आधी घरातले काम, मगच चित्रीकरण!

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 13 August 2019

सर्वच क्षेत्रांत आत्मविश्वासाने मुक्त संचार करणाऱ्या महिलांच्या यशोगाथा, सेलिब्रेटी टिप्स, महिलांचे आरोग्य, ट्रेंड्स, पाककृती, सुरक्षिततेच्या दृष्टीने 'सेफ्टी झोन' वाचा 'सकाळ पुणे टुडे'च्या 'मैत्रीण' या पुरवणीत...

कमबॅक मॉम - दीप्ती केतकर, अभिनेत्री
माझे सीन ‘मला सासू हवी’ या मालिकेसाठी वाढवण्यात आले. प्रेक्षकांची माझ्या भूमिकेला भरभरून प्रेम दिले. त्या मालिकेत माझी एक साईन लँग्वेज होती. प्रेक्षक मला त्याच साईन लँग्वेजने ओळखू लागले. अजूनही प्रेक्षक मला त्या हातवाऱ्यांनी ओळखतात. खरेतर त्या साईन लँग्वेजचा शोध मी स्वतः लावला होता. या मालिकेमुळे मला बरीच प्रसिद्धी मिळाली आणि मालिका सुरू असतानाच मला ‘एका पेक्षा एक सीजन ७’ या डान्स शोची ऑफर आली. ती ऑफर मी स्वीकारली. त्या वेळी माझ्या सासूची मला खूप मदत झाली. त्या मला म्हणाल्या, ‘‘तुला हा शो करायचा आहे ना, मग तो तू कर. मी सांभाळेन मायराला.’’ त्यांचे हे बोलणे माझ्यासाठी खूप मोठा आधार होता. 

भरतनाट्यममध्ये मास्टर्स केल्याने मी या शोसाठी फारच उत्सुक होते. मला डान्स करायला मिळणार म्हणूनच मी हा शो स्वीकारला. शो करताना मला खूप मजा आली. बघता-बघता मी तो शो जिंकला. हे सगळे करताना मी एक आई आणि एक सून आहे, हे देखील चांगल्याप्रकारे जपले. या शोमुळे माझे बरेचसे वजन कमी झाले. यादरम्यान मी कोबी, फ्लॉवर, ब्रोकोली, मुळा, बदाम, अक्रोड या सर्व गोष्टी जवळजवळ एक ते दीड वर्ष बंद केल्या होत्या.

कारण मला आधीपासूनच थायरॉईड होता आणि या सगळ्या गोष्टी खाल्ल्याने माझा थायरॉईड अधिक वाढणार होता. त्यामुळे काहीकाळ या गोष्टी खाणे बंदच होते. थायरॉईडमुळे मी स्वतःची जास्त काळजी घ्यायला लागले. ‘एका पेक्षा एक’ या शोनंतर मी चांगलीच बारीक झाली होते. त्यानंतर मी ‘कमला’ आणि ‘हम तो तेरे आशिक है’ या मालिका केल्या. या दोन्ही मालिका करण्याआधी मी एक वर्षाचा गॅप घेतला. 

माझ्या कुटुंबासाठी मला हा गॅप घेणे गरजेचे वाटले. कारण या सगळ्या गोष्टी करण्यामागे माझ्या घरच्यांचा मला खूप मोठा पाठिंबा होता. आताही माझे कधी चित्रीकरण असल्यास, मी आधी घरात माझ्या सासूंना मदत करते. त्यानंतर मी चित्रीकरणासाठी निघते. आता मायरा मोठी झाली आहे. 

स्वतःच्या सगळ्या गोष्टी ती करते; पण तिलासुद्धा कधीकधी माझ्यासोबत वेळ घालवावासा वाटतो. चित्रीकरणावरून आल्यानंतर मीसुद्धा माझा सगळा थकवा बाजूला ठेवून तिच्यासोबत वेळ घालवते. मला टीव्हीवर पाहायला तिला खूप आवडते. त्यासाठी ती खूपच एक्‍सायटेड असते. ती माझ्यासोबत बरेचदा सेटवरसुद्धा येते. सेटवर आली की, माझ्या मराठी भाषेतल्या बऱ्याच चुका काढते. तिला कोणी विचारले, ‘‘तुझी आई कशी काम करते?’’ तिचे उत्तर नेहमी एकच असते, ‘‘माझी आई नेहमीच मस्त काम करते.’’

तिच्यासाठी तिची आई परफेक्‍टच आहे. प्रत्येक मुलाला आपली आई परफेक्‍टच वाटत असते. आता मी ‘भागो मोहन प्यारे’ ही मालिका करत आहे. 

ही मालिका आठवड्यातून दोनदा येते. त्यामुळे मला या शोसाठी विचारण्यात आले होते तेव्हा तो ‘विकली शो’ आहे, हे ऐकूनच होकार दिला होता. ‘विकली शो’ असल्याने मला सुटी मिळणार होती आणि मी मायराला वेळ देऊ शकणार होते. त्यामुळे आता मी तिला बराच वेळ देते. तिला फिरण्यापेक्षा जास्त चित्र काढायला आवडतात. मला सुटी असेल तेव्हा आम्ही दोघी एकत्र चित्र काढतो. तिला शॉपिंग करायलादेखील खूप आवडते, त्यामुळे आम्ही शॉपिंगला जातो. त्यानंतर ती गाण्याच्या, स्केटिंगच्या क्‍लासला जाते.

कधीतरी तिला क्‍लासला सोडायला मी जाते. आई तिच्यासोबत घरी असली की, तिला खूपच मजा वाटते. असा आम्ही खूप मजा-मस्ती करत दोघी एकत्र वेळ घालवतो. 

(शब्दांकन - स्नेहल सांबरे)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: celebrity talk Dipti Ketkar maitrin supplement sakal pune today