनयात चुका होणार नाहीत, यासाठी मी आधीच दक्षता घेते. मी लहानपणापासून मुंबईत राहत आहे. मुख्य म्हणजे, माझ्या कुटुंबात किंवा ओळखीत कोणीच चित्रपट सृष्टीमध्ये काम करत नाही. त्यामुळे मला माझ्या अभिनयाची स्वतःहून सुरवात करावी लागली.

सुरवातीला माझ्या घरातून मला तितकासा पाठिंबा नव्हता. त्यांना खरेतर थोडी भीती वाटायची, की इंडस्ट्रीमध्ये काम करणे जमेल का? शिवाय माझ्याकडे कोणत्याच ओळखी नव्हत्या. ‘इश्क’ चित्रपटाच्या प्रीमियरला घरचे आले आणि त्यांनी माझा अभिनय पाहिल्यावर त्यांना खात्री पटली, की मी इंडस्ट्रीमध्ये काहीतरी स्थान निर्माण करू शकते. त्यानंतर त्यांनी मला कायम पाठिंबा दिला. चित्रीकरणामुळे माझ्या घरी पोचण्याच्या वेळाही निश्चित नसायच्या. त्या वेळी माझ्या घरच्यांनी मला खूप सपोर्ट केला.

माझ्या आयुष्यात ‘राजमा चावल’ हा चित्रपट टर्निंग पॉइंट ठरला. या चित्रपटात काम केल्यानंतर माझे विचार बदलले आणि मुख्य म्हणजे मला स्वतःला माझ्याच अभिनयाबद्दल खात्री वाटू लागली. 

आता मी ‘प्रस्थानाम’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाने ॲक्शन आणि राजकारण याचा चांगलाच समतोल साधला आहे. या चित्रपटामुळे मला अभिनेता संजय दत्त, अभिनेत्री मनीषा कोईराला यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळाली. चित्रपटसृष्टीत अनेक वर्षे काम करून अनेक चढउतार पाहिलेल्या या कलाकारांकडून मला खूप नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. या चित्रपटानंतर मी दिनेश विजन दिग्दर्शित ‘मेड इन चायना’ या चित्रपटातही दिसणार आहे. याशिवाय मला वेबसीरिजचेही आकर्षण आहे. वेबसीरिजमध्ये काम करण्याची माझी खूप इच्छा आहे आणि लवकरच मी याही माध्यमातून प्रेक्षकांसमोर येणार आहे.
(शब्दांकन - स्नेहा गांवकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: celebrity talk amyra dastur maitrin supplement sakal pune today