अभिनयाला नको भाषेचा अडसर

अरुण सुर्वे
मंगळवार, 16 एप्रिल 2019

सेलिब्रिटी टॉक - मनुल चुडासामा, अभिनेत्री
सर्वच क्षेत्रांत आत्मविश्वासाने मुक्त संचार करणाऱ्या महिलांच्या यशोगाथा, सेलिब्रेटी टिप्स, महिलांचे आरोग्य, ट्रेंड्स, पाककृती, सुरक्षिततेच्या दृष्टीने 'सेफ्टी झोन' वाचा 'सकाळ पुणे टुडे'च्या 'मैत्रीण' या पुरवणीत...

सेलिब्रिटी टॉक - मनुल चुडासामा, अभिनेत्री
महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच ‘एक थी राणी, एक था रावण’ या मालिकेत मला राणीची मुख्य भूमिका साकारण्याची संधी मिळाली. त्यासाठी खूपच कष्ट करावे लागले. आगामी काळात मला मराठीसह इतर भाषांमध्येही अभिनय करायचा आहे. सांगतेय अभिनेत्री मनुल चुडासामा...

अभिनयामध्ये कशी आलीस?
खरंतर मला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. त्यामुळे मी नृत्य करीत होते. मला बॅले, फ्री स्टाइल येते; पण वेस्टर्न नृत्य येत नाही. आगामी काळात मी भरतनाट्यम व कथक शिकणार आहे. गुगलवर सर्च करून मी अभिनयाची आवड जोपासत होते. त्यानंतर ऑडिशनही देऊ लागले.

त्यातूनच छोट्या पडद्यावर मुख्य भूमिका साकारण्याची संधी मिळाली. सध्या मी मुंबईमधील ठाकूर महाविद्यालयात फायनांशिअल मार्केटमध्ये ‘टीवाय’चे शिक्षण घेत आहे. तसेच, एमबीएचे क्‍लासेसही सुरू होते. मात्र, चित्रीकरणामुळे मला एमबीएचे क्‍लासेस करता येत नाहीत. मला ऑस्ट्रेलियामध्ये मास्टर डिग्री घेण्याची इच्छा होती. पण, आता ते शक्‍य होणार नाही.

आतापर्यंतचा प्रवास
मला छोट्या पडद्यावर पहिला ब्रेक ‘स्टार भारत’ या वाहिनीवरील ‘एक थी राणी, एक था रावण’ या मालिकेत मिळाला. मी जाहिरातीची ऑडिशन देत होते. पण, अभिनय येत नव्हता. त्यानंतर अभिनयाचा सराव करू लागले. त्यासाठी आईलाच गुरू केले. तिच्यासमारेच स्क्रिप्ट धरून मी अभिनय करत होते. आईनं दिलेला प्रतिसादच माझ्यातील अभिनयाला जागृत करत होता. त्यातूनच हळूहळू अभिनय येऊ लागला. 

सध्या काय करतेय?
सध्या मी ‘एक थी राणी, एक था रावण’ या मालिकेत राणीची भूमिका साकारत आहे. या पात्रासाठी मला खूप काही शिकावं लागलं. यात मी बबली गर्ल दाखविली आहे. हे पात्र माझ्यासाठी आव्हानात्मकच होतं. खरंतर मी खूप साधी मुलगी आहे. दिग्दर्शकही मला छोटी मुलगीच म्हणतात. त्यांनी मला या पात्रासाठी खूपच मार्गदर्शन केलं. अभिनयाचे धडेही त्यांनीच दिले. दिग्दर्शकांनी मला राणीच्या पात्राबद्दल स्क्रिप्ट दिली आणि मी महिनाभर सराव केला. माझी इंग्रजी चांगली आहे, मात्र हिंदी बोलताना थोडी अडखळते. या मालिकेतील नावामध्ये रावण असल्यानं मी यू-ट्यूबवर बुंदेलखेडचे व्हिडिओ पाहिले. सस्पेन्स थ्रिलर आणि रावणासारखं पात्र समोर असल्यानं मला बरंच काही शिकायला लागलं.

भविष्यातील योजना काय?
मी गुजराती असून, मला ती भाषाही बोलता येते. आगामी काळात मराठीसह इतर भाषांमधील चित्रपटांमध्येही अभिनय करण्याची इच्छा आहे. मी स्वतःवर भाषेचं बंधन लादून घेतलेलं नाही. अभिनय हा अभिनयच असतो, त्याला भाषेचं अडसर येत नाही.  (शब्दांकन - अरुण सुर्वे)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: celebrity talk manual chudasama maitrin supplement sakal pune today